कृषिमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई, (प्रतिनिधी) : पीक विमा कंपन्या शेतकर्‍यांना चांगली भरपाई देत असून, उर्वरित 503 कोटींची रक्कम पुढील 15 दिवसांत शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. कृषी विभागांतील बदल्यांना स्थगिती दिलेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट सांगितले.

नियम 293 अन्वये उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना कृषिमंत्री सत्तार यांनी पीक विम्याबाबत तपशीलवार माहिती दिली. पीक विम्याचे 63 लाख 11 हजार 235 लाभार्थी आहेत. 50 लाख, 98 हजार 99 शेतकर्‍यांना 2 कोटी 356 लाख भरपाई मिळाली आहे. अद्याप 503 कोटींची पीक विम्याची रक्कम प्रलंबित असून ती पुढील 15 दिवसांत जमा होईल. तर सरकारने पीक विम्यासाठी केवळ एक रुपयांत नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजवर कुठल्याही अर्थमंत्र्याला हे सुचले नाही, तो निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. या योजनेसाठी तीन हजार 312 कोटींची तरतूद केली आहे. सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना दोन हजार 342 कोटी बँक खात्यात जमा केले असल्याचे सत्तार यावेळी म्हणाले.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील दोन टक्केही खर्च झाले नाही, असे म्हणणे बरोबर नाही. या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात 65 कोटी, 88 लाख म्हणजे 80 टक्के पैसे खर्च झाले आहेत. 108 कोटींचा दुसरा टप्प्यातील निधी प्राप्त झाला असून 31 मार्चपूर्वी हा निधी खर्च केला जाईल. या निधीतून 58 कोटी, 48 लाखांच्या कामांना मंजुरी देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

चर्चेला उत्तर देताना अब्दुल सत्तार यांनी हातातील कागद वाचत भाषण करण्यास सुरवात केली. त्यावर जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला. मंत्र्यांनी वाचून उत्तर देऊ नये, असे त्यांनी सांगितले. तेव्हा, नावे चुकू नये म्हणून वाचून दाखवत असल्याचे स्पष्टीकरण सत्तार यांनी दिले त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचे नाव तरी वाचून दाखवण्याची वेळ येऊ देऊ नका, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. अखेर हातातील कागद बाजूला ठेवून सत्तार यांनी उत्तर दिले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा