सातारा, (प्रतिनिधी) : तळबीड (ता. कराड) येथे महामार्गालगत सुरू असलेल्या वृक्षतोडीदरम्यान वृक्षांचे पुनर्रोपण करण्यासाठी थांबलेले अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाश्यांनी हल्ला केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. दरम्यान यातून अभिनेते सयाजी शिंदे बचावले असून, त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी सकाळी महामार्गावरून अभिनेते सयाजी शिंदे प्रवास करत होते. दरम्यान, वहागाव तळबीड गावच्या हद्दीत सध्या महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी झाडे तोडण्याचे काम सुरू आहे. झाडे तोडण्याचे काम सुरू असताना अभिनेते सयाजी शिंदे यांनी घटनास्थळी थांबून परिस्थितीची पाहणी केली. मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ही झाडे पुनर प्लांटेशन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.
दरम्यान यावेळी पाहणी करताना शेजारी असणार्या वटवृक्षावरील मधमाश्यांनी हल्ला केल्याने एकच भंबेरी उडाली. यावेळी घटनास्थळी असणारे सयाजी शिंदे यातून बचावले. मात्र मधमाश्या शांत झाल्यानंतर सयाजी शिंदे यांनी पुन्हा झाडांच्या पुनर्रोपणसाठी पुढाकार घेतला आहे.तळबीड, बेवलडे येथील झाडे सुस्थितीत काढून ते वहागावच्या हद्दीत पुन्हा प्लॅन करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.