लिंक तुटलेली माणसे

आपल्या जीवनात किती तरी माणसे येतांत जातात. ती का येतात याचा विचार कधी मनात आला कां? माझ्या मनात अनेक दिवसांपासून हे विचांरांचे वादळ उठलंय.
ही लिंक कशी जुळते? अगदी आपल्या जन्मापासूनच ती सुरू होते. या तारा अनेक नाती, मैत्री यांच्याशी जोडल्या जातात. काही दिवसांनी, काही वर्षांनी यांतील नाती संपुष्टात येतात. म्हणजे काही वयस्क काळा पलीकडे जातात. काही बदली, सेवानिवृत्ती, लग्न, शिक्षण इ. कारणांमुळे दूर जातात, व ही लिंक तुटते. माणसे दूर जातात. काही तर त्यातले पुन्हा म्हणून आयुष्यात दिसत नाहीत.
ही माणसं एका मर्यादेपर्यंतच आपल्या सोबत असतात. असं कां? तसंच मित्र व मैत्रीणींचं. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नवीन लोकं आयुष्यात येतात, व काही जीवलग बनून कायम आयुष्यात राहतात मदत करतात. काही कधीच पुन्हा म्हणून दिसत नाहीत. काही कधीतरी क्वचितच भेटून जातात व पुन्हा ही लिंक तुटते… काहींना आपण पटत नाही, किंवा काही आपल्याला पटत नाहीत. म्हणून लिंक तुटते.
हल्ली ही लिंक फोन, फेसबुक, व्हॉट्सअप इ. मार्गांनी साधण्याचा केविलवाणा प्रयत्न दिसतो, पण त्यात खरं सांगा प्रेम, आपुलकी जिव्हाळा दिसतो का? मला तरी नाही दिसत. लिंक असूनही लिंक तुटलेली व कृत्रिम लिंक जोडलेली माणसंच जास्त वाटतात.
हल्ली सर्वत्र मनातून लिंक तुटलेल्या कृत्रिम माणसांचाच वावर जास्त दिसतो. माणसं तुटली आहेत-तुटत चालली आहेत. काही हाताच्या बोटावर मोजण्या एवढीच लोकं आयुष्यात उरतात. त्यांची कदर करणं, त्यांना नीट ओळखणं, नीट वाचणं गरजेचं आहे. त्यांच्याशी मनातली लिंक मजबूत ठेवून एकमेकांना धरून रहा. खोट्या जगात राहून खोटा आनंद नका मिळवू. मनातलं सांगतां येणं व मन मोकळं करता येणं, या शिवाय दुसरा आनंद नाही.नाहीतर साठून-साठून नुसते ढग साठत जातात व मग ढगफुटी होते. ज्यांनी लिंक तोडली किंवा तुटली अशा माणसांना आपल्यापासून सहजपणे दूर ठेवून जगतां आलं पाहिजे. जीवनाचा निखळ आनंद अगदी छोट्या छोट्या गोष्टीत लपलेला आहे, तो शोधता आला पाहिजे.
असं म्हणतात की, माणसं ही आपल्या कर्मानुसार आपल्या जीवनात येत-जात असतात. कर्म संपलं की नवीन लोकं नवीन कर्म. अशी ही लिंक बहुतेक अविरत शेवटच्या क्षणापर्यंत चालू असते.
काही प्रश्नांची उत्तर मिळतात, काहींची नाही. हे जीवन अजब न कळणारं मिश्रण आहे. पण लिंक तुटणारी माणसं मात्र येतात-जातात. हे ही तितकंच खरं. शेवटी म्हणावसं वाटत की,
ये जीवन है, इस जीवन का यही है,
यही है रंग रूप।
थोड़े गम है, थोडी खुशीयाँ, यही है
रंग रूप। ये जीवन है।

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा