नवीन पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर अशक्य

महाराष्ट्र सरकारने यंदापासून विद्यार्थ्यांच्या पुस्तकाचे ओझे कमी करण्यासाठी एका अभिनव कल्पनेचा पाठपुरावा करण्याचे ठरविले आहे. इयत्ता तिसरीपासून ही नवीन पुस्तके असतील. यामध्ये वहीची पाने असतील असे वृत्त नुकतेच वाचले. या पुस्तकामुळे याचा पुनर्वापर होणार नाही. आज अनेक ठिकाणी वापरलेली पुस्तके गरजू विद्यार्थ्यांना दिली जातात. पुस्तकात कोरी पाने जोडल्यानंतर त्या पानावर विद्यार्थ्यांकडून लेखन केले जाणार आहे. त्यामुळे त्याचा पुनर्वापर केला जाणार नाही. त्यामुळे अर्थातच पुस्तकाची हजारो टन रद्दी निर्माण होईल. या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात कागद लागणार असल्याने पर्यावरणाला धोका पोहचेल. जसे मुले वहीत लिहू शकतात, तसे पुस्तकात असलेल्या पानावर लिहू शकतील काय? याबद्दलसुद्धा अनेकांच्या मनात शंका आहेत. कित्येक शिक्षणतज्ज्ञांचे सुद्धा असेच मत आहे. अनेक शिक्षणतज्ज्ञांच्या मते विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे पाठ्य पुस्तकामुळे नाही, तर खाजगी पुस्तके, मार्गदर्शक पुस्तके यामुळे वाढते. त्यामुळे या गोष्टींना प्रतिबंध घातला पाहिजे. देशात इतरत्र कोठे अशा प्रकारचा उपक्रम राबविल्याने दिसत नाही

शांताराम वाघ, पुणे

इंटरनेटचे व्यसन

डिजिटल युगाची क्रांती जितक्या झपाट्याने होतेय, तितक्याच वेगाने लहानग्यांपासून मोठ्यापर्यंत सगळेच याचा भाग होऊन बसले आहेत. मात्र याच्या अतिवापरामुळे मानसिक आरोग्याच्या समस्या उत्पन्न होत आहेत. मनोविकार हे एका
विषाणूप्रमाणे वाढत चालले आहे. या मनोविकारांवर मात करणे गरजेचे आहे. सोशल असणे आणि इंटरनेट वापरणे हे प्रमाणात असणे आवश्यक आहे. यंत्राच्या अस्तित्वाने माणसाचे बोलणे हरवले आहे. मनातले मोकळेपणाने मांडण्यासाठी थोडावेळही ही हातातली टकटक बाजूला होत नाही. आजच्या घडीला तणाव नियोजन, इंटरनेट व्यसन या बाबतील वैयक्तिक स्तरावर मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे.

भावना गांधिले, अ.नगर

विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

संपूर्ण राज्यामध्ये अनधिकृत शाळांचे पेव फुटले असून, 2022-23 च्या सर्वेक्षणात राज्यभरामध्ये 674 शाळा अनधिकृत असल्याचे समोर आले होते. यामध्ये 269 शाळा या एकट्या मुंबईतील होत्या. त्यापैकी मान्यता न घेतलेल्या 57 शाळांना प्रशासनाने टाळे ठोकले. परंतु, अजूनही त्यामधील 194 अनधिकृत शाळा सुरू असून, त्यांच्याविरुद्ध पालिका प्रशासनाने कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. या शाळा अनधिकृत असल्याची माहिती पुढे आल्यामुळे या शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांनी चांगलाच धसका घेतला असून, विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. वास्तविक शासनाची परवानगी आणि ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्याशिवाय कोणालाही शाळा सुरू करता येत नाही. तरीही अनधिकृत शाळांची संख्या वाढतेच आहे. मुंबईतील मानखुर्द, गोवंडी, मालाड, मालवणी, वडाळा, अँटॉप हिल भागांत अनधिकृत शाळांची संख्या सर्वाधिक आहे. अनधिकृत शाळांमुळे लाखो निष्पाप मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले असून, या संदर्भात शासनाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी चिंताग्रस्त पालकांनी शासनाकडे केली आहे.

प्रदीप शंकर मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई

’संभाजीनगर’ला विरोध कशासाठी?

औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्यास केंद्र सरकारचे ना हरकत पत्र मिळाल्यावर राज्य सरकारने औरंगाबादचे ’छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ’धाराशिव’ असे नामांतर केल्याची अधिसूचना जारी केली आणि त्यासाठी आंदोलने उभी राहू लागली, उपोषणेही सुरू झाली. छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाने आणि बलिदानाने पुनित झालेल्या महाराष्ट्रात त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करून त्यांचा बळी घेणार्‍या औरंगजेबाच्या नावाने जिल्हा असणे हीच मुळात या राज्यासाठी शरमेची बाब आहे. औरंगाबाद हा काही येथील भूमिपुत्र किंवा कोणी क्रांतिकारी वा समाजसुधारक नव्हता, तर स्वराज्याचा सर्वांत मोठा शत्रू होता.

जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई

यू-ट्यूबचा योग्य वापर हवा

एकाच दिवशी दोन बातम्या वाचनात आल्या. यू-ट्यूबवर व्हिडिओ पाहून त्यातील सल्ल्यानुसार उपचार करणार्‍या एका बोगस डॉक्टरला गोवंडी येथे अटक केल्याची एक बातमी होती, तर दुसर्‍या बातमीनुसार नागपूर येथे गर्भवती असल्याची माहिती दडवून ठेवणार्‍या एका अल्पवयीन मुलीने यू-ट्यूब पाहून स्वत:च प्रसूती करून बाळाला जन्म दिला आणि बाळ रडल्यास ते सगळ्यांना कळेल या भीतीतून तिने पट्ट्याने गळा आवळून त्याला ठार केले. दोन्ही बातम्यांतील यू-ट्यूबचा वापर हा एखाद्याच्या जीवावर बेतू शकणाराच ठरला आहे. तसेही आंतरजालावर प्रचंड प्रमाणात उपलब्ध असलेल्या माहितीचा वापर योग्य प्रकारे केल्यास ती अनेकांना फायदेशीर ठरली आहे. याचाच एक भाग असलेल्या यू-ट्यूबवरही शैक्षणिक, माहितीप्रधान व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून आपल्या ज्ञानात भर पाडणारे कमी नाहीत; पण त्याचवेळी वरील दोन बातम्यातील गैरवापरासारखी उदाहरणेही आढळून येतात आणि तेच चिंताजनक आहे.

दीपक काशिराम गुंडये, वरळी.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा