मुंबई, (प्रतिनिधी) : सभागृहात सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी मंत्रीच उपस्थित नसल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत संताप व्यक्त केला. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही नाराजी व्यक्त करीत मंत्री सभागृहात उपस्थित राहतील याची गंभीर दखल घेण्याची सूचना सरकारला केली.

विधानसभेच्या विशेष बैठकीत सकाळी 9 लक्षवेधी सूचनांवर चर्चा होणार होती. परंतु, संबंधित खात्याचे मंत्री नसल्याने लक्षवेधी पुढे ढकलावी लागली. यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. राज्यातील सर्वसामान्यांचे, कष्टक-यांचे, शेतकर्‍यांचे तसेच आपल्या मतदारसंघातील प्रश्न विविध संसदीय आयुधांचा वापर करुन सदस्य सभागृहात प्रश्न मांडतात. हे प्रश्न सोडवण्यासाठी व त्यावर सरकारकडून यावर उत्तर देण्यासाठी विधानसभेत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येते. मात्र, सरकारमधील मंत्री याबाबत गंभीर नाहीत. सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला मंत्री सभागृहात उपस्थित नसतात. त्यामुळे सभागृह तहकूब करण्याची नामुष्की अनेक वेळा येते. सभागृहाच्या शिस्तीला धरुन हे योग्य नाही तरी संबंधितांना कडक शब्दांत समज देण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली.

काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब थोरात यांनीही मंत्र्यांच्या अनुपस्थितीवर नाराजी व्यक्त केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दखल घेतली. मंत्र्यांअभावी लक्षवेधी सभागृह तहकूब करावे लागले. सभागृहात मंत्री उपस्थित राहतील याची दखल घ्यावी, अशी सूचना अध्यक्षांनी केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा