नितीन नलवडे

सांगली जिल्हा आघाडीवर; एकूण ४५० शाळांचा समावेश

जिल्हा परिषदेची शाळा म्हटलं की दगडाच्या भिंती, कौलारू छप्पर, कमी पटसंख्या, पुरेशा सुविधांचा अभाव, असे चित्र आपल्या डोळ्यासमोर यायचे. परंतु, आता मॉडेल स्कूलमुळे हे चित्र बदलताना दिसतंय. मॉडेल स्कूलमुळे आता जिल्हा परिषदेच्या शाळांचे रुपडे बदलताना दिसत आहे. पुन्हा एकदा विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेकडे वळताना दिसतात. खाजगी शाळांच्या तुलनेत सरस सुविधा आता या माध्यमातून मिळत आहेत. यामध्ये लोकसहभाग फार महत्त्वाचा आहे.

शाळा ही लोकचळवळ झाल्यास भविष्यात जिल्हा परिषदेच्या शाळा खाजगी शाळांच्या कितीतरी पुढे असतील, असे आशादायी चित्र निर्माण होत आहे. शहरात खासगी शाळांसाठी मूलभूत सुविधांची वाणवा नाही. त्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांची अवस्था प्रतिकूल आहे. प्रत्येक तालुक्यात मॉडेल स्कूल्स उभारले जाऊन तेथे शिक्षणास पूरक मूलभूत सुविधा पुरविण्याचा प्रशासनाचा संकल्प आहे.

खाजगी शाळेपेक्षा मॉडेल स्कूलमध्ये अधिक सरस सुविधा असतील याकडे लक्ष देण्यात येते. पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांचा मॉडेल स्कूलमध्ये समावेश केला जातो. भौतिक सुविधांबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता जि. प. शाळेत मिळावी, ही मूळ संकल्पना आहे. सांगली जिल्ह्यात 2020-21-172, 2021-22-141, 2023 रोजी 136 शाळांची मॉडेल स्कूलसाठी निवड केली आहे. आतापर्यंत सांगली जिल्ह्यासाठी 150 कोटींपर्यंतचा निधी शाळांसाठी मिळाला आहे.
माझी शाळा म्हणून प्रत्येकाने स्वामित्वाची भावना लोकसहभागासाठी गरजेची आहे. यासाठी लोकचळवळ आवश्यक आहे. सर्व गोष्टी शासनावर न सोडता लोकसहभागातून मदतीचे हात उभे राहिल्यास प्रत्येक गावातील शाळा ही आदर्श होईल. संगणक कक्ष, स्वागत कमान, क्रीडा साहित्य या गोष्टी लोकसहभागातून होणे आवश्यक आहे. आतापर्यंत सांगली जिल्ह्यात सव्वापाच कोटींचा निधी लोकसहभागातून मिळाला आहे. सांगली जिल्ह्यातील एकूण 450 शाळांचा मॉडेल स्कूलअंतर्गत ‘माझी शाळा आदर्श शाळा’ या उपक्रमात समावेश केला आहे. सध्या 12 शाळांचे काम सुरू आहे. कसबेडिग्रज, बागणी, लक्ष्मीवाडी, विसापूर, सिद्देवाडी, कुरळप, कासेगाव, हिंगणगाव आदी शाळांनी पहिला टप्पा पूर्ण केला आहे. यामध्ये सातत्य राखण्यासाठी सांगली जिल्ह्याचे सीईओ जितेंद्र डूडी प्रयत्नशील आहेत. महिन्याला गुणवत्ता आढावा सभा घेण्यात येते.

गुणवत्तेत वाढ

इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पैसे देऊन गुणवत्ता आणि दर्जा नाही, मात्र इकडे मॉडेल स्कूलमध्ये फी न देता गुणवत्तेत वाढ झाली आहे, असे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी व्यक्त केले.

अशी आहे संकल्पना

प्रत्येक तालुक्यात मॉडेल स्कूल्स उभारले जाऊन तेथे शिक्षणास पूरक मूलभूत सुविधा पुरवून गुणवत्तेत वाढ करण्याचा प्रशासनाचा संकल्प आहे. यात ई-लर्निंग सुविधा, ई-क्लासरूम, सौरऊर्जेची यंत्रणा, शाळांसाठी संरक्षक भिंती, वर्गखोल्या, रेनवॉटर हार्वेस्टिंग, संगणक कक्ष, ई-क्लासरूममध्ये संगणक प्रयोगशाळा, इंटरनेट कनेक्शन, टीव्ही, पुरेशा संख्येने शिक्षकांची उपलब्धता, सौरऊर्जा प्रकल्प, बाला पेंटिंग, वॉल कंपाऊंड, प्रयोगशाळा, भोंगा सायरन आदी उपक्रमांचा यात समावेश असतो.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा