बोगस डॉक्टरांवर कारवाई हवी

मुंबईतील गोवंडी येथे बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली. येणार्‍या रुग्णांवर यूट्यूबवर असणार्‍या माहितीच्या आधारे उपचार करून रुग्णांच्या जीवाशी खेळणार्‍या डॉक्टरांवर करण्यात येणारी कारवाई योग्यच. परंतु, मुंबईतील दाट लोकवस्तीच्या ठिकाणी अवैध दवाखाने चालविणारे अनेक बोगस डॉक्टर केवळ गोवंडी परिसरातच मर्यादित नसून अनेक दाट लोकवस्तीच्या ठिकाणी आजही राजरोसपणे चालू आहेत. आता अटक करण्यात आलेले दोन बोगस डॉक्टर बारावी नापास आणि हकीम जडीबुटीवाले आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईत यूट्यूब माध्यमाचा आधार घेत रुग्णांवर उपचार करणारे हे बोगस डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळात होते. तसेच पोलीस कारवाई दरम्यान या बोगस डॉक्टरांच्या दवाखान्यात रुग्णांची सुद्धा गर्दी होती. हा प्रकार म्हणजे आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय असाच प्रकार चालला आहे, असे म्हणावे लागेल. अशा बोगस डॉक्टरांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.

दत्तप्रसाद शिरोडकर, मुंबई

स्वप्नवत कल्पना

रविवार केसरी दि.5 मार्चमधील देशात बदलाचे वारे हे पवार यांचे वक्तव्य वाचून कुंडातल्या पाण्यावरून नदीच्या प्रवाहाची दिशा ठरवण्याचा प्रयत्न दिसला. मान्य आहे की जवळजवळ 30 वर्षांनी काँग्रेसच्या विजयाची पुण्याच्या कसबा पेठेत पुनरावृत्ती झाली; पण त्यामागची कारणे स्थानिक आहेत. त्यावरून देशातील राजकीय विजयमालिकांच्या बदलाचे वारे कसे ठरवता येतील? एकतर कसबा पेठ गिरीश बापटांचा प्रभाग, त्यांच्या प्रकृतीमुळे भाजप प्रभावाखाली राहिला नाही, प्रकृती अस्वास्थ्यातही त्यांना प्रचाराला आणले गेल्याची नाराजी जनमानसात तयार झाली, कै. मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तींचा विचार उमेदवारीसाठी भाजपकडून झाला नाही, याबद्दल नाही म्हटले तरी कुठेतरी खदखद असणार, शिवाय मतदान केवळ 50%, त्याला कित्येक भाजपधार्जिणांची उदासीनता कारणीभूत असू शकते. तेव्हा केवळ कसब्यातील पडसाद नागपुरात अन् मग राज्यात, तसेच देशात उमटतील ही कल्पना स्वप्नवत वाटते. यातून काँग्रेसमध्ये अनुकूल बदल घडू लागलेत हा आशादायी विचार तेवढा भावण्याजोगा आहे.

श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे

महिला कोषाचे भांडवल वाढवा

जास्तीत जास्त महिलांचा सहभाग राष्ट्र व समाज उभारणीकामी लागावा व त्यातून महिलांनी स्वतः बरोबर कुटुंबाचाही विकास साधावा, यासाठी राष्ट्रीय महिला कोषाचे भाग भांडवल सरकारने आणखी मोठ्या प्रमाणात वाढवून ते जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहचविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावे, अशी अपेक्षा आहे. शासनाने महिला विकासाबाबत झुकते धोरण ठेवावे व महिलांचा राष्ट्र विकास कामात जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, अशी अपेक्षा आहे. महिलांनीसुद्धा शासकीय सोयी, सवलतीचा लाभ अधिक प्रमाणात घ्यावा.

धोंडीरामसिंह ध. राजपूत, वैजापूर

असंघटित कर्मचार्‍यांच्या समस्या

देशात केंद्र सरकार व राज्य सरकारी सेवक मान्यताप्राप्त संस्था, उद्योगातील नोकरांना ठराविक पगार दिला जातो. मात्र-सुमारे बारा तासांपेक्षा अधिक वेळ राबवून घेतल्या जाणार्‍या गाडीचालक, प्रेस कामगार, झेरॉक्स मशीन ऑपरेटर, कापड दुकानातील नोकर, डेअरी, दुकान, स्टेशनरी दुकान, हॉटेल कामगार अशासारख्या नोकरांना मालक देईल त्या पगारात काम करावे लागते. तुटपुंज्या पगारात कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण करणे होत नाही. यामुळे गरीब अधिक गरीब धनिकांची चलती चालू आहे. या कामगार, नोेकरांच्या संघटना नाहीत. यासाठी या नोकर्‍यांना दरमहा पंधरा हजारापेक्षा अधिक पगार दिला जावा, शिवाय आठ तासांपेक्षा पुढच्या तासासाठी ओव्हरटाईम मिळावा. याची दखल शासनाकडून होणे ही काळाची गरज आहे. आठवड्याची सुट्टी देणे शक्य नसल्यास सुट्टीचा पगारही दिला जावा. कुपोषण, दारिद्र्य आर्थिक विषमता शासकीय पातळीवरून दूर व्हावी.

वि. ना. सुतार, राजगुरूनगर, पुणे.

पाण्याची बचत करा

उन्हाळा सुरू झाला की सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागते. मराठवाडा आणि विदर्भात तर हंडाभर पाण्यासाठी कैक किलोमीटरची पायपीट करावी लागते. काही गावात पंधरा दिवसांनी, तर काही गावात महिन्यांनी पिण्याच्या पाण्याचा टँकर येतो. पाण्यासाठी दाहीदिशा अशी एकीकडे अवस्था असताना पुण्यामुंबईतील लोक मात्र पाण्याचा अपव्यय करताना दिसतात. चोवीस तास पाण्याची चंगळ असल्याने त्यांना कदाचित पाण्याचे महत्त्व माहीत नसेल. पुण्या-मुंबईसारख्या शहरातील काही बेजबाबदार घटक पुरेसे पाणी मिळाल्यानंतर पाण्याची नासाडी करताना दिसतात. नळ खुले सोडून पाणी वाया घालवीत असतात. वास्तविक थेंब न थेंब पाण्याची बचत केली पाहिजे, कारण पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती आहे.

श्याम ठाणेदार, दौंड, जिल्हा पुणे

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा