1929 मध्ये ऑस्कर पुरस्कार सुरु झाला. सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट हा विभाग त्यानंतर अठरा वर्षांनी सुरु करण्यात आला. आतापर्यंत एकही भारतीय चित्रपट ‘ऑस्कर’ मिळवू शकला नाही.

‘नाटू नाटू…’ या गाण्याने ऑस्कर मिळविले. हे यश भारतीयांना सुखावणारे आहे. जगभरातील चित्रपटप्रेमींचे लक्ष ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळ्याकडे लागले होते. तो केवळ हॉलीवूडचा झगमगता सोहळा नसतो. चित्रपट कलेशी संबंधित सर्वोत्कृष्ट गुणवत्तेचा तो निर्विवाद गौरव असल्याने शर्यतीतील कलाकारांच्या नजरा त्यावर खिळलेल्या असतात. अभिनय, दिग्दर्शन, संगीत यांसह चित्रपटांशी निगडित विषयांत आपले कौशल्य पुरेपूर पणाला लावणार्‍या कलाकार, तंत्रज्ञांसाठी ऑस्करची बाहुली हे आयुष्यभराचे स्वप्न असते. यंदाच्या सोहळ्यात ‘एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अ‍ॅट वन्स’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला. याच चित्रपटासाठी मिशेल येओ हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला, तर ‘दी व्हेल’ चित्रपटातील अभिनयासाठी ब्रँडन फ्रेझर यांनी ऑस्कर पटकावला. ’दी एलिफंट व्हिस्पर्स’ या माहितीपटाला ऑस्कर मिळाल्याने भारतीयांच्या आनंदात भर पडली आहे. ऑस्कर आणि भारतीय चित्रपट हे समीकरण दुर्मिळ आहे. म्हणूनच जेव्हा एखाद्या भारतीय कलाकृतीचा जागतिक पातळीवर गौरव होतो तो देशासाठी अभिमानाचा क्षण ठरतो. जागतिक कीर्तीचे दिग्दर्शक सत्यजीत रे यांना चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या कारकिर्दीसाठी ऑस्करने गौरविण्यात आले होते. भानू अथैय्या यांना ’गांधी’ चित्रपटाच्या वेशभूषेकरता ऑस्करचा बहुमान मिळाला. त्यानंतर विख्यात संगीतकार ए.आर. रेहमान यांना ‘स्लमडॉग मिलेनिअर’ चित्रपटातील जय हो… या गाण्याकरता दोन ऑस्कर मिळाले. याच चित्रपटाच्या ध्वनिलेखनासाठी रेसुल पोकुट्टी यांचाही ऑस्करने गौरव झाला. आता ‘आरआरआर’ चित्रपटातील नाटू नाटू… गाण्याने ऑस्करद्वारे जगभरातील संगीतप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. एम.एम. किरवानी हे या गाण्याचे संगीतकार. हिंदीत देखील त्यांनी ठसा उमटविला आहे. किंबहुना हिंदी चित्रपट आणि संगीत हे नाते पुरते विस्कटून गेले असतानाच्या काळात किरवानी यांच्यासारख्या मोजक्याच संगीतकारांनी दर्जा आणि लोकप्रियता या दोन्हीत आपले स्थान निर्माण केले.

दाक्षिणात्य चित्रपटांचे गारूड

भारतीय चित्रपटसृष्टी म्हटल्यावर ढोबळमानाने हिंदी चित्रपट क्षेत्र अनेकांच्या डोळ्यासमोर येते. लोकप्रिय भाषेत म्हणायचे तर ’बॉलिवूड’! हॉलीवूडशी साधर्म्य आणि पूर्वीचे मुंबईचे नाव, यापलीकडे त्या नकलेतून काही ध्वनित होत नाही. आताचे ऑस्कर दक्षिणेतील प्रतिभेसाठी मिळाले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. दाक्षिणात्य चित्रपटांनी सध्या देशभरातील तमाम प्रेक्षकांवर गारुड केले आहे. काही वेळा दिपून टाकणार्‍या भव्य निर्मितीमुळे, अनेकदा अफाट कल्पकतेमुळे दाक्षिणात्य चित्रपट प्रेक्षकांवर जादू घडविणारे ठरले. एकदा का असा चित्रपट तेथे गर्दी खेचू लागला की अल्पावधीतच तो डब होऊन हिंदीत येतो.
‘आरआरआर’च्या बाबत तेच घडले. एस.एस. राजामौली यांचा तो मूळचा तेलगु चित्रपट. यातील नाटू नाटू… गाणे ग्रामीण जीवनातील चैतन्य अधोरेखित करते. पृथ्वीवरील धूळ आकाशापर्यंत पोहोचेल असे बेभान होऊन नाचा, या प्रकारचा चंद्रबोस लिखित या गाण्याचा मतितार्थ. काल भैरव, राहुल सिंपलीगुंज यांनी ते जेवढ्या जोशात गायले तेवढ्याच जोशात अभिनेते ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यांनी ते पडद्यावर सादर केले आहे. उत्कृष्ट मूळ गाणे या श्रेणीत या गीताची ऑस्करसाठी निवड झाली. भारतीय ग्रामीण जीवनातील रांगडा भाव या गीतात अचूक व्यक्त झाला हे निर्विवाद. एका तेलगु गीताला ऑस्कर मिळते आणि तामिळ या दाक्षिणात्य भाषेतील एक माहितीपट ऑस्कर विजेता ठरतो, हे लक्षणीय आहे. हिंदी चित्रपट क्षेत्राने यापासून बोध घ्यायला हवा. दाक्षिणात्य चित्रपट हिंदीत डब केले म्हणजे ते मूळ हिंदी चित्रपट ठरत नाहीत. त्यासाठी स्वतंत्र कल्पना, समर्पण, नव्या प्रतिभेचा शोध, मेहनत असे सर्वच पाहिजे. विपणन हा ऑस्करच्या शर्यतीत महत्त्वाचा भाग असला तरी उत्कृष्ट निर्मिती हाच अंतिम मानदंड आहे, हे लक्षात घेऊन भारतीय दिग्दर्शक, कलाकार यांनी प्रयत्नांमध्ये उणिवा ठेऊ नयेत. मदर इंडिया, सलाम बाँबे, लगान या तीनच हिंदी चित्रपटांना ‘ऑस्कर’मध्ये अधिकृत नामांकन मिळाले होते, हे विसरून चालणार नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा