मोशीत रुग्णालय,इंद्रायणीचे पुनरुज्जीवन

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचे सन 2023-24 या आर्थिक वर्षाचे मूळ 5298 कोटी, तर केंद्र सरकार पुरस्कृत योजनांसह 7127 कोटी 88 लाख रुपयांचे अंदाजपत्रक आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सादर केले. अंदाजपत्रकात शहरी गरिबांसाठी 1584 कोटी रुपये, महिलांच्या योजनांसाठी 48.54 कोटी, दिव्यांग कल्याणकारी योजनांसाठी 45 कोटी, पाणीपुरवठा विशेष निधीसाठी 154 कोटी रुपये तरतूद आहे. मोशी येथे साडेसातशे बेडचे रुग्णालय, मासुळकर कॉलनी येथे नेत्र रुग्णालय, पीपीपी तत्त्वावर कॅन्सर रुग्णालय, कर्जरोख्यांद्वारे निधी उभारून पवना, इंद्रायणी, मुळा नद्यांचे पुनरुज्जीवन या अंदाजपत्रकातील प्रमुख तरतुदी आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या विशेष सभेस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे उपस्थित होते.

जमा बाजूस आरंभीची शिल्लक पाच कोटी सत्तर लाख रुपये दाखवली आहे. स्थानिक संस्था करातून 11 कोटी, वस्तू व सेवा करातून 2213 कोटी, कर संकलनाद्वारे 850 कोटी, गुंतवणुकीवरील व्याज व इतर मार्गाने 124 कोटी रुपये जमा अपेक्षित करण्यात आली आहे. पाणीपट्टी व इतर मार्गाने 88 कोटी बांधकाम परवानगी विभागाद्वारे 950 कोटी अपेक्षित आहे. अनुदानेद्वारा 341 कोटी 17 लाख, भांडवली जमा सहाशे एक, तर इतर विभागाद्वारे जमा 108 कोटी तेरा लाख दाखवली आहे. खर्च बाजूस सामान्य प्रशासनासाठी 1251 कोटी 39 लाख, नियोजन व नियमनासाठी 166 कोटी 47 लाख, सार्वजनिक बांधकामासाठी 1453 कोटी 33 लाख, आरोग्यासाठी 372 कोटी 12 लाख ,स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनासाठी 478 कोटी 42 लाख, नागरी सुविधांसाठी 561 कोटी 69 लाख, शहरी वनीकरणासाठी 518 कोटी 64 लाख, शहरी गरिबी निर्मूलन व समाज कल्याणासाठी 171 कोटी 97 लाख, इतर सेवांसाठी 244 कोटी 92 लाख, महसूलसाठी 73 लाख खर्च बाजूस दाखविले आहेत.

अंदाजपत्रकाची ठळक वैशिष्ट्ये

पायाभूत सुविधा प्रकल्प

मुख्य प्रशासकीय इमारत ऑटो क्लस्टरसमोरील जागेत बांधण्यात येणार आहे. या इमारतीत तीन तळघरांसह अठरा मजले प्रस्तावित आहेत. एकूण बिल्टप क्षेत्र नव्वद हजार चौरस मीटर प्रस्तावित आहे. एकूण 650 चारचाकी व तीन हजार आठशे दुचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय आहे. यामध्ये 300 सभासद अधिक दीडशे व्यक्ती बसू शकतील इतक्या क्षमतेचे सभागृह, तसेच दोन हजार शंभर कर्मचारी आणि सहाशे नागरिकांसाठी पुरेशी जागा उपलब्ध होणार आहे. मध्यवर्ती अग्निशमन व प्रशिक्षण केंद्र पिंपरी येथील महिंद्रा कंपनीकडून ताब्यात आलेल्या जागेत अत्याधुनिक मध्यवर्ती अग्निशमन व प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी शंभर कोटी खर्च अपेक्षित आहे. प्राधिकरण परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रंथालय उभारण्याचे नियोजन केले आहे.

मोशी येथे हॉस्पिटलची सुमारे 6 हेक्टर जागा ताब्यात आलेली असून तेथे साडेसातशे बेडचे अद्ययावत हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. भविष्यात तेथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचे नियोजन असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

सदरचे रुग्णालय चिखलीत होणार होते. मात्र, वनविभागाच्या जागेच्या अडचणीमुळे ते मोशीला नेण्यात आले. तेथे गायरान जागेत ते उभारण्यात येणार आहे. मोशी येथे बारा एकर जागेवर विविध खेळांसाठी भव्य स्टेडियम उभारण्यात येणार आहे. सदर स्टेडियममध्ये स्पोर्ट्स क्लबचे नियोजन करण्यात आले आहे. पिंपरी डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपुलामुळे मुंबई पुणे रस्ता पिंपरी परिसरात थेट जोडण्यात येणार आहे. यामुळे सध्याच्या पुलावरील वाहतुकीचा ताण कमी होईल. मुंबई पुणे रस्त्यावरून पिंपरीतून पुढे पिंपळे सौदागरकडे जाणे सोयीचे होणार आहे.

पाणीपुरवठा

भामा आस्केड प्रकल्पात धरणाजवळ मौजे वाकीतर्फे वाडा येथे अशुद्ध जल उपसा केंद्र बांधणे व त्यासाठी जॅकवेलसह पंप हाऊस ब्रिज इंटेक्स चॅनल बनणे व इतर आनुषंगिक कामे करण्यात येणार आहे

आंध्र प्रकल्पाद्वारे पाणीपुरवठाविषयक सुधारणा व नवीन शंभर दशलक्ष लिटर प्रतिदिन पाण्याची उपलब्धता करण्यासाठी आंध्रा
धरणाजवळ अशुद्ध जल उपसा केंद्र बांधणे व त्यासाठी जॅकवेलसह पंप हाऊस ब्रिज इंटेक्स चॅनेल बांधणे व आनुषंगिक कामे करण्यात येणार आहेत

वैद्यकीय

मोशी येथे नव्याने साडेसातशे बेडचे नवीन रुग्णालय, तसेच वैद्यकीय महाविद्यालय प्रस्तावित आहे. मासुळकर कॉलनी येथे नेत्र रुग्णालय लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तालेरा रुग्णालय येथे नवीन रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात असून, मल्टी स्पेशालिटी सेवा सुरू करण्यात येणार आहेत. नवीन तालेरा रुग्णालय सुरू केल्यानंतर सद्य:स्थितीतील जुने तालेरा रुग्णालयामध्ये वृद्ध रुग्णांसाठी सेवा देण्यात येणार आहे. पीपीपी तत्त्वावर कॅन्सर रुग्णालय प्रास्तावित आहे. थेरगाव रुग्णालयात ड्रामा सेंटर, तसेच पूर्ण क्षमतेने सर्जरी नेत्र विभाग, तसेच कान नाक घसा शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यात येणार आहे. आकुर्डी रुग्णालय येथे डायलिसिस सर्जरी व अस्थिरोग विभाग सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. नवीन भोसरी रुग्णालय येथे कान घसा व सर्जरी विभाग सुरू प्रस्तावित आहे. वाय सी एम रुग्णालय अध्यायवत करण्यात येणार आहे. मनपाच्या सर्व रुग्णालयांमध्ये दंतचिकित्सा सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

पर्यावरण अभियांत्रिकी जलनिस्सारण व आरोग्य

स्वच्छ करण्यासाठी शून्य कचरा झोपडपट्टी मॉडेल सुरू करण्यात आले आहे. नदी पुनरुज्जीवन प्रकल्प अंतर्गत शहरातून वाहणार्‍या मुळा पवना व इंद्रायणी या नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी कर्जरोख्याद्वारे निधी उभारण्यास शासनाने मंजुरी दिली असून, सन 2023-24 या आर्थिक वर्षांमध्ये सदरची कामे हाती घेण्यात येतील. मुळा नदी वाकड पूल ते सांगवी या 8.80 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे काम एप्रिल 2023 पासून सुरू करण्यात येणार आहे. हॉटेलमधील कचर्‍याचे बायोगॅसमध्ये रूपांतर करण्यात येणार असून, एप्रिल 2023 पर्यंत त्याचे काम पूर्ण होईल. 200 टी पी डी क्षमतेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प यावर्षी कार्यरत होईल. राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी शहरातील जास्त रहदारी असणार्‍या पाच चौकांमध्ये हवा प्रदूषण कमी करण्यासाठी मिस्ट टाईप वॉटर फाउंटन उभारण्यात येणार आहे. सन 2023 24 या वर्षात दोन लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

विद्युत

सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर शहरात 22 ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.

अग्निशमन

पिंपरी येथे मध्यवर्ती अग्निशमन व आणीबाणी नियंत्रण कक्ष तथा मुख्यालय व अग्निशमन प्रशिक्षण केंद्र इमारत उभारण्यात येणार असून त्यामध्ये अग्निशामक दलाच्या आठ ते दहा अग्निशामक वाहने एकाच वेळी टर्न आऊट सुविधा नियंत्रण कक्ष अग्निशमन प्रशासकीय इमारत वाहन दुरुस्ती कार्यशाळा स्वतंत्र ट्रेनिंग सेंटर ड्रिल टॉवर तसेच आपत्कालीन व्यवस्थापन केंद्र व नियंत्रण कक्ष व अधिकारी कर्मचार्‍यांसाठी 320
निवासस्थाने यांचा समावेश असेल

शिक्षण

स्मार्ट हेल्थकेअर- शैक्षणिक वर्षात जुलै ऑगस्ट व मनपा हॉस्पिटलमार्फत डिसेंबर
जानेवारी या महिन्यात सर्व विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी करण्यासाठी वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक दोष असतील त्यांच्यावर तातडीने उपचार केले जातील.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी 128 शाळांना ग्रंथालय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे

क्रीडा

शहरात वाकड येथे अत्याधुनिक आठ कोर्टचे बॅडमिंटन स्टेडियम बांधण्याचे नियोजित आहे.
अश्वरोहकांना प्रशिक्षण देण्यासाठी इक्वेस्टीयन अकादमी सुरू करण्याचे नियोजन आहे
रायफल आणि पिस्तूल शूटिंग आणि धनुर्विद्या अकादमी शहरात सुरू करण्याचे नियोजन आहे.
सार्वजनिक खाजगी भागीदारी किंवा इतर वित्तीय स्रोतांमार्फत करावयाची कामे
कर्जरोख्याद्वारे निधी उभारून पवना, इंद्रायणी व मुळा या नद्या पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम करण्यात येणार आहे. तसेच मोशी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. अण्णासाहेब मगर स्टेडियमचा क्लब हाऊस, बहुउद्देशीय इनडोअर हॉल ,स्पोर्ट अकादमी या तीन भागांमध्ये विकास नियोजित आहे

समाज विकास

महिला संसाधन केंद्र, कौटुंबिक हिंसाचार पीडित घटस्फोटित व अत्याचारित महिला वर्गास एकाच ठिकाणी समुपदेशन कायदेशीर सल्ला व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. युवतींना परदेशी शिक्षणासाठी अर्थसाहाय्य दिले जाईल. किशोरवयीन मुली व महिलांच्या आरोग्य सुधारण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत शहरातील सर्व दिव्यांग नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शून्य ते सहा वयोगटातील मुलांचे लवकर निदान व उपचार करण्यासाठी प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. मागासवर्गीय कल्याणकारी योजना अंतर्गत विविध शिष्यवृत्ती दिल्या जाणार आहेत.

अंदाजपत्रकाची वैशिष्ट्ये

4स्थापत्य विषयक योजनांवर 846 कोटी तरतूद 4शहरी गरिबांसाठी 1584 कोटी 4महिलांच्या विविध योजनांसाठी 48.54 कोटी 4दिव्यांग कल्याणकारी योजनांसाठी 45 कोटी 4पाणीपुरवठा विशेष निधीसाठी 154 कोटी 4 पीएमपीएमएलकरिता 294 कोटींची तरतूद 4भूसंपादनासाठी 120 कोटी तरतूद 4 अतिक्रमण निर्मूलन व्यवस्थेसाठी दहा कोटी तरतूद4 स्मार्ट सिटी साठी 50 कोटींची तरतूद 4 अमृत योजनेसाठी वीस कोटी रुपये तरतूद.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा