भारताला प्रथमच गीतामुळे पुरस्कार प्राप्त

लॉस एंजेलिस: चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. यंदा या पुरस्काराचे ९५ वे वर्ष आहे. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ९५ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतीयांसाठी फारच संस्मरणीय ठरला. कारण ९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताला दोन श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे.

‘बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म’ या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ने बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला ‘बेस्ट ओरिजनल साँग’ या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे ‘RRR’ने इतिहास रचला आहे.

युक्रेनमध्ये झाले नाटू-नाटूचे चित्रीकरण

दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटाने भारतात तसेच परदेशात उत्तम कामगिरी केली आहे. सर्वोत्कृष्ट गाण्याच्या श्रेणीत आरआरआरच्या नाटू-नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एक हजार कोटींची कमाई केली. या गाण्याचे चित्रीकरण युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या घरासमोर केल्याची माहिती दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांनी दिली

राजामौली म्हणाले, या गाण्याच्या चित्रीकरणाची परवानगी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांकडून मिळविणे सोपे नव्हते. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हे स्वत: अभिनेते असले, तरी त्यांना याचे गांभीर्य माहीत आहे. तरी त्यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना गाण्याच्या चित्रीकरणाची परवानगी दिली.

युक्रेनच्या राष्ट्रपती सदनासमोर एक इमारत आहे, तेथेच चित्रीकरण करण्यात आले. आम्ही युक्रेनमध्ये नाटू-नाटू हे गाणे चित्रित केले. हा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा राजवाडा आहे. राजवाड्याच्या शेजारी एक संसद असून, त्यांनी आम्हाला चित्रीकरणाची परवानगी दिली. कारण युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हे राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी टेलिव्हिजनमध्ये मालिकेत काम करत होते. असे राजामौली यांनी सांगितले.

ऑस्कर पुरस्काराचे नेमके स्वरुप काय?

या सोहळ्यातील उपस्थितांपैकी काही कलाकार आपल्यासोबत सुंदर गोल्डन मॅनची झगमगती ट्रॉफी घरी घेऊन गेले. विशेष म्हणजे ज्यांना फक्त नामांकनावर समाधान मानावे लागले अशा कलाकार मंडळींनाही रिकाम्या हाताने घरी जावे लागणार नाहीत. दरवर्षी, प्राइम श्रेणींमध्ये ऑस्कर नामांकित व्यक्तींच्या यादीत स्थान मिळवणार्‍यांना हजारो डॉलर्सच्या भेटवस्तू दिल्या जातात.

2002 पासून लॉस अँजेलिसमध्ये डिस्टिनेक्टीव्ह असेटस् या मार्केटिंग कंपनीद्वारे सर्वांना भेटवस्तू दिल्या जातात. यावर्षी देण्यात आलेल्या गिफ्ट बॅगची किंमत तब्बल 1 कोटी 3 लाख 25 हजार 826 रुपये इतकी असल्याचे समोर येत आहे.

ऑस्कर गुडी बॅगमध्ये काय असते?

या बॅगेत ६० हून अधिक सौंदर्यप्रसाधने व इतर जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असतो. या शिवाय लाइफस्टाइल नावाच्या कॅनेडियन इस्टेटमध्ये महागड्या सहली तसेच इटालियन लाइट हाऊसमध्ये आठ लोकांसाठी राहण्याची सोय, ऑस्ट्रेलियातील क्वीन्स लँडमध्ये जमिनीचा तुकडा या शिवाय ज्यांना आपले घर नव्यावे सजवायचे आहे, त्यांच्यासाठी मायसन कन्स्ट्रक्शनकडून २५ हजार डॉलर्स किंमतीचे पॅकेज, त्यात लिपो आर्म स्कल्पटिंग, केस रिस्टोरेशन सेवा आणि फेसलिफ्ट या सेवा उपलब्ध आहेत.भेटवस्तूमधील ५० टक्क्यांहून अधिक उत्पादने महिला आणि अल्पसंख्याक मालकीच्या कंपन्यांकडून येतात.

ही गुडी बॅग कोणाला मिळते?

ऑस्कर गिफ्ट बॅग सूत्रसंचालक आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी नामांकित व्यक्तींना दिल्या जातात. या व्यक्तींना भेटवस्तू नाकारण्याचा देखील अधिकार आहे. गेल्या वर्षी, अभिनेता डेन्झेल वॉशिंग्टनने भेटवस्तू स्वीकारण्यास नकार दिला होता. तर अभिनेता जेके सिमन्सने 2006 मध्ये ही भेटवस्तू चॅरिटीला दान केली.

भेटवस्तूची परंपरा कशी सुरू झाली?

१९९० च्या दशकापासून ऑस्कर सोहळ्यात सादरकर्ते आणि कलाकारांना भेटवस्तू देण्याची परंपरा सुरु झाली होती. सुरुवातीला, ब्रँड्सना देणगी देण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. आता सोहळ्यात सहभागी होण्यासाठी त्यांना किमान ३ लाख २३ हजार ६६९ रुपये खर्च करावे लागतात. कालांतराने यात आणखी काही बदल होत गेले. २००६ मध्ये अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसद्वारे निवड आणि भेटवस्तू दिल्या जाणे हा सर्वांत मोठा बदल झाला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा