धनंजय दीक्षित
dhananjay@kalyanicapital.com

आजपासून आपण फ्युचर्स आणि ऑप्शन्सचा उपयोग किती विविध प्रकारे केला जाऊ शकतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आधी वायदा बाजारातील मुख्य घटक कोण असतात ते पाहूया. वायदा बाजारात काम करणार्‍यांचे साधारणतः 3 वर्ग होऊ शकतात.

1) Hedger – Hedging करणे म्हणजे आपल्या मालमत्तेला प्रतिकूल परिस्थितीमुळे होऊ शकणारा तोटा / नुकसान कमी करण्यासाठी तजवीज करण्याचा प्रयत्न करणे. वेगळ्या शब्दात मांडायचे झाले, तर कुठल्याही वित्तीय व्यवहारातील जोखीम कमी करण्याचा सक्रिय प्रयत्न म्हणजे hedging. वायदे बाजाराचा उगम हाच मुळी जोखीम कमी करण्याच्या उद्देशाने झाला हे आपण सुरुवातीच्या काही लेखांमध्ये बघितलेच आहे.

कंपन्या, वित्तीय संस्था, सरकार, बँका व वित्तीय बाजाराशी प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष संबंधित कोणीही हे सगळे जोखीम कमी करण्याच्या हेतूने फ्युचर्स आणि ऑप्शन्सचा उपयोग या ना त्या प्रकारे करत असतात. आता ही जोखीम विविध कारणांमुळे उद्भवू शकते – कुठल्याही चल (variable) घटकांमुळे ही जोखीम निर्माण होऊ शकते. उदा. व्याजदर, शेअरचे भाव, परकीय चलनाचे दर, मालाच्या किमती इ.

एक शेतकरी तो घेत असलेल्या पिकाच्या भविष्यातील किमतीमधील वधघटीपासून सुरक्षित राहण्यास त्या पिकाचे फ्युचर्स ठरावीक किमतीला विकून आपली विक्रीची किंमत नक्की करू शकतो. हे फ्युचर्स विकत घेणारी एखादी अन्नप्रक्रिया करणारी कंपनी असू शकते, जी आपल्या कच्च्या मालाची किंमत सुनिश्चित करू इच्छिते.

2) Speculator (अर्थात सट्टेबाज) – हा वायदे बाजारातील सर्वात सक्रिय, चंचल आणि सर्वात मोठा वर्ग आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. ज्या कशाला भाव आहे, त्याचा सट्टा होऊ शकतो. वित्तीय बाजारात तर सगळ्यालाच भाव असतो, त्यामुळे सट्टाही सगळ्यात होऊ शकतो.

वायदे बाजारातील सौदे पूर्ण पैसे न भरता मार्जिन भरून केले जातात – म्हणजेच तुमच्या जवळ असलेल्या रकमेच्या काही पटीत तुम्हाला व्यवहार करता येतात. समजा, एखाद्याला चांदीच्या किमतीत नजीकच्या भविष्यात झपाट्याने वाढ होईल असे वाटले व त्यापासून त्याला फायदा करून घ्यायचा असेल, तर त्याच्या पुढे 2 पर्याय असतील –

1) ऐपतीप्रमाणे चांदी विकत घेऊन, ती सुरक्षितरित्या सांभाळून, तिच्या भावात अपेक्षित वाढ झाली की विकून नफा कमावणे.
अथवा
2) चांदीचे फ्युचर्स मार्जिन रक्कम भरून खरेदी करणे – चांदीच्या भावात वाढ झाल्यास फ्युचरचे भावसुद्धा वाढतील – ते वाढले की फ्युचर विकून नफा कमावून मार्जिन परत घेणे. यात चांदी सांभाळायची जोखीम तर नाहीच, शिवाय चांदीच्या शुद्ध/अशुद्धतेची काळजी करण्याची सुद्धा गरज नाही.
वरील उदाहरण हे ज्या ज्या गोष्टीचे फ्युचर्सचे सौदे होऊ शकतात त्या सर्व गोष्टींना लागू आहे.

3) Rbitrageurs – वायदे बाजारातील वरील 2 वर्ग जे व्यवहार करत असतात, त्यामुळे विविध फ्युचर्सच्या किमतीमध्ये सदैव हालचाल होत असते. फ्युचर्सचे भाव हे आधारभूत मालमत्तेच्या भावाशी सैद्धांतिकरीत्या बांधील असतात. पूर्वी बघितल्याप्रमाणे विविध घटकांवर फ्युचर्सची वाजवी किंमत ठरत असते. आता अतिशय मोठ्या प्रमाणावर फ्युचर्सचे व्यवहार जेव्हा होतात, तेव्हा काही वेळेस प्रत्यक्ष व्यवहाराची किंमत ही वाजवी किमतीपेक्षा कमी/जास्त असूच शकते (mispricing). याच mispricing चा फायदा घेऊन जोखीममुक्त नफा कमावण्याचा प्रयत्न करणारा वर्ग म्हणजे arbitrageurs.­rbitrageurs च्या प्रत्येक कृतीमुळे mispricing ला लगाम बसतो, ज्याचा अप्रत्यक्ष फायदा वरील दोन्ही वर्गांना होतो. या तिन्ही वर्गांच्या कार्य पद्धतीचा आढावा आपण पुढील काही लेखात घेऊया.

(‘गुंतवणूक मित्र’ पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या लेखांमधील मते त्या त्या तज्ज्ञांची आहेत. गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा निर्णय आपल्या जबाबदारीवर घ्यावा.)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा