अंतरा देशपांडे
antara@kalyanicapital.com

सेबी ही एक सरकारी संस्था गुंतवणूकदारांच्या हितासाठी नेहमीच कार्यरत असते. एकदा नियमावली आखून दिली म्हणून त्याचे काम काही संपत नसते, सदैव सतर्क राहून गुंतवणूकदार कसे कुठल्याही आकर्षक पण फसव्या योजनांना बळी पडणार नाही याची काळजी घेत असते.

सध्या चर्चेत असलेला नवीन नियम म्हणजे – सेबीने A­MFI ला जाहिराती, चित्रे, पॅम्प्लेट्स आणि दिशाभूल करणारे दावे करणारी माहितीपत्रके यांसारखी प्रचारात्मक सामग्री काढून टाकण्यास फंड हाऊसला सांगण्यास सांगितले. सेबीने म्युच्युअल फंडांना परताव्याच्या बाबतीत गुंतवणूकदारांची दिशाभूल करणार्‍या सर्व जाहिराती किंवा चित्रे काढून टाकण्यास सांगितले आहे.

मार्केट रेग्युलेटरच्या मते, जाहिराती, सादरीकरणे, पुस्तिका आणि पॅम्प्लेट्समध्ये वापरलेले ग्राफिक्स गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर निश्चित परतावा मिळवून देऊ शकतील, असा विचार करायला लावून दिशाभूल करू शकतात. सेबीने हे पाऊल उचलले कारण त्यांच्या असे निदर्शनास आले आहे की काही मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या (AMC) जाहिरातींशी संबंधित आखून दिलेली जी नियमावली आहे त्याचे पालन करत नाहीत.

सेबीचे असे देखील म्हणणे आहे की AMC जरी जाहिरातीत डिस्क्लेमर किंवा अटी लागू अशी टीप तळाशी देत असल्या तरी ते गुंतवणूकदाराकडून नजरअंदाज होण्याची शक्यता आहे. कारण ते अतिशय बारीक अक्षरात छापलेले असते आणि जाहिराती इतक्या आकर्षक असतात की, गुंतवणूकदाराचे त्याकडे सहज दुर्लक्ष होऊ शकते.

गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी, गेल्या काही दिवसांपासून अनेक म्युच्युअल फंड हाऊसेस गुंतवणुकीवर खात्रीशीर परताव्याच्या जाहिराती देत आहेत. म्युच्युअल फंड हाऊस यांचा हा गैरव्यवहार सेबीच्या लक्षात आला आणि त्याने लगेच अशा सगळ्या जाहिरात पत्रिका बाद करण्यास सांगितल्या, ज्यात सध्या प्रचलित असलेल्या SIP या योजनेमध्ये गुंतवणूकदार काही ठराविक वर्षे पैसे गुंतवून नियमितपणे परतावा मिळवू शकतात असे नमूद केले आहे.

सेबीच्या नियमांनुसार, कोणतेही म्युच्युअल फंड हाऊस परताव्याची हमी देऊ शकत नाही. सर्व म्युच्युअल फंड इक्विटी आणि डेट फंडांमध्ये गुंतवणूक करत असल्याने, बाजाराच्या वाढ आणि घसरणीसह निव्वळ मालमत्ता मूल्य (N­V) देखील चढ-उतार होत असते. त्यामुळे, हमी परताव्याचे आश्वासन व्यावहारिक नाही आणि सेबीने ठरवलेल्या नियमांच्या विरुद्ध आहे.

सेबी आपल्या परीने कार्यतत्पर आहेच; पण गुंतवणूकदारांनी पण सजग राहण्याची गरज आहे. कुठल्याही आकर्षक जाहिरातींना भाळून न जाता आपापल्या
सल्लागारांकडून योग्य ती माहिती घेऊन सगळ्या जोखमा लक्षात घेऊन मगच गुंतवणूक करावी.लक्षात ठेवा सगळ्या चमकणार्‍या गोष्टी सोनं नसतात. तेव्हा सोच कर.. समझ कर.. इन्व्हेस्ट कर..!!

(‘गुंतवणूक मित्र’ पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या लेखांमधील मते त्या त्या तज्ज्ञांची आहेत. गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा निर्णय आपल्या जबाबदारीवर घ्यावा.)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा