मुंबई : दूरदर्शनवर १९८० च्या दशकात गाजलेल्या नुक्कड मालिकेतील अभिनेते समीर खक्कड उर्फ खोपडी यांचे बुधवारी निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आहे. नुक्कडमधील समीर खक्कड यांची मद्यपीची भूमिका गाजली होती.
काही दिवसांपूर्वी प्राईम व्हिडिओ मालिका फर्जीमध्ये ते दिसले होते. 1990 च्या दशकात ते सॉफ्टवेअर डेव्हलपर होण्यासाठी अमेरिकेत गेले होते. श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना मंगळवारी बोरीवलीतील एमएम रुग्णालयात दाखल केले होते. नंतर प्रकृती बिघडली. एक एक अवयव निकामी होत गेले. बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती त्यांचे बंधू गणेश खक्कड यांनी दिली. त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. ते बेशुद्ध पडले. डॉक्टरांनी त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केले होते. बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्यास सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे ते म्हणाले. बोरीवली स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
समीर खक्कड यांनी दूरदर्शनवरील विविध मालिकांमध्ये काम केले. त्यामध्ये सर्कस, श्रीमान श्रीमती यांचा तर परिंदा, सलमान खान याची भूमिका असलेला जय हो, सिद्धार्थ मल्होत्रा आणि प्रणिती चोप्रा यांच्या हसे तो फसे, सुधीर मिश्रा दिग्दर्शन सिरीयस मॅन आणि विकास बहल यांची वेबसिरीज सनफ्लावर मध्ये ते चमकले होते.