पिंपरी : सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत डी मार्टजवळ मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या नायजेरीयन तरुणाला अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थविरोधी पथकाने सोमवारी (दि. 13) ही कारवाई केली.
बनकोले युसुफ ओओलाबी (वय 24, सध्या रा. मोरया पार्क, सांगवी) असे अटक केलेल्या नायजेरियन नागरिकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी पथक सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार प्रदीप शेलार व संदीप पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सांगावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा एक नायाजेरियन इसम अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी डी मार्टजवळ येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. एक संशयित नायजेरीयन तरुण दुचाकीवरून आला. पोलिसांना पाहताच तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता त्याच्याकडील काळ्या रंगाच्या पाउचमध्ये मेफेड्रॉन (एमडी) हा अमली पदार्थ मिळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून 68 हजार रुपयाचे 17 ग्रॅम एमडी हा अमली पदार्थ व 60 हजार रुपयांची दुचाकी असा एकूण 1 लाख 28 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. त्याच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.