जुन्या पेन्शनच्या मागणीवर तोडगा काढा : नाना पटोले
मुंबई, (प्रतिनिधी) : जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी 20 लाख कर्मचारी संपावर गेले आहेत. यामुळे आर्थिक बोजा पडेल, असे सांगणार्या सरकारकडे मूठभर उद्योगपतींची कोट्यवधींची कर्जे माफ करण्यासाठी पैसा आहे; पण शेतकरी व शासकीय कर्मचार्यांसाठी पैसा नाही. हा सरकारचा ढोंगीपणा असून, केंद्र व राज्यातील भाजप सरकार शेतकरी व सरकारी कर्मचारीविरोधी आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी केली.
विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, सरकारी कर्मचार्यांच्या संपामुळे प्रशासकीय व्यवस्था विस्कळीत झाली आहे, जनतेची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून, कर्मचार्यांनी हा संप तातडीने मागे घ्यावा, यासाठी सरकारने मध्यस्थी करणे गरजेचे आहे.काँग्रेसशासित राजस्तान, हिमाचल प्रदेश व छत्तीसगडमध्ये जुनी सेवानिवृत्ती योजना लागू करण्यात आलेली आहे. जे काम काँग्रेसशासित राज्ये करू शकतात तेच काम महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार का करू शकत नाही? सरकारी कर्मचार्यांच्या जुनी सेवानिवृत्ती योजना लागू करण्याच्या मागणीवर राज्यातील भाजपप्रणित सरकारने तोडगा काढावा; अन्यथा खुर्ची खाली करावी.
शेतकरी मोर्चा
नाशिकहून लाखो शेतकरी विधान भवनवर मोर्चा घेऊन येत आहेत, त्यांच्या पायाला जखमा झाल्या आहेत, चालून चालून पायाला फोड आले आहेत; पण राज्य सरकारला त्यांची दया येत नाही. हे सरकार शेतकर्याला मदत करत नाही. कांद्याला फक्त 300 रुपये अनुदान देऊन शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकारने धानाला 3,000 रुपये भाव व 600 रुपये बोनस दिला आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार मात्र 350 रुपये देत आहे. महाविकास आघाडी सरकार धान उत्पादक शेतकर्याला 700 रुपये बोनस देत होते. भाजप सरकार फक्त उद्योगपतींचे आहे. गरिबांचे, शेतकर्यांचे, कर्मचार्यांचे सरकार नाही. भाजप सरकारकडे या घटकांना देण्यासाठी पैसा नाही हे दुर्दैवी आहे, अशी टीका पटोले यांनी केली.