श्रीरामपूर, (वार्ताहर) : भारत 2026 पर्यंत अखंड हिंदू राष्ट्र म्हणून घोषित होईल, असा दावा भाजपचे निलंबित नेते आणि आमदार टी.राजा सिंह यांनी मंगळवारी केला.
जगात 50 हून अधिक इस्लामिक राष्ट्रे होऊ शकतात, 150 हून अधिक ख्रिश्चन राष्ट्रे असू शकतात, तर 100 कोटींपेक्षा अधिक हिंदू राहात असलेला भारत हिंदू राष्ट्र का होऊ शकत नाही? असा सवाल त्यांनी केला. 2025-26 या काळात भारत अखंड हिंदू राष्ट्र घोषित होईल. हे केवळ आपलेच नव्हे, तर साधू-संतांचे आणि भविष्यवाणी आहे, असेही त्यांनी सांगितले.
येथील थत्ते मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आमदार सिंग यांच्या सभेचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना ते बोलत होते. हिंदू युवा वाहिनीच्या प्रदेशाध्यक्ष रागिनी तिवारी, शरद मोहोळ, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले आदी उपस्थित होते.
अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नगर करण्याची मागणी आहे. त्याचबरोबर तेलंगणाची राजधानी हैदराबादचे नावही भाग्यनगर करण्याचा विचार असल्याचा दावा त्यांनी केला.
मुस्लिमांसाठी वक्फ मंडळ, वैयक्तिक कायदा मंडळ होऊ शकतो; तर हिंदूसाठी सनातन मंडळ, हिंदू वैयक्तिक कायदा मंडळ का होऊ नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. हिंदू मंदिरांत जमा होणार्या दानापैकी 20 टक्के रक्कम मंदिर निर्मितीसाठी व हिंदू कार्यकर्त्यांची अन्याय, अत्याचारातून सुटका होण्यासाठी खर्च करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.