स्मरण तेजाचे : संकलन : शैलेंद्र रिसबूड

लोकमान्य टिळक आणि आगरकरांनी चालू केलेले देशहितासाठीचे उपक्रम म्हणजे 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना, 1881 मध्ये ’केसरी/मराठा’ वृत्तपत्र, 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि 1885 मध्ये फर्ग्युसन कॉलेज. मात्र पुढील काळात या दोघांमध्ये राजकीय व सामाजिक सुधारणांमध्ये अग्रक्रम कशाला द्यावा यावरून वैचारिक मतभेद झाले. 1886 मध्ये लोकमान्य टिळकांनी दै.’केसरी’मध्ये अग्रलेख लिहिला. त्याचे शीर्षक होते – ’आधी कोण? राजकीय की सामाजिक? या लेखामधून ते आपली भूमिका मांडताना म्हणतात – ’ज्यांची गृहस्थिती सुधारली नाही त्यांची राजकीय स्थिती सुधारावयाची नाही असे ज्यांचे म्हणणे आहे त्यांचा असा भाव आहे काय की अमुक प्रकारची देशांतील लोकांची ग्रहस्थिती असली म्हणजे अमुक प्रकारची संतोष मानण्यासारखी राजकीय सुधारणा व्हावयाचीच नाही, किंवा अमुक प्रकारच्या गृहस्थितीत लोकांचे पाऊल राजकीय कामात पुढे पडायचेच नाही असा जर त्यांचा भाव असेल तर तो मोठ्या चुकीचा आहे. कारण एक तर गृहसुधारणा आणि राजकीय सुधारणा यांचे फारकत कोठे होते हे दाखवणे अत्यंत दुरापास्त आहे. तारतम्यदृष्टीने पाहिले असता ज्या मार्गाने कार्यशकटाच्या चक्रास कमीत कमी घर्षण होईल अशाने तो नेण्यात मनुष्याचा फायदा आहे, हे कोणीही कबुल करील. ज्या रस्त्यावर खाचखळगे नाहीत, त्यावरील मुरूम दाबून बसविलेला आहे, ज्याने प्रवास केला असता भामट्यांची भीती नाही व जो नेहमीच्या रहदारीचा आहे, अशाने जाणे अत्यंत श्रेयस्कर आहे. हिंदुस्तानसारख्या महाद्वीपतुल्य देशात सामाजिक सुधारणा लवकर घडून आणणे अत्यंत दुरापास्त आहे; व पूर्वीची स्थिती आज असती तर राजकीय सुधारणाही सामाजिक सुधारणेपेक्षा अधिक सुलभ झाली नसती. आमच्या देशांतील सुधारकांस दोन अवघड किल्ले सर करावयाचे आहेत; एक राजकीय स्वातंत्र्याचा व दुसरा सामाजिक स्वातंत्र्याचा.

आणखी एक लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट अशी आहे की राजकीय प्रकरणी वादांत तर्काचे बरेच प्राबल्य चालते; सामाजिक किंवा धार्मिक वादांत तो अगदी कुंठित होतो. पहिल्या वादांत बुद्धीवर प्रहार होत असतात; दुसर्‍या वादांत मनोविकार दुखावले जातात.

लोकमान्य टिळक आणि आगरकर यांच्यात सामाजिक सुधारणेबाबतीत भिन्न मते असली तरी त्यांच्यात वैरभाव निर्माण झाला नाही. आगरकरांना सामाजिक सुधारणांची निकड उत्कटपणे भासत होती. टिळकांना त्यांची अनेक मते पटत असली, तरी या टप्प्यावर लोकांच्या भावना दुखावणे इष्ट नाही, कारण त्यामुळे संपूर्ण परिवर्तनाच्या प्रयत्नांमध्ये अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे, असे त्यांना वाटत होते; परंतु, त्यांची राजकीय मते एकसारखीच होती. याचा सुगावा आगरकरांच्या ’डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस’ या उत्तम पुस्तकामध्ये सापडतो.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा