स्मरण तेजाचे : संकलन : शैलेंद्र रिसबूड

अली बंधूंच्या स्थानबद्धतेबद्दल सरकारचा धिक्कार करणारा ठराव लोकमान्य टिळकांनी डिसेंबर 1917 च्या कलकत्ता अधिवेशनात मांडला. अधिवेशनाला अली बंधूंची वृद्ध आई उपस्थित होती आणि त्यांना मंचावर सन्मानाचे स्थान देण्यात आले होते. या आदरणीय वृद्ध स्त्रीचा उल्लेख करताना टिळक अत्यंत शालीनतेने बोलत होते. धारदार, बोचर्‍या व मर्मग्राही भाषेच्या फटकार्‍यांसोबतच संवेदनांची अलंकारिक भाषाही त्यांना वापरता येते, हे त्यांनी दाखवून दिले. डॉ. एम.ए.अन्सारी लिहितात – ’मी पुन्हा एकदा 1917 मध्ये कलकत्त्यातील काँग्रेसच्या अधिवेशनात टिळकांना भेटलो. त्यावेळी मनमानी स्वरूपाच्या व गैरवापर होणार्‍या भारतीय संरक्षण कायद्याखाली शौकत अली व महंमद अली यांना छिंदवाड्याला स्थानबद्ध करण्यात आले होते. आपल्या दोन शूर मुलांचे कार्य पुढे नेण्यासाठी त्यांची आई आदरणीय बी.अम्मा माझ्यासोबत अधिवेशनाला आल्या होत्या. टिळकांनी बी.अम्मा यांच्याबाबत अत्यंत सुसभ्य व सन्मानाची वागणूक ठेवली, त्याचप्रमाणे अली बंधूंचे दुःख व कष्ट यांबाबत त्यांनी दाखवलेली सहानुभूती व रुचीदेखील हेलावून टाकणारी होती.

महंमद अली व शौकत अली यांच्या सुटकेसाठी ठराव मांडताना टिळकांनी अधिवेशनामध्ये केलेले भाषण त्यांची छाप सोडणारे होते. त्यातील दोन संक्षिप्त अवतरणे त्यांच्या मनात डोकावायला उपयोगी पडणारी आहेत. ते म्हणाले – ’श्री. महंमद अली व श्री. शौकत अली यांची तात्काळ सुटका करावी, अशी त्यांचा मित्र व सहानुभूतीदार म्हणून माझी मागणी आहे. मी त्यांचा वैयक्तिक पातळीवरील मित्र नसलो, तरी अन्यायरित्या वागवल्या जाणार्‍या कोणत्याही जातीमधील, पंथामधील अथवा कोणत्याही रंगाच्या व्यक्तीचा मित्र व सहानुभूतीदार म्हणून, सत्य व न्यायाचा मित्र आणि सहानुभूतीदार म्हणून मी ही मागणी करतो आहे’. त्यानंतर अली बंधूंच्या मातोश्रींना संबोधित करत टिळक म्हणाले – ’आपल्या वतीने मी इथे असलेल्या अली बंधूंच्या मातोश्रींना आश्वस्त करू इच्छितो की, केवळ माता असण्यापेक्षा शूर मुलाची माता असणे कितीतरी पटींनी अधिक महत्त्वाचे आहे आणि इथे उपस्थित असलेल्या तुम्ही सर्वांच्या संमतीने मी त्यांना असेही सुचवू इच्छितो की, सरकारने काय केले हे विसरून जावे आणि या घडीला आम्हा सर्वाना आपल्याबद्दल सहानभूती वाटते, या सत्यस्थितीने आपले सांत्वन करावे. त्यांच्यासारख्या अनेकानेक माता या देशाला मिळू देत, अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. त्यांचे सांत्वन करण्यासाठी मला इतकेच सांगता येईल’. शुक्रवार दिनांक 30-जानेवारी-1920 रोजी शांतारामाच्या चाळीत ’अली-बंधूं’च्या सत्कार समारंभाला लोकमान्य टिळक हजर राहिले होते. व्हॉईसरॉय यांनी दिल्लीमध्ये दिनांक 27 एप्रिल 1918 रोजी युद्ध परिषद आयोजित केली होती. लोकमान्य टिळक, बेझंट आणि अली बंधू यांना निमंत्रण नव्हते; पण मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन यांनी बोलावलेल्या मुंबई प्रांतिक युद्ध परिषदेसाठी मात्र टिळकांना निमंत्रित करण्यात आले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा