बनावट व्हिसाप्रकरणी होणार कारवाई
कॅनडामध्ये शिक्षणासाठी गेलेल्या ७०० भारतीय विद्यार्थ्यांना परत पाठवण्याचा निर्णय कॅनडा सरकारने घेतला आहे. या विद्यार्थ्यांनी कॅनडातील शैक्षणिक संस्थाना दिलेली कागदपत्रे आणि व्हिसा बनावट असल्याचे उघड झाल्यानंतर कॅनडा बॉर्डर एजन्सीकडून या विद्यार्थ्यांना भारतात जाण्यासंदर्भात नोटीस पाठवण्यात आली आहे.
“खासगी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या ७०० विद्यार्थ्यांनी जालंधरमधील ब्रिजेश मिश्रा नावाच्या ट्रॅव्हल एजंटद्वारे व्हिसासाठी अर्ज केला होता. यासाठी त्याने प्रत्येक विद्यार्थ्याकडून १६ लाख रुपये घेतले होते. यामध्ये कॅनडातील नामांकित हंबर महाविद्यालयाचे प्रवेश शुल्क आणि तिथे राहण्याच्या खर्चाचा समावेश होता.
हे ७०० विद्यार्थी २०१८-१९ या वर्षात कॅनडामध्ये शिक्षणासाठी गेले होते. मात्र, कॅनडामध्ये कायमस्वरुपी रहिवासी दाखल्यासाठी अर्ज केल्यानंतर त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांनी व्हिसासाठी दिलेले प्रवेश पत्र बनावट असल्याचे उघड झाले. यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाले असून त्यांनी कॅनडात काम करण्याचा परवानाही प्राप्त केला आहे.
जालंधरमधील एका ट्रॅव्हल एजंटने खासगी वृत्तसंस्थेला सांगितले की, या प्रकरणी विद्यार्थ्यांना त्याच महाविद्यालयाचे प्रवेश प्रत्र देण्यात आली, ज्या महाविद्यालयाचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर एकतर महाविद्यालय बदलण्याची पाळी आली, किंवा त्यांना पुढच्या सेमीस्टरपर्यंत थांबावे लागले. त्यामुळे व्हिसासाठी अर्ज करताना त्यांच्या कागदपत्रांवर चालू सेमीस्टरचा उल्लेख नव्हता.
कॅनडामध्ये अशा प्रकारचा गैरव्यवहार पहिल्यांदाच पुढे आला असून याचा परिणाम इतर व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या इतर भारतीयांवर होण्याची शक्यता असल्याचं तज्ज्ञांनी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले.