चेन्नई : ऑस्कर पुरस्कार विजेता ‘एलिफंट व्हिस्पर’ माहितीपटातील दाम्पत्य कलाकार बोम्मन आणि बेल्‍ली यांना तामिळनाडू सरकारने प्रत्येक एक लाख रुपयाचे धनादेश बक्षीस म्हणून दिले आहेत. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांचा सत्कार केला. तसेच हत्तींच्या संरक्षणासाठी भरघोस मदतदेखील जाहीर केली आहे.

हत्ती आणि माहूत यांच्या जीवनावर आधारित तसेच हृदयाला हात घालणारा हा माहितीपट आहे. निलगिरी जिल्ह्यातील मुदुमालाई येथील हत्तींची देखभाल करणार्‍या दांपत्याची भेट मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी घेतली. प्रत्येकी एक लाख रूपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह आणि शाल घालून त्यांचा सत्कार केला.

राघू आणि अमू या हत्तीच्या पिल्‍लांमधील आणि त्यांची देखलभाल करणार्‍या दाम्पत्यांतील अतूट नाते, प्रेम दाखविणारा माहितीपट केवळ ३९ मिनिटांचा आहे. गुनीत मोंगा आणि अचीन जैन यांच्या ‘सिख्या’ एंटरटेन्मेंटने तयार केला होता.

हत्तींच्या संरक्षणासाठी भरघोस मदत

या वेळी स्टॅलिन यांनी मुद्दुमलाई आणि अण्णामलाई येथील हत्तीच्या देखभाल केंद्रातील ९१ जणांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्याची तसेच ९.१० कोटी रुपये घरबांधणीसाठी देण्याची घोषणा केली. काईमत्तूर जिल्ह्यात अण्णामलाई व्याघ्र प्रकल्पात हत्ती देखभाल केंद्र आहे. त्याच्या विकासासाठी ५ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. दरम्यान, स्टॅलिन यांनी दाम्पत्याची घेतलेल्या भेटीबद्दल माहितीपटाचे दिग्दर्शक कार्तिक गोन्साल्विस यांनी आनंद व्यक्‍त केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा