राहुल यांचे काय चुकले?

आपल्या इंग्लंडमधील वास्तव्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील सरकारवर टीका केली. त्यामुळे भाजप व त्यांचा परिवार संतापला आहे. ज्यांनी नि:पक्ष राहावयास हवे ते उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनीही राहुल यांच्यावर शाब्दिक हल्ला केला हे आश्‍चर्याचे आहे. सध्या देशात उच्चार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांची गळचेपी होत आहे हे जाणवत आहे. ‘सेंटर फॉर पॉलिसी रीसर्च’ आणि ‘बीबीसी’ यांची कथित तपासणी त्याच हेतूने झाली हे सामान्यांनाही कळते. माध्यमांना धमकावण्यासाठी त्यांच्यावर छापे घालणे, पत्रकारांना तुरुंगात डांबणे हे मुक्त लोकशाहीचे लक्षण नक्कीच नाही. राहुल गांधी यांनी त्यावरच बोट ठेवले, त्यात त्यांचे काय चुकले?

प्रा.सतीश जोशी, नंदुरबार

‘सर्वस्पर्शी अंदाजपत्रक’

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून प्रथमच विधानसभेत राज्याच्या सादर केलेल्या अंदाजपत्रकात ‘पंचामृत ध्येयावर’ आधारित समाजातील सर्व घटकांना पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील महिलांना बस प्रवासात 50 टक्के सवलत देऊन महिलादिनाची भेट दिली आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत शेतकर्‍याला प्रतिवर्षी रु. 6000/- देण्याची घोषणा, तसेच 1 रुपयात पीक विम्याचे कवच यामुळे बळीराजाचे बळ वाढणार आहे. भिडे वाड्याच्या तसेच महान राष्ट्रपुरुषांच्या स्मारकांसाठी व देवस्थानांच्या पुनर्विकासासाठी केलेल्या निधीची तरतूद हे या अंदाजपत्रकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. विद्यार्थी शिष्यवृत्तीत वाढ, इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ, तसेच विविध समाज घटकांच्या संस्थांसाठी भरीव निधीची तरतूदही यात आहे. राज्यातील महामार्ग, उड्डाणपूल, मेट्रो, विमानतळ या पायाभूत सुविधांकडे विशेष लक्ष देऊन विकासाचे जाळे विस्तृत करण्याचा स्तुत्य प्रयत्नही कौतुकास्पद म्हणावा लागेल.

सुरेश परांजपे, पुणे

लोककलावंताचे मानधन वाढवा

लोककलावंत-साहित्यिक, लोक प्रबोधनासह मराठी भाषा आणि संस्कृतीचे संवर्धन करीत आहेत. तमाशा कलावंत, वाघ्या-मुरळी, गोंधळी, वासुदेव, भराडी अशा विविध कलावंतांची वार्धक्यात दयनीय अवस्था आहे. अंदाजपत्रकात विद्यमान सरकारने काही चांगले निर्णय घेतले; तथापि, या तळागाळातील कलावंतांकडे लक्ष दिलेले नाही. सध्याच्या 2250 रु. मानधनावर उभयतांचा चरितार्थ या महागाईमध्ये भागू शकत नाही. शासनाने या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नाचा गांभीर्याने विचार करावा.

राम पां. लोखंडे, जुन्‍नर

फुटीरच मालक झाले ?

शिवसेना हे नाव व धनुष्य-बाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला मिळाले आहे; परंतु सर्वसामान्य जनता व मूळचे शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशीच राहतील, असे स्पष्ट दिसते. वास्तविक पाहता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या सक्रिय पाठबळाने शिवसेना फोडण्यात आली आहे आणि आता ते फुटीर लोकच शिवसेनेचे मालक झाल्याचे चित्र उभे झाले आहे; पण जनता सारे काही ओळखून आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेची जी काही पुण्याई आहे, ती फुटिरांना कदापि फळणार नाही, एवढे मात्र नक्की.

तरुणभाई खाटडिया, पुणे.

अर्थहिन अंदाजपत्रक

महाराष्ट्र राज्याचे अंदाजपत्रक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच सादर केले. सत्तेत असलेली आघाडी इतिहासात रमणारी दिसते. त्यामुळेच लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना आखण्या ऐवजी स्मारके, गड किल्ल्यांसाठी शेकडो कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्ष केवळ निवडणुकांचा विचार करतो हे अनेक वेळा दिसले आहे. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीवर लक्ष ठेवून मतपेढ्या भक्कम करण्यासाठी विविध समाजांसाठी महामंडळे स्थापण्याच्या घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या आहेत. या अंदाजपत्रकाचे उत्तम विश्‍लेषण ‘केसरी’ने ‘मतांच्या ‘अमृता’ची आशा’ या अग्रलेखात (10 मार्च) केले आहे. फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सतत कौतुक केले; पण वाढती महागाई, बेरोजगारी याबद्दल त्यांनी चकार शब्दही उच्चारला नाही. राज्यावरील कर्ज सात लाख कोटी रुपयांपर्यत गेले आहे ते कमी करण्याचीही योजना नाही. राज्याचा खरा, सर्वांगीण विकास करण्याचा ’संकल्प’ यात नाही त्यामुळेच हे अंदाजपत्रकही ‘अर्थ’हीन आहे.

गणेश बनसोडे, डोंबिवली

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा