संजय किर्लोस्कर,राजीवकुमार विष्णोई, प्रशांत दामले, अण्णासाहेब डांगे यांचा विद्यानिधीने सन्मान

‘टिमवि’चा ३८ वा पदवीप्रदान सोहळा

पुणे : शंभरी पूर्ण केलेल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षणाचा वारसा जपला असून, आजही हे विद्यापीठ लोकमान्यांच्या विचाराने पुढे जात आहे, असे मत टेहरी धरण प्रकल्पाचे शिल्पकार राजीव कुमार विष्णोई यांनी शनिवारी व्यक्‍त केले.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या ३८ वा पदवीप्रदान सोहळा काल पार पडला. या वेळी ज्येष्ठ उद्योगपती संजय किर्लोस्कर, टेहरी धरण प्रकल्पाचे शिल्पकार राजीवकुमार विष्णोई, प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले आणि ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांना सन्मानीय डी.लिट. (विद्यानिधी) देऊन गौरविण्यात आले. त्या वेळी विष्णोई बोलत होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक, प्रभारी कुलगुरु डॉ. गीताली टिळक, टिमवि ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक, विश्‍वस्त डॉ. प्रणती टिळक, प्रभारी कुलसचिव डॉ. अभिजित जोशी आदी उपस्थित होते.

विविध विद्या शाखांचे अधिष्ठाता यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी ५० विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या 1 हजार 235 तर पदवी अभ्यासक्रमाच्या 2 हजार 234 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. कौशल्य विकास शाखेच्या 161 पदवी अभ्यासक्रमाच्या 161 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी सुवर्ण पदके मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा पदके देऊन गौरव करण्यात आला. विद्यापीठाचे माजी पीएच.डी विद्यार्थी व निवृत्त प्राध्यापक डॉ.रामदास आबणे यांना पोस्ट डॉक्टरल प्रदान करण्यात आली.

संजय किर्लोस्कर म्हणाले, मी 1975 पदवी पूर्ण केली. त्यानंतर मला पदव्युत्तर पदवी मला घेता आली नाही, मात्र आज खर्‍या अर्थाने मास्टर डिग्री मला मिळाली असल्याने अभिमान वाटतो. माझे पणजोबा आणि लोकमान्य टिळक यांची भेट झाली होती. माझ्या पणजोबांनी शेती अवजारांची कंपनी स्थापन केली होती. मात्र त्यांना इंग्रज शेतकर्‍यांना नांगरासह अवजारांची विक्री करु देत नाहीत, त्यांच्याकडून कोणतेही सहकार्य मिळत अशी अर्धा तास चर्चा लोकमान्यांशी पणजोबांनी केली होती. त्यावेळी लोकमान्यांनी त्यांना विश्‍वास दिला होता, तुम्ही देश सेवेसाठी काम करीत आहात. स्वराज्य मिळाल्यावर तुमच्याकडून देशसेवेबरोबर व्यवसायदेखील जगाच्या कोनाकोपर्‍यापर्यंत जाईल, अशी उभारी लोकमान्यांकडून किर्लोस्करांना दिली होती.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून वाटचाल सुरु आहे. विद्यापीठात एकाच छताखाली सर्व शिकण्याची व्यवस्था असल्याने विद्यापीठाचा दर्जा उंचावत असल्याचे कौतूक यावेळी त्यांनी केले. ते पुढे म्हणाले, माझा किर्लोस्कारांच्या चौथ्या पिढीत जन्म झाल्याने पाया भक्‍कम होता, मोठ्या संधी उपलब्ध होत्या. त्यामुळे मला खुप काही शिकायला मिळाले. जगभरात किर्लोस्कर कंपनीचे नाव असून साहित्यांची विक्रीही मोठी आहे. हे सर्व श्रेय पणजोबाने केलेल्या कामांचे आहे.

माझी आजी व आईने महिलांसाठी मोठी कंपनीची स्थापना केली. त्यामध्ये छोट्या पंपाबरोबर इतर साहित्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत असून सर्वांत जास्त उत्पादकत आहे. कंपनीतील सर्व सहकारी व कुटूंबाचे कष्ट यात असल्याने यश मिळत आहे. तंत्रज्ञानात वेगाने बदल होत असून हे तंत्रज्ञान समजून आम्ही काम केले आहे. देशातील सर्वांत जुनी कंपनी म्हणून किर्लोस्करची ओळख असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.

राजीवकुमार विष्णोई म्हणाले, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने शंभरी पुर्ण केली असून आजही लोकमान्यांच्या विचाराने पुढे जात आहे. लोकमान्यांचा राष्ट्रीय शिक्षणाचा वारसा विद्यापीठाने जपला आहे. आयुर्वेद, विज्ञान, वैद्यकीय, नर्सिंग यासह विविध शिक्षण क्षेत्रात विद्यापीठाचा दिवसेंदिवस वाढत आहे. हेच विद्यापीठाचे वेगळेपण आहे. इंदिरा गांधी मुक्‍त विद्यापीठाच्या आधी टिमविची स्थापना झाली असल्याने याचा बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदा झाला असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.

देशाच्या व लोकांच्या विकासासाठी माझ्या आभियांत्रिकीचा कसा उपयोग होईल, याकरिता मी सदैव प्रयत्नशील राहिल. टेहरी हायड्रोपॉवर कॉर्पोरेशनच्या माध्यमातून मी सदैव लोकहितासाठी कार्यरत राहीन, असेही यावेळी त्यांनी सांगितले. प्रभारी कुलसचिव डॉ. अभिजित जोशी यांनी प्रस्ताविक केले. प्रभारी कुलगुरु डॉ. गीताली टिळक यांनी विद्यापीठातील विविध विभागाचा आढावा घेतला. विद्यापीठाकडून सातत्याने विविध उपक्रम राबाविण्यात असून बऱ्याच विक्रम देखील नोंदवले आहेत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठात शिक्षण देण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ध्वनिमुद्रीत टिमवि गीत सादर करण्यात आले. पसायदानाने कार्यक्रमांची सांगता झाली. स्वप्निल पोरे यांनी प्रशांत दामले यांच्या मानपत्राचे, डॉ. अंबर बेहेरे यांनी अण्णासाहेब डांगे यांच्या मानपत्राचे, डॉ. केतकी शिंदे यांनी राजीवकुमार विष्णोई यांच्या मानपत्राचे, अतिफ सुंडके यांनी संजय किर्लोस्कर यांच्या मानपत्राचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा काशीकर यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा