मुंबई : चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. दिल्लीत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. सतीश कौशिक यांनी बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
ते म्हणाले, ”मला माहित आहे की, मृत्यू हेच अंतिम सत्य आहे. पण हे मी माझा मित्र सतीश कौशिक बद्दल लिहीन असे स्वप्नातही वाटले नव्हते. ४५ वर्षांच्या मैत्रीचा असा अचानक अंत झाला. ओम शांती!
सतीश चंद्र कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी हरियाणामध्ये झाला. ते प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक होते. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी बऱ्याच नाटकांमध्येही काम केले. सतीश कौशिक यांनी मिस्टर इंडिया, दीवाना मस्ताना, साजन चले ससुरालसह बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. तसेच त्यांनी रूप की रानी चोरों का राजा, प्रेम, हम आपके दिल में रहते है आणि तेरे नाम यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. १९८३ मध्ये ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.