स्मार्ट सिटी होताना : पुणे : सुरेश कोडीतकर

शहराच्या एका टोकाकडून मुठा पुण्यात येते. मुळा पिंपरी चिंचवडच्या वेशीवरून दापोडी खडकीमार्गे पुण्यात येते. संगमवाडीच्या हद्दीत या दोन्ही नद्यांचा संगम होतो. या संगमावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी घाट बांधण्यात आला आहे. इथून पुढे एक नदी, ती मुळा मुठा होते. बंडगार्डन, येरवडा, मुंढवामार्गे ती पुढे भीमा नदीत विलीन होण्यासाठी मार्गस्थ होते. मुळा आणि मुठेतून किती पाणी वाहून गेले याचा हिशोब नसला तरी मुळा मुठा ही शहराच्या इतिहासाची साक्षीदार आहे. पूर्वी पुण्याच्या सौंदर्यात भर घालणारी आणि पुण्याच्या सुखदुःखाशी समरस होणारी मुळा मुठा आज मरणासन्न आहे. दुर्दैवाने तिच्या या अवस्थेला जबाबदार असणार्‍या पुणेकरांना आज तिच्या या अवस्थेशी काही देणेघेणे नाही. मुळा मुठा नव्हे, तर गंगा, यमुना, गोदावरी, चंद्रभागा, पंचगंगा या सर्व नद्यांची अवस्था शहराचे गटार अशी झाली होती आणि आहे. नमामि गंगे, नमामि गोदे, नमामि चंद्रभागा असे नदी शुद्धीकरणाचे कार्यक्रम सध्या चर्चेत आहेत. नमामि गंगे प्रकल्पाची यशस्वी कहाणी आज गंगा विलास क्रुजच्या यशस्वी प्रवासाच्या माध्यमातून पाहिली जाऊ शकते. ऐतिहासिक शहर वाराणसी इथून गंगापात्रात सुरु झालेला क्रूजचा हा प्रवास, 51 दिवसांचा आणि 3200 कि. मी.चा, 17 नदी परीसंस्थांना स्पर्श करणारा होता. गंगा नदीपात्राद्वारे क्रुजने पाच राज्ये आणि बांग्लादेशमधून जाण्याचा पराक्रम केला आहे. गंगा नदीपात्र नव्हे तर किनारेही स्वच्छ झाल्याचा, नमामि गंगा प्रकल्पाच्या यशाचा हा पुरावाच नाही का ?

आधी गंगा, मग गटार

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातून वाहणार्‍या अनेक नाले, नागझरींना ओढ्यांना मुळामुठेकडे वळवण्यात आले होते. सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून प्रक्रिया केलेले आणि न केलेलेही पाणी मुळामुठेतच सोडले गेले आहे. अनेक कारखान्यांनी त्यांच्या उत्पादनांसाठी वापरून सोडलेले धोकादायक रसायनेमिश्रित पाणी मुळामुठेत सोडले गेले आहे. मुळामुठेची परिसंस्था नष्ट होत गेली आहे ती यामुळे. मुळामुठेच्या काठावर काही मंदिरं, समाधी आणि घाटही आहेत. मुळामुठा सन 1980 च्या दशकापर्यंत कमी अस्वच्छ होती. नदी वाहती असल्याने दुर्गंधी कमी होती. तारेच्या आकड्यात गांडूळ अडकवून मासे पकडणारे पट्टीचे गळबाज त्यावेळी सहज पाहायला मिळत. पावसाळ्यात तर अशा दर्दींची आणि जाळे फेकणार्‍यांची चलती असे; पण कालांतराने मुळामुठा सांडपाणी आणि रसायनमिश्रित टाकाऊ पाणी वाहून नेणारी जागा झाली आहे. मुळामुठेत पाणी कसे आहे हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जाणून आहे. भीमा नदीचे अंतिम रूप घेणार्‍या सर्व नद्यांचे पाणी उजनी धरणात विसावते. तिथे पाण्याला उकळ्यांचे बुडबुडे फुटतात. पाणी गर्द काळे अथवा हिरवे दिसते. पाण्याला दुर्गंधी येते. उजनी धरणात चिलापी मासा बहुतकरून आढळतो. पाणी परिसंस्था ढासळल्याचा पुरावा म्हणजे चिलापी माशाचा उदय. आज नदीत निर्माल्य, खरकटे अन्न, कचरा टाकला जातो. नागरिकांना काही धरबंद आणि प्रशासनाकडून प्रतिबंध नाही.

नदी सुधार म्हणजे काय?

मुळा मुठा नदीत येणारे मैलापाणी शुद्ध करून ते पुन्हा नदीत सोडण्यासाठी शहरात 10 मैलापाणी (सिवेज ट्रीटमेंट प्लांट) प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले होते. त्यांचा कार्यकाळ आता संपला आहे. केंद्रीय प्रदूषण महामंडळाने शुद्धीकरणाचे निकष बदलल्यामुळे ते आता कालबाह्य झाले आहेत. आता या सांडपाणी प्रकल्पांची पुनर्बांधणी करण्यात येत आहे. नायडू रुग्णालय आणि भैरोबानाला येथील जुने प्रकल्प पाडून तिथे नव्या सांडपाणी प्रकल्प केंद्राचे काम सुरु झाले आहे. 15 नंबर हडपसर, धानोरी, वारजे, वडगाव बुद्रुक येथील सांडपाणी शुद्धीकरण केंद्राच्या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे. औध आणि मुंढवा येथील सांडपाणी केंद्राचे काम संकल्पन स्तरावर आहे. तानाजीवाडी, विठ्ठलवाडी सह इतर मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांमध्येही सुधार करावा लागणार आहे. मुळा मुठा नदीमध्ये दररोज 883 एमएलडी मैलापाणी येते. 550 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा पुणे महानगरपालिकेकडे होती. ती आता कालबाह्य ठरली आहे. त्या क्षमतेसह सन 2047 चा विचार करून 396 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी नवे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारावे लागणार आहेत. त्यासह 113 कि.मी लांबीची मलवाहिनी अंथरणे, जीआयएस/एआयएस, स्काडा यंत्रणा उभारणे, समूह शौचालये उभारणे अशा 13 पॅकेज कामांचा समावेश मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पात आहे. मुळा मुठेत जाणारे घाण पाणी आणि आजूबाजूचा केर कचरा रोखता आला तर नदीचे आरोग्य सुधारता येईल. जैव साखळी पुनरुज्जिवित करता येईल. परिसंस्था टिकून राहील. असे हे सारे नियोजन आहे.

काय आहे जायका प्रकल्प ?

वेगाने वाढणार्‍या लोकसंख्येचा अंदाज घेत शहरातील नद्या प्रदूषणमुक्त करण्याच्या दिशेने 100 टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते नदीत सोडले जाण्यासाठी कराव्या लागणार्‍या सर्व यंत्रणा आणि व्यवस्था उभारण्याचे काम म्हणजे मुळामुठा नदीचे रिजुव्हीनेशन आहे. यासाठी जपान इंटरनॅशनल को ऑपरेशन एजन्सी (जेआयसीए) अर्थात जायका या संस्थेने अल्प व्याजदराने 990 कोटी रुपयांचे कर्ज देऊन प्रकल्पाच्या एकूण रकमेपैकी 85 टक्के रक्कम पुणे महापालिकेस अनुदान म्हणून देऊ केली आहे. मुळामुठा नदीची मरणासन्नता वाचवण्याचा हा एकात्मिक नदी सुधार प्रकल्प आणि त्याचा आधार म्हणजे जायका असा हा सारा मामला आहे. जायका प्रकल्पाचे भूमिपूजन 6 मार्च 2023 रोजी झाले आहे. बहुतांश कामे आता मार्गी लागत आहेत. सहा सांडपाणी प्रकल्पांचे शुद्धीकरण प्रकल्पांचे काम प्राथमिक स्तरावर सुरु आहे.

नदी सुधार संकल्पना

सन 2026 मध्ये पुणे महानगराची लोकसंख्या 64.58 लक्ष, सन 2036 मध्ये 82.13 लक्ष, सन 2046 मध्ये 98.59 लक्ष आणि सांडपाण्याची निर्मिती अनुक्रमे 813 एमएलडी, 1032 एमएलडी, 1238 एमएलडी असण्याचे अनुमान आहे. पुणे महापालिकेच्या आस्तित्वातील सांडपाणी प्रक्रिया केंद्राची नुतनीकरणानंतरची क्षमता 550 ते 567 एमएलडी पाहता नवीन वाढीव 396 एमएलडी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्रंं उभारली जाणे आवश्यक आहे. त्याचे नियोजन जायका प्रकल्पात करण्यात आले आहे. नदी सुधार संकल्पना करताना सांडपाणी प्रक्रिया केंद्राची देखभाल दुरुस्ती पुढील 15 वर्षे करण्याची जबाबदारी कंत्राटदारावर सोपवण्यात आली आहे. नदी सुधारचे काम सहा वर्षे विलंबाने सुरु झाले आहे. नदी सुधार कामाचा सन 2015 मध्ये रु 990.26 कोटीवर असलेला खर्च आता एक हजार 460 कोटींवर गेला आहे. सन 2025 पर्यंत नदी सुधार प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नदी सुधारचे संकल्पन करताना केवळ तांत्रिक गोष्टीवर भर देण्यात आला आहे. नदीचे कायमस्वरूपी संरक्षण होण्यासाठी जाणीव जागृती आणि नदीच्या आरोग्याचे जतन, बेटांचे संरक्षण आणि स्वच्छता याकरीता काम होणे आवश्यक आहे. नदी नैसर्गीकतेने वाहती राहणे आवश्यक आहे. नदीचे स्वतःचे पर्यावरण जोपासणे आणि त्याचे परिचालन टिकवणे ही एक दीर्घकाळ करावी लागणारी कृती राहणार आहे.

नमामि मुळा मुठा होईल ?

साबरमती नदीचा कायाकल्प होऊन ते एक पर्यटनस्थळ होऊ शकते. गंगा नदीचे स्वरूप पालटू शकते. मग आपल्या राज्यातील नद्यांची स्थिती का सुधरू शकत नाही ? नदी माता आहे. नदी उकीरडा नव्हे. नदीची स्थिती बदलली तर ते दृश्य सुखावह, प्रसन्न आणि नेत्रसुखद असणार आहे. नदीचे ओंगळवाणे रूप पाहणे कोणालाच आवडत नसावे, पण मग नदीची स्थिती सुधारण्यासाठी काम करायला कोणी पुढे का येत नाही ? नदी, जलीय जीव आणि हरित संस्था, संरक्षित किनार्‍यावरील वृक्षवेली आणि पक्षीवैभव हे सारे एकत्रितपणे उभे राहते. नदीचे पाणी स्वच्छ आणि वाहते असले की हिरवळ आणि वृक्षराजी, पक्ष्यांचा किलबिलाट हे सारे ओघाने येणार आहे. नदीपात्र नितळ आणि दुर्गंधीरहीत असेल तर हे साकार होईल का ? नदी हा आपल्या धर्मपुजनाचा विषय आहे, तर मग नदी संवर्धनाबाबत समाजात आस्था का नसते ? नदी, नदीकाठ हा स्थानिक लोकांच्या व्यवसायाचे, परिवहन आणि पर्यटनाचे साधन होऊ शकेल काय ?

संथ वाहते मुळा मुठा माई

प्रत्येक गावातून वाहणारी नदी ही त्या गावाची गंगाच असते. तिचे पावित्र्य जपण्याची, ती निसर्गतः जिवंत राहील हे पाहण्याची जबाबदारी त्या गावाची असते. नुसते माता म्हणून नदीची अस्वच्छ स्थिती बदलत नसते, तर त्या पूज्यभावाला प्रत्यक्ष कृतीची जोड देणे आवश्यक असते. नदी जपणे, नदीचे संवर्धन करणे ही शासन, प्रशासन आणि नागरिक या सर्वांची जबाबदारी आहे. नदी सुधार प्रकल्प राबविला की आपण सुटलो आणि सर्व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित झाले की आपण सुटलो ही शासन आणि प्रशासनाची पळपुटी वृत्ती नदीला संजीवनी देऊ शकणार नाही. नागरिकांच्या उदासीन, जाणीव आणि कर्तव्यरहीत जबाबदारीबद्दल न बोललेले बरे. सार्वजनिक हिताची कोणतीही गोष्ट जनभागीदारीशिवाय यशस्वी होणार नाही. स्वच्छ नदी हा शहराचा आरसा आहे. शहराची प्रतिमा जोपासण्याचे काम नदीच्या अवस्थेतून होते. नदीचे अस्वच्छ असणे हे शहराचे पर्यावरणाबद्दल असलेले निरीक्षर असणे दाखवून देते. काळे आणि करडे, हिरवे तवंगयुक्त, जलपर्णी असलेले नदीपात्र हे नदी परिसंस्था नष्ट झाल्याचे चित्र आहे. दुर्दैवाने नद्यांची सर्वत्र अशीच स्थिती आहे. जलसंपदा विभाग भले नद्यांवर हक्क सांगुन कृषी, औद्योगिक, पिण्यासाठी या सर्व उपयोगातून महसूल कमवत असला तरी नद्यांच्या आरोग्य जोपासनेचे कोणतेही काम त्यांनी केलेले नाही. लाल आणि निळी पूररेषा ठरवली की काम झाले ही वृत्ती नदीला गटार करत आहे. वन, पर्यावरण, मृद संधारण, महापालिका, प्रदूषण विभाग यांनी समन्वयाने काम केले तर मुळामुठा जिवंत होऊन पुन्हा संथपणे वाहू लागेल.

स्मार्ट मुळा मुठा

महानगर पुणे विस्तारत आहे. पुणे स्मार्ट करण्याच्या विषयावर आपण चर्चा करत आहोत. पुण्याचे आरोग्य, पर्यावरण, भौगोलिकता, नैसर्गिकता, प्रतिमासंवर्धन यादृष्टीने मुळा मुठेचे आरोग्य आणि जिवंतपणा हा प्रवाहातून प्रतीत होणे आवश्यक आहे. नदीपात्र गाळरहीत व्हायला हवे. नैसर्गिक झरे मोकळे होऊन ते वाहते झाले पाहिजेत. नदी पात्रात काहीही टाकणे संपूर्णपणे थांबवले गेले पाहिजे. नदी पात्र सुशोभित करण्याचे किंवा नदी सुधारणेकामी बांधबंदिस्तीचे सुरु असलेले काम सध्या आपण संगम, बंडगार्डन येथे दोन्ही काठ, येरवडा आणि कल्याणीनगर येथील नदीपात्रात दोन्ही ठिकाणी पाहिले जाऊ शकते. अशा उपायांनी काय साध्य होणार आहे ? मूळ नदीपात्र आणि मूळ जलमार्ग स्वच्छ, प्रवाही होण्यासाठी काही तांत्रिक, काही भूस्तर जोपासण्याचे उपाय करावे लागतील. निसर्ग स्वतः स्मार्ट आहे. आपला अनावश्यक हस्तक्षेप, त्यात मूळ प्रकृती बिघडवून विकृती निर्माण करतो. आपल्याला ती नष्ट करून नदी संस्कृतीकडे जायचे आहे. ते एवढे सोपे नाही. मुळामुठा नदी हे पुणे शहरांतर्गत जल प्रवासाचे साधन होईल का ? मुळामुठेचे किनारे सुशोभित होऊन ते विरंगुळ्याचे स्थान होतील का ? मुळामुठा नदीपात्रात काठाने रस्ता होईल का ? नदीपात्रातून स्कायवॉक अथवा इलिव्हेटेड रस्ता होईल का ? महानगर पुण्याची मुळामुठा स्मार्ट होईल का ? असे अनेक प्रश्न आहेत. त्याची सकारात्मक उत्तरे येणारा काळ देईल. पण त्यासाठी शासन, प्रशासन आणि नागरिकांच्या एकत्रित प्रामाणिक प्रयत्नांची नितांत आवश्यकता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा