अहमदनगर शहर वार्तापत्र : बाळासाहेब धस

शहरात महापालिका स्थापन होऊन 20-22 वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र ज्या उद्देशाने तिची स्थापन झाली, तो उद्देश अद्यापही सफल झालेला नाही. नागरिकांना ज्या मूलभूत सोयीसुविधा हव्यात, त्या अद्यापही मिळल्या नाहीत. त्यात शहरातील अतिक्रमणांमुळे होणारी वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. बाजरपेठ, महत्वाचे चौक, महामार्गाच्या दोन्ही बाजूला झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी नित्याचीच. शहरात नव्याने झालेल्या उड्डाणपुलामुळे काहीअंशी दिलासा मिळाला असलातरी शहरातील वाहतूक कोंडी मात्र आहे तशीच. महापालिका अतिक्रमण पथकाकडून मोहीम राबविण्यात येते. मात्र अतिक्रमण हटाव पथक पुढे जाताच काही वेळातच परिस्थिती ‘जैसे थे’ झाल्याचे चित्र सर्रासपणे दिसते. त्यामुळे या मोहिमेत सातत्य ठेवणे महत्वाचे आहे. शहराचा मोठा विस्तार झाला असून, उपनगरांची संख्याही वाढत आहे. त्याच प्रमाणात अतिक्रमणही वाढत असल्याचे दिसून येते. जागरूक नागरिकांसह स्वयंसेवी संघटना नेहमीच याविरोधात आवाज उठवतात. मात्र त्यावर तात्पुरती मलमपट्टी करण्यात येते.

शहरवासीयांना मूलभूत सुविधा देण्यासाठी महापालिका कर्मचार्‍यांचीही कमतरता भासत आहे. अपुर्‍या कर्मचार्‍यांअभावी अतिक्रमण मोहीम राबविताना त्याची उणीव प्रामुख्याने जाणवते. त्यात राजकीय हस्तक्षेप, अतिक्रमणधारकांची दांडगाई याला सामोरे जावे लागते. बाजारपेठेत जाताना चारचाकी, दुचाकी, शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर दुतर्फा खाद्यपदार्थांच्या हातगाड्या, फळविक्रेते, पानाच्या टपर्‍या टाकून व्यवसाय थाटल्याने काही ठिकाणी नागरिकांना पायी चालणेही मुष्कील होते. बाजारपेठेतील व्यापार्‍यांनी व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी रस्त्यावर लावलेले जाहिरातीचे फलकही वाहतुकीला अडथळा ठरत आहेत.

शहरातून जाणार्‍या महामार्गांवर कडेला पादचार्‍यांसाठी असलेल्या जागेवर चहा, वडापाव, पानटपर्‍या, भाजीवाले, फळविक्रेते बसल्यामुळे पायी चालण्यासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे पादचार्‍यांना मुख्य रस्त्यावरूनच प्रवास करावा लागतो. अशावेळी पाठीमागून येणार्‍या वाहनांकडून धडक बसून अपघात होऊन त्यात अनेकजण जखमी झाल्याचीदेखील उदाहरणे आहेत.

शहरातील सावेडी, प्रोफेसर चौक, माळीवाडा, तारकपूर, एसबीआय चौक, दिल्लीगेट, कापडबाजार, चितळे रोडवरच वाहने लावल्यामुळे वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे नागरिकांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागतो. वाहतूक पोलिसही कधीतरी कारवाई करतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी कारवाईत सातत्य ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे बेशिस्त वाहन चालकांमुळे होणारी वाहतूक कोंडी टळेल.

महापालिका प्रशासन नागरिकांच्या तक्रारी आल्यावर अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेते. मात्र त्यांनाही पुरेसे मनुष्यबळ, पोलिस संरक्षण न मिळाल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातच या पथकावर हल्ले झाल्याचीही घटना घडतात. जुलै 22 मध्ये जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बाबा बंगाली चौकात अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या महापालिका कर्मचार्‍यांवर जमावाने केलेल्या दगडफेकीत दत्तात्रय जाधव हा कर्मचारी गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी कोतवाली पोलिसांत 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ महापालिका कर्मचारी संघटनेच्यावतीने घटनेचा निषेध करून काम बंद आंदोलनही पुकारले होते.

शहरातील काही भागांत सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना अनधिकृत उभारलेली मंदिरेही पाडण्याची कारवाई मनपाने केली होती. अनधिकृत मंदिरे हटवण्यासाठी मनपाच्या अतिक्रमण विभागामध्ये 50पेक्षा जास्त हंगामी स्वरुपात कर्मचारी घेऊन त्यांच्या मदतीने 3 अनधिकृत मंदिरे हटविण्यात आली. मात्र पुढे ही कारवाई रेंगाळली. सावेडी उपनगर, न्यू आर्टस् महाविद्यालयासमोरील परिसर, सिद्धीबागेसमोरील परिसर, दिल्लीगेट, चौपाटी कारंजा, चितळे रोड, कापड बाजार आदी मुख्य बाजारपेठेतील अनधिकृतरित्या सार्वजनिक रस्त्यांचा दुरुपयोग करून अतिक्रमण करणार्‍यांविरुद्ध व्यापारी महासंघ वेळोवेळी आवाज उठवते. मात्र तात्पुरती कारवाई केली जाते. हातगाडीधारक, पथारीवाले यांना व्यवसायासाठी पर्यायी जागा देण्याची मागणी होत आहे. गंजबाजार, फळ मार्केट, माळीवाडा आदी भागांत कायमच वर्दळ असते. याठिकाणी अस्ताव्यस्त लावलेली वाहने, ताडपत्री, प्लॅस्टिक कागद, झेंडे, जाहिरातींचे, हातगाड्या, होर्डिंग्ज यामुळे कायमच वाहतूक कोंडी होते. येथे महापालिका कारवाईमध्ये सातत्य ठेवणे आवश्यक आहे.

एकंदरीत पाहता मनपाने अतिक्रमण मोहिमेत सातत्य ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरून अतिक्रमणाला आळा बसून वाहतूक कोंडीही टाळता येईल. तसेच बाजारपेठेत वर्दळीच्या ठिकाणी पोलिसांच्या वाहतूक शाखेने चारचाकी व दुचाकी वाहनांना अटकाव करावा, जेणेकरून वाहतूक कोंडी टळून नागरिकांना त्रास होणार नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा