टाकळीकाझी गावावर शोककळा

अहमदनगर : घरीच तयार केलेले लिंबू सरबत प्यायल्याने एका कुटुंबातील 3 बालकांना विषबाधा होऊन त्यातील दोघांचा मृत्यू झाला व एकावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची घटना नगर तालुक्यातील टाकळीकाझी गावात घडली.या दुर्घटनेत शिवराज बापू म्हस्के (4) व स्वराज बापू म्हस्के (14 महिने) या 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झाला असून, त्यांचा चुलत भाऊ सार्थक भाऊसाहेब म्हस्के (13) याच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टाकळीकाझी गावात बापू साहेबराव म्हस्के व भाऊसाहेब साहेबराव म्हस्के हे 2 सख्खे भाऊ शेजारी राहतात. त्यातील बापू यांना 2 मुले, तर भाऊसाहेब यास मुलगा व मुलगी आहे. हे चारही भाऊ-बहीण नेहमीप्रमाणे खेळत होते. यातील तिघांनी घरातच लिंबू सरबत करून प्याले. त्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास शिवराजला उलट्या होऊ लागल्या. त्यास उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर चौदा महिन्यांच्या स्वराजलाही त्रास होऊ लागला. त्याला तातडीने रुग्णालयात नेले. परंतु उपचार सुरू असताना त्याचेही निधन झाले. यातील तिसरा मुलगा सार्थकवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती सुधारत आहे.

विषबाधेचे गूढ कायम

म्हस्के कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार तिघांनी लिंबू सरबत घेतले होते. परंतु विषबाधा नेमकी कशाने झाली, याबाबत साशंकता असून, त्यांच्या वैद्यकीय अहवालाची प्रतिक्षा आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा