वणव्यांपासून वनसंपत्ती वाचवा…

तळजाई परिसरात वनविभागात आठ दिवसांपूर्वी आगीची घटना नुकतीच ताजी असताना जांभूळवाडी दरीपूल मार्गे कात्रज बोगद्यात जाताना डाव्या बाजूला वन विभागात अचानक पेटलेल्या वणव्यामुळे एक हेक्टर वरील वनराई जाळून खाक झाली. या वनक्षेत्राला लागल्या आगीत अनेक झाडे, वाळलेले गवत, तसेच पशू मृत्युमुखी पडले. आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अशा घटना वारंवार होत असतात. रात्री-अपरात्री सिगारेट, तसेच व्यसनी नागरिकांसह काही खोडसाळ व्यक्तींकडून आग लावली जाते. वास्तविक आता वनसंपत्ती अगदीच कमी झाली आहे. त्यातच रस्ते, नागरीकरण यामुळे अनेक झाडांची कत्तल होत आहे. पुणे-सातारा रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरण करण्याच्या कामात अनेक जुने वृक्ष तोडल्याचे नुकतेच दिसले. ज्या मानाने झाडे तोडली जात आहेत, त्यामानाने नवीन झाडे लावली जात नाहीत. याचे मोठे संकट पुढील काळात जाणवणार हे सत्य आहे. उष्णतामान वाढल्यामुळे त्याचे मोठे परिणाम भोगावे लागणार आहेत. अशातच ठीकठिकाणी लागणारे वणवे यामुळे झाडे नष्ट होत आहेत. याचे नागरिकांना प्रबोधन केले पाहिजे.

शांताराम वाघ, पुणे

स्त्रीशक्‍तीला मानवंदना

8 मार्च हा दिवस जागतिक महिलादिन म्हणून साजरा केला गेला. आदिशक्ती, दुर्गामाता ही सगळी स्त्रीशक्तीची रूपे आहेत. छत्रपती शिवरायांसारखे वीर पुत्र देणार्‍या राजमाता जिजाऊ, प्राणांचेही बलिदान करून आपल्या मातृभूमेचे रक्षण करणारी वीरांगना, आपले सतीत्व सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा देणारी माता सीता, सावित्री यासारखी अनमोल स्त्रीरत्ने आपल्या याच भूमीने आपल्याला दिली आहेत. स्त्रीशक्तीची ही वैभवशाली परंपरा आता लोप पावत चालली आहे. वैमानिक, डॉक्टर, इंजिनीअर, अंतराळवीर अशा सर्वच क्षेत्रात स्त्रियांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. एवढेच नाही, तर देशाचे पंतप्रधानपद आणि राष्ट्रपतिपद सुद्धा स्त्रियांनी भूषविले आहे. पण, सध्या आधुनिकतेच्या आणि स्त्री स्वातंत्र्याच्या नावाखाली स्त्रियांची अधोगती होत आहे. स्त्रीचे खरे सौंदर्य हे स्वैराचाराने वागण्यात नव्हे, तर मर्यादेने वागण्यात आणि तिच्या शालीनतेमध्ये असते. उद्याची कर्तृत्ववान आणि संस्कारक्षम पिढी घडवण्याची मोठी जबाबदारी स्त्रियांवर आहे. त्यामुळेच आपल्या देदीप्यमान इतिहासाचे स्मरण ठेवून स्त्रियांनी मर्यादेने वागले पाहिजे.

डॉ. ज्योती काळे, पुणे

मोबाईलचा अतिरेकी वापर

मोबाईलमुळे जग जरी जवळ आले असले, तरी त्याचा वापर योग्य प्रकारे करणे हे ज्याच्या त्याच्या हातात आहे. पालकांनो मोबाईलकडे नव्हे, तर आपल्या पाल्यांकडे वेळीच लक्ष द्या, अशी म्हणण्याची दुर्दैवी वेळ आज आली आहे. मोबाईल तसेच सोशल मीडियाच्या अतिवापराने युवक-युवतींसह अल्पवयीन बालकांच्यावर होणारे संस्कार ही धोक्याची घंटा आहे. वेळीच पालकांनी सजग होत मोबाईलचा अतिरेकी वापर थांबवणे अत्यंत गरजेचे आहे, कोरोना काळात गरज म्हणून दिलेल्या मोबाईलसोबत झालेली दोस्ती आज अनेक युवक-युवतींसोबत बालकांनादेखील गुन्हेगारीच्या विळख्यात खेचत आहे. मोबाईलमुळे आपली कोवळी मुले बालगुन्हेगार बनत असताना पालक अनभिज्ञ कसे ? असा सवाल उपस्थित होत आहे.

राजू जाधव, मांगूर, जि. बेळगांव

खचलेल्या जाळ्यांमुळे अपघात

पुणे शहरातील प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू ओंकारेश्वर मंदिराच्या ठिकाणी महामेट्रोच्या स्टेशनचे काम सुरू आहे. त्याच ठिकाणी या खचलेल्या जाळ्यांमुळे अपघात होत आहेत. तसेच, या ठिकाणी खाजगी चारचाकी वाहनांचे पार्किंग मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी दिवसभर होत असते. त्यात अतिक्रमणांचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. हे प्रश्न प्रशासन गांभीर्याने घेत नसल्यामुळे अनुचित प्रकारात वाढ होत आहे.

अनिल बाळासाहेब अगावणे, पुणे.

पंगतीच्या भोजनाचे सुख

अन्न हे पूर्णब्रह्म आहे. त्याचा सर्वत्र सन्मान जपला जायलाच हवा! खरेतर अन्नग्रहण वा भोजनाचा संस्कार स्वस्थ चित्त व स्वस्थ बैठकीने व्हावा, असे शास्त्र सांगत असले, तरीही निर्विवादपणे असा भोजन संस्कार शारीरिक व मानसिक आरोग्याला निश्चितच अधिक पोषक ठरतो. म्हणूनच पंगत भोजनाला विशेष महत्त्व आहे. परंतु, अलीकडे शुभप्रसंगी आयोजित केलेल्या जेवणासाठी बहुतेक ठिकाणी बुफे पद्धतीचा अवलंब केला जाताना दिसत असतो. अन्न बचत वा अन्नाची नासाडी टाळण्याच्या उदात्त हेतूने ही पद्धती खरेतर आली असावी, परंतु खरेच हा हेतू सफल होताना दिसतो का? याचे उत्तर नाही असेच येईल! रांगेत उभे राहून अन्नपदार्थ घेणे, अवघडल्या स्थितीत ते खाणे, वारंवार पदार्थ घेण्यासाठी जावे अथवा उठावे लागू नये म्हणून भरपूर अन्न वाढून घेतले जाते आणि इथेच अन्नाची नासाडी टाळण्याच्या हेतूला हरताळ फासला जातो! गर्दी, गोंधळ, गैरशिस्त यामुळे भोजनाचा नीट आस्वाद घेता येत नाही, कसा घेणार? आणि म्हणूनच पंगत भोजनाला पर्याय नाही. पंगत भोजनाचे सुखच आगळे!

श्रीकांत मा. जाधव, अतीत

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा