मिलिंद प्रभाकर सबनीस

साधारण दोन-अडीच दशकांपूर्वी चित्रपटांची पोस्टर्स हे जाहिरातीचे प्रभावी माध्यम होते. त्यातील आकर्षक मांडणी, रंगसंगती आणि चित्रपटातील आशय पोहोचवण्याचे सामर्थ्य यामुळे चित्रपटगृहांवरील मोठ्या भव्य पोस्टरप्रमाणे अनेक भिंतींवर लागणारी कागदी पोस्टर हे आकर्षण होते. अशा पोस्टरच्या लोकप्रियतेमुळे स्वातंत्र्यानंतरच्या काळात सामाजिक विषय, समस्या पोस्टरद्वारे चित्रकार मांडू लागले. अनेकवेळा खूप मोठा मजकूर जे काम करेल ते चित्रातून शब्दाविना किंवा अगदी मोजक्या शब्दात मांडता येते. हुंडा, गुटखा, गर्द, दारू, धूम्रपान आदि व्यसने त्याचे दुष्परिणाम अशा विषयांपासून ते थेट नेत्रदान, देहदान, हरितक्रांती, पर्यावरण संरक्षण, शेतकरी आत्महत्या, बालकांचे शोषण, व्याघ्र संवर्धन मोहीम, साक्षरता असे बहुविध विषय पोस्टरद्वारे मांडण्यात येऊ लागले. सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या संस्था, व्यक्ती यांना या माध्यमाचा उपयोग होऊ लागला.

अक्षरलेखन (कॅलिग्राफी), छायाचित्रण, चित्रकला या सर्वांचा संगम पोस्टरमध्ये असतो. आता संगणकीय वापरामुळे त्यात वैविध्य व नाविन्य येऊ लागले आहे. पोस्टर म्हणजे भित्तीचित्र याची निर्मिती हा एक स्वतंत्र कलाविष्कार आहे, हे मान्य करायला अनेक वर्ष जावी लागली. द्विमितीप्रमाणे कोलाज चिकट कामाचा उपयोग करून त्रिमितीचे उपयोगही या माध्यमात झाले. या माध्यमाची ताकद खूप मोठी आहे. काही काळापूर्वी भिंतींवर, काचफलकात व मोठ्या फलकांवर प्रदर्शित होणार्‍या पोस्टरची जागा आज समाजमाध्यमातील डिजिटल पोस्टरनी घेतली आहे. त्यामुळेच प्रबोधनाचा मोठा आशय मांडणारा हा कलाप्रकार आजही कालबाह्य नाही. उलट नवी झळाळी घेतो आहे.

पोस्टर या कला माध्यमांचा प्रभावी अविष्कार असलेल्या ’पोस्टर’ या कलाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. अभिनव कला महाविद्यालयाचे माजी प्रा. डॉ. मिलिंद फडके, प्रा. धनंजय सस्तकर तसेच काही चित्रकला शिक्षक व उपयोजित कला विषयातील तरुण विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी रेखाटलेली – पोस्टर्स या कलाप्रदर्शनात आहेत. कलाशिक्षक सुरेश वरगंटीवार यांनी यामधील बहुतांश चित्र रेखाटलेली आहेत. त्याचबरोबर या विविध सामाजिक विषयांवर विविध चित्रकारांकडून अशी प्रबोधनात्मक पोस्टर्स करून घेऊन त्याचे संकलन केले आहे. यावेळी ’पोस्टर’ हे विषयावरचे मराठीतील पहिले पुस्तक प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील सूत्रलेखन प्रख्यात चित्रकार प्रा. डॉ. मिलिंद फडके यांनी केले आहे. या पुस्तकाचे संकल्पक सुरेश वरगंटीवार यांनी संकलन व संपादन केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा