ऐसपैस शिक्षण : संदीप वाकचौरे

आपण नुकताच मराठी राजभाषा गौरव दिन साजरा केला. दुसर्‍या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला. आपण विज्ञान दिन साजरा करत असलो तरी विज्ञानाचा विचार आणि गाभा समाजमनात किती रूजला हा खरा प्रश्न आहे. विज्ञानाचा पदवीधरही आपल्याकडे अंधश्रध्देच्या दिशेने वाटचाल करतो. त्याला विज्ञानातील कार्यकारण भावाचा विचार प्रत्यक्ष जीवनात उपयोजन करावा वाटत नाही. व्यक्तीची श्रध्दा ही महत्वाची गोष्ट आहेच, पण त्या श्रध्देचा विचार करताना आपण अंधश्रध्देची वाट चालणे हा आपल्या शिक्षणाचा पराभव आहे. विज्ञानाचा विचार समाज मनात प्रतिबिंबीत होताना दिसत नाही. विज्ञानाचे संशोधन आणि विज्ञानाच्या संबंधिचे माहिती असलेली अधिकाधिक पुस्तके इंग्रजी भाषेत आहेत. विज्ञानासंदर्भातील अधिक ज्ञान, माहिती इंग्रजी भाषेत सामावलेली असल्याने त्याचा विचार मातृभाषेत आणण्यात आपल्याला फारसे यश आलेले नाही. शेवटी माणूस काहीही शिकला तरी विचार स्वतःच्या मातृभाषेतच करत असतो. त्यामुळे विज्ञानाचा प्रचार, प्रसार करत असताना मातृभाषेतून विचार पुढे घेऊन जाण्याची गरज आहे .विनोबा म्हणतात, की विज्ञानाचा मातृभाषेशी संबंध नसेल, तर विज्ञानशिकणार्‍याच्या डोक्यात विज्ञान राहणार नाही .त्यामुळे आपल्या शिक्षणाला दोष देण्यापेक्षा भाषेची गुलामी आपण दूर सारल्याशिवाय विज्ञानाचा विचार रूजला जाणार नाही हे लक्षात घ्यायला हवे.

विज्ञानाचा विचार हा समतेचा विचार आहे. त्यातून विवेक आणि शहाणपणाची पेरणी आहे. विज्ञानाचा विचार आणि उद्दीष्टे रूजविण्यात जर आपल्याला पुरेशे यश आले, तर देशाचे चित्र बदलू शकतो. विज्ञानाची वाट ही प्रगतीची आहे. विज्ञानाने आपल्याला भौतिक विकासाची दिशा दाखवली आहे. विज्ञानाच्या संशोधनातून निर्माण झालेल्या साधनांनी समताही प्रस्थापित करण्यास मदत केली आहे. विज्ञानातील शोध सर्वांना समान लाभ देत असतात. विज्ञानाची वाट ही नेहमीच प्रगतीची असते, तर काहीवेळा ही वाट आपल्याला अधोगतीकडे घेऊन जात असते. मात्र त्याचा उपयोग मानवाने विवेकाने केला तर त्याचा निश्चित लाभ मिळणार आहे. विज्ञानामुळे माणसाची अधोगती झाली असे म्हणणे हे आपल्याच विवेकावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे आहे. विज्ञानाच्या दिशेने आपण चालू लागलो तर गरीब, श्रीमंत, स्त्री, पुरूष असे कोणतेही भेद उरत नाही. मोबाईल, रेडीओ, दूरदर्शन, उपचाराची औषधे ही विज्ञानाने निर्माण करण्यात यश मिळवले आहे. त्याचा लाभ सर्वांना समान मिळतो. विज्ञानापुढे सर्व समान असतात. त्यामुळे विज्ञानाचा विचार आपण समाजात रूजविण्यात जर यश मिळवले तर आपल्याला जशी विवेकाची वाट सापडेल त्याप्रमाणे समतेची वाटही अधिक दीर्घ करता येईल.

विनोबा म्हणतात ,की विज्ञानाचा संबंध आपण जेव्हा तपासून पाहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो संबंध हा नेहमीच सृष्टीशी असतो. आपले सारेच जीवन विज्ञानाने व्यापलेले आहे. आपण दिवसभर जो व्यवहार करतो त्यातील एकही व्यवहार असा नसेल, की ज्याचा संबंध विज्ञानाशी नाही. अगदी आपण दिवसभर शेती करत असू तर शेतीसाठी लागणारी औजारे, ट्रॅक्टर, मळणीयंत्र, विहिरीतील पाणी बाहेर काढण्याचे मोटार, बीयाने, खते, किटकनाशके यांचा अत्यंत जवळचा संबंध हा विज्ञानाशी आहे. विज्ञानातील शोधांमुळे आपल्याला शेतीतील मानवीश्रम कमी करण्यात यश मिळवता आले आहे. शेतीतून उत्पादन वाढविणे शक्य झाले आहे. या शोधांमुळे शेतीचा जीवन व्यवहार अधिक सुलभ करण्यात मोठे यश आले आहे. विज्ञानाचे हे शोध नसते तरविकासाच्या प्रक्रियेत आपण कितीतरी मागे राहिलो असतो. त्याच प्रमाणे आपले स्वयंपाकगृह हे देखील विज्ञानामुळे समृध्द झाले आहे. पूर्वी आपल्या घरात अन्न शिजवण्यासाठी तीन दगड अथवा चूलीचे आस्तित्व होते. जळणासाठी आपण लाकूडफाटा वापरत होतो. त्यातून निर्माण होणारा धूर हा पर्यावरणाचा र्‍हास करत होता. डोळ्यांना होणारा त्रास पुन्हा वेगळा. आता किचनमध्ये गॅस, शेगडी, वीजेवरची शेगडी, अनेक धातूची भांडी, फ्रीज, पंखे, मिक्सर, ग्राईंडर, गिरणी यासारख्या अनेक गोष्टी आल्या आहेत. त्यातून स्वयंपाकघर सजले आहे पण त्यापेक्षा या सुविंधानी आपले जीवन अधिक सुखकर होण्यास मदत झाली आहे. विज्ञानामुळे जीवन आनंदी होण्यास मदत होते हे निश्चित आहे. त्याचवेळी जीवनातील महत्वाची गोष्ट म्हणजे सफाई. या क्षेत्रातही मोठा लाभ आपल्याला अनुभवता येतो. व्यक्तीगत साफसफाई, तसेच सार्वजनिक साफसफाई यातही बदल घडताना दिसतो आहे. हे परिवर्तन विज्ञानाने शक्य झाले आहे.त्यातून जीवनातील आनंद व्दिगुणीत होण्यास मदत झाली आहे. हा तर केवळ विज्ञानाच्या लाभाचा परिणाम आहे. विज्ञान ज्यांना कळाले त्यांनी त्याचा उपयोग करत इतरांचे जीवन सुखाची वाट निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे जेव्हा विज्ञानाची वाट सर्वांना दिसेल आणि त्यासंबंधीचा विचार अंतकरणात रूजेल तेव्हा प्रत्येकाचे आयुष्य हे विज्ञानाच्या ज्ञान प्रकाशाने उजळून निघेल यात शंका नाही. ती वाट चालण्याचा विचार विनोबा व्यक्त करीत आहेत.

आपण आणि आपला भोवताल लक्षात घेतला तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विज्ञानाची निंतात गरज आहे. विज्ञान समजून घ्यायचे तर ते विज्ञान संशोधने ज्या पुस्तकात आहे ती पुस्तके समजून घ्यावी लागणार आहे.ती अधिकाधिक पुस्तके इंग्रजी भाषेत आहे. आज आपल्या देशातील कोटयावधी लोकांना इंग्रजीचे ज्ञान नाही, त्यामुळे कोट्यवधी लोकांपर्यत विज्ञानाचा विचार रूजू शकले नाही. त्यासाठी आपण इंग्रजी शिकण्याची गरज आहे का ? लोक विचारतात की इंग्रजीशिवाय विज्ञान कसे शिकता येईल? म्हणजे इंग्रजी आली नाही तर विज्ञानाचे ज्ञानच होणार नाही. मात्र इंग्रजी आली तरी विज्ञानाचे खरोखर ज्ञान होणार आहे का? खरंतर कोणतीही गोष्ट आपल्याला जीवनात परिवर्तनाच्या वाटेने घेऊन जायची असेल तर ती आपल्या मातृभाषेतच असायला हवी. मातृभाषेतून आकलन चटकन होते. मातृभाषेतून मिळणारे विचार हदयाशी नाते सांगत असतात. त्यातून मिळणार्‍या ज्ञानाचा संबंध केवळ माहिती आणि शब्दांपुरता मर्यादित असत नाही. विज्ञानाचा मातृभाषेशी संबंध नसेल तर विज्ञानशिकणार्‍याच्या डोक्यात विज्ञानाचा प्रकाश पडणार कसा? हा प्रश्न कायम राहतो. आपण आजवर विज्ञान शिकवले, त्यासंबंधीच्या अनेकांनी पदव्या प्राप्त केल्या. मात्र विज्ञान तर आपण फक्त मार्कांपुरतेच शिकलो. विज्ञान हे मात़ृभाषेत नसल्याने ते हदयाशी नाते सांगू शकले नाही ही आपल्या शिक्षणातील फार मोठी चूक झाली आहे. आपण हा विचारच करीत नाही , की विज्ञानासारखी महत्त्वाची गोष्ट मातृभाषेत नसेलतर तिचा प्रसार आणि प्रचार कसा होणार? ज्या भाषेचा समूह आहे त्याभाषेतील समूहापुढे त्याच भाषेतून विचार मांडला तर तो अधिक पोहचण्यास मदत करत असतो. हदयाशी नाते सांगितले, की ते अधिक पटत जाते आणि त्यातून सृजनाच्या वाटा सहजतेने आपल्याला सापडत जातात. ती गोष्ट परकीय भाषेत असेल तर तसे घडण्याची शक्यता नाही. त्यामुळे आपल्या देशात विज्ञान शालेय स्तरावर शिकवले गेले आणि विज्ञान महाविद्यालयात शिकवले जाऊन पदवी हातात घेऊन बाहेर पडले तरी त्याचा प्रभाव मात्र हदयावर पडू शकलेला नाही.

विनोबा म्हणतात, की आजकालशेतकी कॉलेजसाठी इंग्रजीचे ज्ञान आवश्यक आहे. इंग्रजीतून शेतीचे ज्ञान दिले जाते. इंग्रजीतून मुलांना शिकवून उत्पादन वाढत नसेल तर मग बैलांनाहीइंग्रजी शिकवायला हवे! ही हास्यास्पद गोष्ट आहे. दहा हजार वर्षांपासूनआमच्याकडे शेती होत आहे. पण आमच्या भाषांमध्ये शेतीवर पुस्तके तयार झालेली नाहीत. आता खरतर शेती आपला पांरपारिक व्यवसाय आहे. त्यात आपण पंरपरेने देखील खूप शिकलो आहोत. जगभरात शेतीत बदल होता आहेत. अशा परीस्थितीत आपली शेती आणि परदेशी शेती यांची तुलना केली तर होणारे बदल टिपता यायला हवे. आपल्या देशाच्या मातीला उत्पादनासाठी काय बदल करण्याची गरज आहे हे जाणता यायला हवे. मुळात आपल्या देशात शेतीत मोठे बदल घडत आहेत. ते बदल शेतकर्‍यांच्या पुढे पोहचवायचे असेल तर आपण शेतीचा विचार आणि बदलाचे वारे हे त्या शेतकर्‍यांच्या भाषेतच पोहचवायला हवे. आज आपले शेती शिक्षणही मातृभाषेतून देण्याऐवजी इंग्रजीतून सुरू केल्याने ती फक्त माहिती राहिली. त्या माहितीचे उपयोजन करण्यासाठी लागणारी क्षमता आपण परकीय भाषेतून फारशी मिळू शकणार नाही. त्यामुळे किमान आपल्याकडे जे ज्ञान आहे ते तरी मातृभाषेतूनच देण्याची गरज आहे. जगात जे म्हणून काही ज्ञान असेल तेही आपण आपल्या मातृभाषेत आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे.

आपण जेव्हा जाणतो तेव्हा त्यातील तत्वज्ञानाचा विचार हा देशी आहे. आपण जगाला अध्यात्माचा सखोल विचार दिला आहे. जसे, की आत्मज्ञानतर या देशाची वस्तू आहे. आपला देशात मोठया प्रमाणावर भाषेची विविधता आहे.त्याभाषेतून लोकव्यवहार होतो आहे त्यातून मूळ विचार पोहचविण्याचा प्रयत्न होण्याची गरज आहे. आपल्याकडे प्राचीन ज्ञानाची शिदोरी आहे अर्थात आत्मज्ञानासंबंधी संपूर्ण साहित्य संस्कृतमध्ये होते. तो विचार आपल्या समाज भाषेत आणण्यासाठी संतानी प्रयत्न केले आहेत. त्यासाठी अनेक संतानी अध्यात्माचा विचार हा समाजाच्या भाषेत आणला. संस्कृत भाषा देवे केली,मराठी काय ती चोराने केली ? असा प्रश्न विचारून संत एकनाथानी मातृभाषेचे महत्व अधोरेखित केले. संत तुकोबा म्हणाले, की वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा/इतरांनी वाहवा भार माथा. संस्कृतमधील आत्मज्ञानाचा विचार मातृभाषेत आला नसता तर त्याचा आज जितका प्रसार आणि प्रचार झाला आहे तितक्या मोठया प्रमाणावरझाला असता का?

विनोबा म्हणतात ,की ज्यांना वरच्या दर्जाचे चिंतन-संशोधन करायचे आहे, त्यांनीजरूर संस्कृत शिकावे. परंतु आत्मज्ञानाचा उपयोग आणि प्रसार या गोष्टीसंस्कृतच्या माध्यमातून कशा होणार? त्यामुळे मातृभाषेतून ज्ञानाचा प्रसार केल्याशिवाय सामान्यांच्या जीवनात परिवर्तन आणि समाजाच्या विकासाची प्रक्रिया होण्याची शक्यता नाही. आपल्याकडे संस्कृत भाषेतील विचार मराठी भाषेत किती आला, त्यापेक्षा संतानी जो विचार समाज भाषेत मांडला तो स्वीकारला गेला आहे. आता सातशे वर्षानंतरही घराघरात ज्ञानेश्वरीची पारायणे होतात. तुकोबांचे अभंग लोकांची तोंडपाठ आहेत. हे केवळ लोकभाषेमुळे घडले आहे. त्यामुळे भाषेचा विचार लक्षात घेतला तर कोणताही विचार समाजाच्या मनाशी घेऊन जाता येतो हे लक्षात घ्यायला हवे.

विनोबांनी विज्ञानाच्या प्रसारातील नेमकी अडचन म्हणजे भाषा आहे हे अधोरेखित केले आहे. त्यामुळे आज आपल्याकडे विज्ञानाचा लाभ घराघरात पोहचला पण विज्ञानाचा विचार मात्र पोहचविण्यात आपल्याला पुरेसे यश आले नाही . याचे कारण मातृभाषेशिवाय विज्ञानाचा विचार पुढे आल्याने त्याचा परिणाम जाणवतो आहे. मुळात ज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन, उपयोग आणि प्रसार या तीनभिन्न गोष्टी आहेत. आत्मज्ञानाचा उपयोग आणि प्रसार व्हावा यासाठी संतांनी त्याला मातृभाषेत आणले. विज्ञानाच्या बाबतीत तेच करावे लागेल. त्यासाठी विज्ञान प्रसार आणि प्रचारासाठी विज्ञान संताची निंतात गरज आहे. विज्ञानात उच्च दर्जाचे संशोधन करायचे असेल तर इंग्रजी, फ्रेंच, जपानी, रशिया यासारख्या अनेक भाषा शिकण्यास हरकत नाही; परंतु विज्ञानाचा उपयोग व्हावा, त्याचा प्रसार व्हावा असे जर आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी मातृभाषेच्या विचाराशिवाय कोणताही पर्याय नाही. विज्ञानाचा विचार सर्वदूर रूजविण्यासाठी मातृभाषेच्या उपयोगाविना गती नाही. संशोधन आणि उपयोग यामधला फरक आपण समजून घ्यायला हवाच. रेडीओचा शोध हे संशोधन असले तरी लोकांच्या हाती तो आल्यावर होणारे उपयोजन ही आणखी वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे संशोधनाचा विचार पुढे घेऊन जाताना विज्ञान रूजविण्यासाठी मातृभाषेचा विचार करण्याची गरज आहे.

एक प्रतिक्रिया

  1. दैनंदिन जीवन हे विज्ञानमय बनले आहे.दिवसेंदिवस विज्ञान तंत्रज्ञानात होणारे संशोधन वाढत आहे ,विज्ञानात जगाने जी झेप घेतली ती सर्वदूर तळागाळात वस्तूरुपाने पोहोचली असली तरी ज्ञान/ माहिती रुपाने पोहोचल्यास
    सामान्य जनतेची वाटचाल सत्तेकडे,न्यायाकडे सुरू होईल.कोणतीही गोष्ट सखोल माहिती सह अनुभवली तर तीत अधिक भर पडते. भारतातील शेती हा प्राचीन व्यवसाय असला तरी क्रुषीविषयक ज्ञान परभाषेतून घेण्यात आणि देण्यात अडचणी येतात ,त्यांचे सार्वत्रिकीकरण होण्यासाठी तिचे ज्ञान मात्रुभाषेत अनुवादीत होणे ,तसेच इथले ज्ञान परकीय भाषांमध्ये अनुवादित होणे ,यातून आणखी नवनवे प्रयोग घडून येतील,संशोधने घडून येतील.उपलब्ध भांडवलाचे सुयोग्य व्यवस्थापन शक्य होईल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा