देखरेखीसाठी ‘हेरिटेज मार्शल’
मुंबई, (प्रतिनिधी) : गडकिल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहेत. या गडकिल्ल्यांवर मद्यपान करण्याचे प्रकारही उघडकीस येत असतात. राज्य सरकार असे प्रकार करणार्यांवर कठोर कारवाई करणार आहे. गडकिल्ल्यांवर मद्यपान करणार्यांना यापुढे किमान तीन महिने कारावास तसेच किमान दहा हजार रूपये दंड आकारण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी हेरिटेज मार्शल नेमण्यात येतील. जे स्वयंसेवक असे प्रकार उघडकीस आणतील त्यांना दंडाच्या पन्नास टक्के रक्कम बक्षिस म्हणून देण्याचेही प्रस्तावित आहे. राज्याच्या विधि व न्याय विभागाच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली. रायगड किल्ला केंद्र सरकारच्या अखत्यारित येतो. तो किमान पाच वर्षांसाठी तरी राज्य सरकारच्या ताब्यात द्यावा अशी विनंती केंद्राला केल्याचेही ते म्हणाले.
राज्यातील गडकिल्ल्यांच्या संरक्षण, जतन, संवर्धनाचा मुद्दा लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला होता. संग्राम थोपटे, अशोक चव्हाण, भीमराव तापकीर आदींनी हा मुददा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राज्यात 387 संरक्षित स्मारके आहेत. मागील सरकारच्या काळात या स्मारकांच्या देखभालीकडे दुर्लक्षच झाले होते. निधी देखील पुरेसा दिला जात नव्हता. आता मात्र जिल्हा नियोजनपैकी सुमारे 513 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. 75 स्मारकांच्या ठिकाणी जनसुविधा निर्माण करण्याचे कार्यही हाती घेण्यात आले असून त्यासाठी 65 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. सर्व 387 स्मारकांवर त्यांची माहिती क्यूआर कोडच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. किल्ल्यांवरील अतिक्रमणेही दूर करण्यात येत आहेत, असे मुनगंटीवार म्हणाले. भीमराव तापकीर यांनी सिंहगड किल्ल्याच्या पुणे आणि कल्याण दरवाजाचा भाग खचत चालल्याचे म्हटले होते; त्यावर आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही मुनगंटीवार म्हणाले.
रायगड किल्ला हा केंद्र सरकारच्या अखत्यारित येतो. त्यामुळे तिथे विविध परवानग्या मिळविण्यात अडचणी येतात. त्यासाठी हा किल्ला किमान पाच वर्षांसाठी राज्य सरकारच्या ताब्यात द्यावा अशी विनंती केंद्राला केल्याचेही ते म्हणाले.