भाजपचा दांभिकपणा

नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) कोनराड संगमा हे लागोपाठ दुसर्‍यांदा मेघालय राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. कोनराड संगमा यांच्या मुख्यमंत्री शपथविधी समारंभाला दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी उपस्थिती लावली. मेघालय विधानसभा निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप पक्षाचे कथित चाणक्य अमित शहा यांनी मेघालयातील कोनराड संगमा सरकारवर ’हे देशातील सर्वाधिक भ्रष्ट सरकार आहे’, असा आरोप केला होता. मग अशा देशातील सर्वाधिक भ्रष्ट सरकारच्या शपथविधी समारंभाला भ्रष्टाचारमुक्त भारत संकल्पनेचे शिरोमणी नरेंद्र मोदी, तसेच इतर भाजपचे इतर सर्वाच्च नेते उपस्थित कसे? तसेच मेघालयातील अल्पमतातील कोनराड संगमा सरकारला दोन सदस्य असलेल्या भाजपचा पाठिंबा कसा? आदी प्रश्न उपस्थित होतात. एका बाजूला विरोधी पक्ष नेत्यांवर कथित भ्रष्टाचाराच्या आरोपा खाली केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावला जातो; काहींना अटक केली जाते आणि दुसरीकडे केंद्रातील सत्ताधारी भाजप पक्षानेच ’देशातील सर्वाधिक भ्रष्ट सरकार’ असा शिक्का मारलेल्या सरकारच्या शपथविधीला केंद्रीय सर्वोच्च नेते उपस्थिती लावतात, यास काय म्हणावे? आम्ही सांगू तेच भ्रष्टाचाराचे निकष, आम्ही लादू तेच हिंदुत्व आणि आम्ही ज्यांना प्रमाणपत्र देतो तेच देशभक्त! असा हा अत्युच्च म्हणावा असा दांभिकपणा आहे.

बाळकृष्ण शिंदे, पुणे

पेपरफुटीला आळा नाहीच

12वीची गणिताची प्रश्नपत्रिका फुटल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. व त्याचे धागेदोरे मुंबईपर्यंत, असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. सध्या ऐन परीक्षेच्या वेळी पेपरफुटी प्रकरणे, तसेच कॉपी प्रकरणे उघडकीस येत आहे. त्यामुळे बोर्डाची प्रतिमा डागाळली तर जात आहेच. पण, मंडळासमोर भ्रष्टाचारी लोकांनी उभे केलेले आव्हानच आहे. विद्येच्या पवित्र प्रांगणात हा पेपरफुटीचा भ्रष्टाचार पाहून वाईट वाटते. मंडळाने यापूर्वीही पेपर फुटू नये, यासाठी खूप काळजी घेतली होती. यावेळेस तर विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दहा मिनिटे अगोदर पेपर न देण्याचा निर्णय घेण्यात आला का? तर पेपर फुटू नये म्हणून, त्याऐवजी विद्यार्थ्यांना पेपर संपल्यानंतर दहा मिनिटे वाढवून देण्यात आली; पण त्याचा काही उपयोग झाला का? तर नाहीच असे म्हणावेसे वाटते. शेवटी 12वी गणिताचा पेपर फुटलाच कसा? याचा अर्थ मंडळाने कितीही आणि कशीही काळजी घेतली तरी, जोपर्यंत पैशासाठी काय वाट्टेल ते करण्याची तयारी असणारे भष्टाचारी लोक आपल्या आर्थिक तुमड्या भरत राहणार आणि विद्यार्थ्यांचेही नुकसान करणार.

गुरुनाथ वसंत मराठे, बोरिवली (पूर्व) मुंबई

क्रीडा पानाचा जनक हरपला

मराठी दैनिकात सर्वप्रथम क्रीडा पान सुरू करून देशी विदेशी खेळाला मानाचे पान मिळवून देणारे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, स्तंभलेखक, समलोचक, समीक्षक वि. वि. करमरकर यांचे निधन क्रीडा रसिकांच्या मनाला चटका लावून जाणारे ठरले आहे. आज सर्वच वर्तमानपत्राचे शेवटचे पान हे क्रीडा विषयाला वाहिलेले असते. असंख्य वाचक वर्तमानपत्र वाचनाची सुरवातच शेवटच्या पानाने करतात; पण एककाळ असा होता की वर्तमानपत्रात क्रीडा विषयाला नगण्य स्थान होते. पूर्ण पान तर सोडाच; पण चार ओळींची क्रीडाविषयक बातमी छापून आली तरी पुरेशी, अशा काळात करमरकरांनी क्रीडा पत्रकारिता सुरू केली. महाराष्ट्र टाइम्स सुरू झाल्यानंतर या दैनिकाच्या पहिल्या टीममध्ये करमरकर यांचा सहभाग होता. करमरकर यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे कालांतराने संपूर्ण पान खेळांच्या पानाला मिळाले. संपूर्ण मराठी दैनिकाच्या जगतात हा प्रयोग पहिल्यांदा झाला.

श्याम ठाणेदार, दौंड, जिल्हा पुणे

’नॅक’ची विश्वासार्हता ढासळली

देशातील विद्यापीठे, महाविद्यालये इत्यादी उच्च स्तरावरील शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करणार्‍या ‘राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदे’च्या (नॅक) अध्यक्षपदाचा डॉ. भूषण पटवर्धन यांनी राजीनामा दिल्यानंतर ‘नॅक’च्या विश्वासार्हतेबाबत संशय निर्माण झाला आहे. या आधीच महाविद्यालयांना वा विद्यापीठांना मूल्यांकनातील उच्च दर्जाची श्रेणी मिळवून देण्यासाठी संबंधितांकडून गैरप्रकार आणि भ्रष्टाचार करण्यात येत असल्याची शिक्षण क्षेत्रात वदंता होती. आता अध्यक्षांच्या राजीनाम्यामुळे कथित गैरप्रकारांच्या संशयाचे धुके अधिकच गडद झाले आहे. विद्यापीठातील अभ्यासक्रम, अध्ययन-अध्यापन, संशोधन, पायाभूत सुविधा, विद्यार्थी सुविधा, प्रशासन, संशोधनाचा दर्जा आणि स्तुत्य उपक्रम अशा विविध संख्यात्मक आणि गुणात्मक निकषांवर विद्यापीठास यथोचित मानांकन देऊन प्रमाणीकरण करणार्‍या ‘नॅक’ या संस्थेच्याच गुणवत्तेला आणि विश्वासार्हतेला कथित भ्रष्टाचारामुळे तडा जावा हे उच्च शिक्षण क्षेत्राचे दुर्दैव म्हणावे लागेल.

प्रदीप शंकर मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा