तुमचा पुढचा जन्म स्त्रीचा का पुरुषाचा ?

आजकालचे हे सोशल मीडियाचे इनफ्लुएन्सर्स काय वाट्टेल ते करायला सांगतात आणि आमच्यासारखे निरुद्योगी लोक ट्रेंड म्हणून बसतात करत. काय तर म्हणे दहा वर्षापूर्वीचे फोटो टाका, मग म्हणे साडीतले, मग नवर्‍याबरोबर, आता ही डान्स स्टेप आणि मग ती ! कसं काय नवीन नवीन सुचतं आणि दुसर्‍यांना करायला लावता येतं, कमालच वाटते. परवा तर म्हणे अमुक उत्तरं द्या आणि मागच्या जन्मी तुम्ही कोण होता ते जाणून घ्या. अहो, मला अजून या जन्मातली मी कोण आहे ते उलगडेना, मागच्या जन्माचं समजून काय करु ? जाणून घ्या तुमचा पुढचा जन्म स्त्रीचा का पुरूषाचा ? नको रे बाबा.. मला नको असली बकवास माहिती !

पण खरंच पुढचा जन्म पुरुषाचा मिळाला तर ? कलाकाराला आहे त्याचा कंटाळा यायला फार वेळ लागत नाही, सतत नवीन काहीतरी हवंच असतं. पुढचा जन्म पुरुषाचा मिळाला तर दिसण्यापासून विचार, भावना, स्वभाव सगळ्यात कम्प्लीट चेंज, काय मज्जा येईल ! वेगळंच आयुष्य जगता येईल !

तसं या आयुष्यातही बरंच चाललंय. मुळात स्वभावाने मी गरीब वगैरे नक्की नाही. पाहिजे तिथे चलाखी मला बरोबर जमते. आठवडाभर वेगवेगळे पदार्थ करुन रविवारी स्वयपाकाचा कंटाळा आला की कामचुकारपणा करुन झोमॅटोवर ऑर्डर देणारी पहिली मीच असते. किरकोळ पोटदुखीपासून मोठमोठे आजार सहन करायची ताकद देवानेच दिलेली आहे; पण कंटाळा आल्यावर पडून राहण्याचं सुख मला बरोबर मिळवता येतं. दिवसभर संसाराच्या रामरगाड्यात दमून रात्री मी मेल्यासारखी पडत असले तरी मुलं आजारी पडल्यावर रात्र जागून काढायचं बळ देवाने इनबिल्टच दिलेलं आहे. सणावारांना परंपरेला धरुन नऊवारी मिरवत फिरत असले तरी ट्रिपला गेल्यावर माझ्या इतकी मॉडर्न मीच असते. मित्रांवर भरमसाठ खर्च होत असला तरी पैसे कुठे आणि कसे वाचवायचे याची अक्कल मलाच जास्त आहे. इतर वेळी कामाच्या डोंगरातून माझं डोकं वर निघत नसेल; पण नेटफ्लिक्सवर पाहिजे ती सीरिज बघायला मला नेमका वेळ काढता येतो. ‘चकदे’ सिनेमा बघताना टीम जिंकली की आनंदाने प्रत्येक वेळी डोळ्यात पाणी येत असलं तरी मुलगी शिक्षणासाठी घराबाहेर पडली की घरात सगळ्यात खंबीर मीच असते. इतर वेळी सगळ्यांसाठी सर्वस्व झोकून सगळं करत असले तरी वाढदिवसाला त्या सगळ्याची वसुली कशी करायची ते मला छान माहिती आहे. जवळच्या लोकांचा त्रास झाला तर गुपचूप सहन करते; पण नको त्यांना लांब कसं ठेवायचं ते मला उत्तम जमलंय. मैत्रिणींची मनात ठेवलेली वर्षानुवर्षाची सिक्रेटस् कुलपात ठेवली आहेत; पण नातेवाईकांच्या गॉसिप करायला माझं एक पाऊल पुढे असतं. घरात साधी सोज्वळ गृहिणी असले तरी तरुण मुलींबरोबरची कुल मॉम मीच असते. नवर्‍याबरोबर एकनिष्ठ राहून सुद्धा एखाद्या शाहरूखला बघून काळजाचा ठोका चुकलाच तर त्या बिघडलेल्या काळजाला लयीत कसं आणायचं ते मला उत्तम जमलंय.

बापरे ! एकूण स्त्री जन्माचा सगळा आलेख बघता याच जन्मावर ऑफर्स जास्त आहेत आणि बाई म्हणल्यावर ऑफर सोडायच्या तरी कशा ? पुरुषाचा जन्म घेतल्यावर या जन्मातल्या अर्ध्या अधिक स्किल्स गेल्याच म्हणून समजा. तुमचं तुम्ही काय ते ठरवा पण माझं देवाला काय सांगायचं ते ठरलं. बाबा रे द्यायचा तर मोक्षच दे नाही तर कंटिन्यू विथ द सेम ऑफर्स !!

– सायली पानसे

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा