आयुक्त शेखर सिंह

पिंपरी : राज्य शासकीय कर्मचार्‍यांच्या संपात पिंपरी चिंचवड महापालिकेतील कर्मचारीही सहभागी झाले आहेत. आज संपाचा दुसरा दिवस होता. दरम्यान पिंपरी दिनांक 14 मार्च 2023 पासून शासकीय व निमशासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचार्‍यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारलेला आहे. संपामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी सहभागी झालेले आहेत. सदरचा संप हा जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत असूनही नवीन पेन्शन योजना लागू असलेले व जुनी पेन्शन योजना लागू असलेली असे सर्वच अधिकारी व कर्मचारी या संपात सहभागी असल्याचे माझे निदर्शनास आलेले आहे. वास्तविक पाहता जुनी पेन्शन योजना अनुज्ञेय असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी या संपात सहभागी होण्याचे कुठलेही प्रयोजन नाही असे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी एका पत्रकात म्हटले आहे. महापालिकेतील संपावरील कर्मचारी त्वरित रुजू न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

या पत्रकात आयुक्त सिंह म्हणतात की, क्र. 1 व 2 अन्वये महानगरपालिका अधिकारी व कर्मचार्‍यांनी संपामध्ये सहभागी होऊ नये याबाबत सूचना निर्गमित करुनही पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी यांनी राज्यव्यापी बेमुदत संपामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यामुळे महानगरपालिके समोरील प्रशासकीय आव्हाने विचारात घेवून पुर्वनियोजीत उद्दीष्ट्ये पूर्ण करणे, अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरु ठेवणे, समाज उपयोगी विकास कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करणे यामध्ये बाधा निर्माण होवून शहरातील नागरिकांना वेठीस धरले गेले आहे.
तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थापनेवरील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना कळविण्यात येते की, पहिल्या टप्प्यामध्ये जे अधिकारी व कर्मचारी दिनांक 1 नोव्हेंबर, 2005 पूर्वी महानगरपालिका सेवेत रुजू झालेले (जुनी पेन्शन योजना अनुज्ञेय असेलेले) आहेत. अशा अधिकारी व कर्मचार्‍यांनी तत्काळ कर्तव्यावर रुजू व्हावे.

संबंधित विभाग प्रमुखांनी आपल्या आस्थापनेवर कार्यरत जुन्या पेन्शन योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांना तत्काळ कर्तव्यावर रुजू होण्याबाबत निर्देश द्यावेत. तशा सूचना लेखी स्वरूपात संबंधितांना देण्यात याव्यात.
निर्देशांचे पालन न झाल्यास तसेच असे अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर तत्काळ रुजू न झाल्यास महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 मधील नियम क्रमांक 6 चा भंग केल्याने शिस्त भंग कारवाईस पात्र राहतील असा इशारा दिला आहे

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा