डॉ. सुरेश गोपाळराव पाटील, बेलगावकर : टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठात 1985 पासून मुक्‍त विद्या केंद्र हा विभाग कार्यान्वित झाला. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजघटकांसाठी विद्यापीठाने मुक्‍त विद्या केंद्रामार्फत विशारद (बी.ए.) सामाजिक शास्त्रे हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरु केला. महाराष्ट्रातील दूरशिक्षणाचा हा पहिला प्रयोग होता. या विभागाची जबाबदारी विद्यापीठाने अभ्यासक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. हेमचंद्र भगवंत देशपांडे यांच्याकडे सोपविली. प्रा. देशपांडे हे कुरुंदवाड येथील महाविद्यालयात इतिहासाचे प्राध्यापक होते. त्यांना दोन दशकाहून अधिक काळाचा अध्यापनाचा अनुभव होता. ते विद्यापीठात 1985-1986 या वर्षांत सेवेत रूजू झाले. सरांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ, लाघवी, समजूतदार आणि सहनशील होता. त्यांनी समन्वयक पदाच्या कालखंडात विद्यापीठ व्यवस्थापन विभाग व कर्मचारी यांचा अतिशय उत्तम समन्वय साधला.

प्रा. हेमचंद्र देशपांडे सरांनी विभागप्रमुखाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर विद्यार्थी वाढीच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले. वृत्तपत्रांतील जाहिराती त्यांनी स्वत: व विषयतज्ज्ञांकडून लेख लिहून घेऊन महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांमधून प्रसिद्धीस देऊन विद्यापीठाच्या व मुक्‍त विद्या केंद्राच्या प्रगतीमध्ये योगदान दिले. त्यांच्या कलखंडात महाराष्ट्र, पुणे, औरंगाबाद येथील कारागृहामधील विद्यार्थी, देश-विदेशातून विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण करीत होते. मुक्‍त विद्या केंद्राच्या व विद्यापीठाच्या विकासात सरांच्या यशाचे मर्म म्हणजे त्यांची कामाविषयी असणारी निष्ठा, प्रामाणिकपणा आणि शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांना देशाचा जबाबदार नागरिक घडविण्याची तीव्र इच्छा हे होय.

विशारद (बी.ए.) सामाजिक शास्त्रे हा अभ्यासक्रम आंतरविद्याशाखीय समन्वित एकत्रित स्वरुपाचा असल्यामुळे त्या अनुषंगाने अभ्यासक्रमात आवश्यक सुधारणा, अभ्यास साहित्यांची निर्मिती, पुस्तकांचे लिखाण, अभ्यासक्रमाबाहेरील चालू घडामोंडीविषयी विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान मिळण्यासाठी ‘माध्यम’ या षण्मासिकाची निर्मिती इत्यादीसारखे उपक्रम देशपांडे सरांनी उत्स्फूर्त स्वयंप्रेरणेने अमलात आणले व ते यात यशस्वीही झाले.

अभ्यासक्रम राबवित असताना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञानाचा लाभ व्हावा म्हणून महाराष्ट्रातील मोठी शहरे, जिल्ह्याची ठिकाणे पाहून जवळपास तेरा केंद्रांवर वर्षातून तीन वेळा संपर्कसत्रांचे आयोजन केले जाईल, त्याचबरोबर मे महिन्यात वार्षिक परीक्षा व डिसेंबर महिन्यात मध्यावधी परीक्षा आयोजित केली जाईल. या काळात विद्यापीठात हाच विभाग मोठा होता. सरांच्या हाताखाली शिक्षक व शिक्षकेतर असे जवळपास पंचवीस ते तीस कर्मचारी कार्यरत होते. विभागाच्या विविध उपक्रमांचे नियोजन देशपांडे सर कोणत्याही कर्मचार्‍याची अडचण होऊ न देता अगदी सहजपणे करीत असत.

देशपांडे सरांचा विषय इतिहास व राज्यशास्त्र, ते वर्गात अत्यंत सोप्या, समजेल अशा पद्धतीने शिकवित असत. मला एक प्रसंग आठवतो. मी तृतीय वर्षाला असताना संपर्कसत्रात सर अध्यापन करण्यासाठी वर्गावर आले. येताना त्यांनी फक्‍त जगाचा नकाशा आणला होता. त्या नकाशाच्या साहाय्याने सरांनी पहिले महायुद्ध, राष्ट्रसंघ इत्यादी प्रकरणे आम्हाला ज्ञात करून दिली. आजही ते अध्यापन लक्षात आहे.

प्रा. हेमचंद्र देशपांडे हे मला पितृतुल्य. त्यांच्यामुळेच मी आज विद्यापीठात आहे. 1985 साली नुकताच खेडेगावातून आलेला मी, माझ्यावर त्यांच्या वर्तनाचे स्वभावाचे, अध्यापन, अध्ययनाचे संस्कार झाले. अशा या ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. प्रा. हेमचंद्र देशपांडे यांच्या निधनाने त्यांच्या शोकाकुल परिवारात टिळक विद्यापीठ परिवार सहभागी आहोत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा