रुईछत्तिशीमधून ५ जणांना अटक

अहमदनगर : बारावीच्या पेपर फुटीचे लोण ग्रामीण भागापर्यंत पोहोचले. मुंबई पोलिसांनी बुधवारी नगर तालुक्यातील रुईछत्तिशी गावात केलेल्या कारवाईत येथील इंग्लिश विद्यालयाच्या मुख्याध्यापकासह ५ जणांना ताब्यात घेतले. प्रश्‍नपत्रिकेचे छायाचित्र समाजमाध्यमांद्वारे पाठवून प्रत्येकी १० हजारात त्याची विक्री केल्याचा ताब्यात घेतलेल्यांवर संशय आहे. हीच प्रश्‍नपत्रिका मुंबईतील दादरच्या केंद्रावर पकडल्याने ही कारवाई केल्याचे समजते.

पेपरफुटीप्रकरणी मुंबईतील पथक मिळालेल्या माहितीच्याआधारे थेट नगर जिल्ह्यात धडकले. या जिल्ह्यात त्याचे धागेदोरे असल्याचे समजल्यावरून त्यांनी धडक कारवाई केली. रुईछत्तिशी गावात किरण संदीप दिघे, अर्चना बाळासाहेब भामरे, भाऊसाहेब लोभाजी अमृते, वैभव संजय तरटे, सचिन दशरथ महारनवर यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन मुंबईला नेले. यात मुख्याध्यापकांसह 2 शिक्षक व संस्थाचालक यांचा समावेश आहे.

बारावीच्या परीक्षेतील प्रश्‍नपत्रिका फुटल्यामुळे राज्यभर त्याचा गोंधळ उडाला. दादरच्या अँटॉनिओ डिसिल्व्हा विद्यालयातील शिक्षिकेने शिवाजी पार्क पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून हा प्रकार उघडकीस आला. या संदर्भात गुन्हाही दाखल करण्यात आला. त्याचा तपास सुरू असताना पेपरफुटीचे धागेदोरे नगरपर्यंत असल्याचे या पथकाच्या लक्षात आल्यानंतर ही धडक कारवाई झाली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा