अमर्याद तू…

आठवतंय, कधीतरी मर्यादा या विषयावर ललित लेख लिहिला होता. सुरुवातीलाच डोळ्यासमोर होते, प्रभू श्री. रामचंद्र! एक वचनी-एक बाणी श्रीराम! सत्य आणि धर्मनिष्ठेसाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे श्रीराम! यातना आणि भोग त्यांच्याही आयुष्यात अधिकतर आले पण हे तर- मर्यादा ‘पुरुषोत्तम’ म्हणूनच वंदनीय!
प्रत्येकालाच आयुष्यात मर्यादा सांभाळाव्या लागतात. कधी स्वतः घालून घेतलेल्या तर कधी वडीलधार्‍यांनी ‘शिस्त’ म्हणून अंगवळणी पाडलेल्या. बाहेरून घरी आल्यावर पादत्राणे बाहेर काढून ठेवावीत हा अलिखित संकेत आहे. आरोग्याच्य दृष्टीनेही तो योग्यच आहे. धुडकावून लावला तर जबाबदारी आपलीच! मानला तर येणारी अनुकूलताही स्वतःचीच. ‘मर्यादा’ प्रथमतः स्वतःसाठीच असतात हे नजरेआड करून चालणार नाहीये.

माणसांचंच उदाहरण कशाला, त्या अथांग सागरालाही मर्यादा आहेत. सृष्टीवरील 71% भूभाग व्यापणारे सागर पण त्यांनाही किनार्‍यापाशी ‘लहरींचा खेळ’ मांडावा लागतो. अखंड ‘साद’ घालण्यासाठी ‘गाज’ गीत सुरू ठेवायचं, स्व-प्रतिमा पारदर्शी राखायची आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही ऋतुबदलामुळे उसळून ‘किनारा’ सोडायचा नाही.

पद्मा गोळे या ज्येष्ठ कवयित्रीने कवितेमध्ये लक्ष्मणरेषेच्या रूपकातून मर्यादा नोंदवली त्याचा उल्लेख करते.
सीतेपुढे एकच ओढली रेषा, लक्ष्मणाने
तिने ती ओलांडली आणि झाले रामायण
आमच्यापुढे दाही दिशा लक्ष्मणरेषा
ओलांडाव्याच लागतात
रावणांना सामोरे जावेच लागते
एवढेच कमी असते;
कुशीत घेत नाही भुई दुभंगून!
पद्माताईंच्या अशा कालदर्शी विचारांपुढे गेलेल्या, पुढच्या पुढच्या पिढ्या!

शिक्षणाने स्त्रियांचा ’अवकाशही’ विस्तारला. विशाल झाला. संधी मिळताच त्या-त्या क्षेत्रात स्त्रिया आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू लागल्या. सतत जमिनीवर पाय ठेवून, साधेपणाने बोलणार्‍या, वागणार्‍या , मनस्वी सुधा मूर्ती म्हणजे ‘स्त्रीत्व’ जपूनही अमर्यादपणे मानवता जपणार्‍या ’स्त्री-शक्तीचं ’ उदाहरण आहे. अर्थात् अशा समाजाभिमुख कार्याचा ’श्रीगणेशा’ आधीच झालेला आहे. प्रवाहाला न मानवणारी परिस्थिती , प्रतिकूलतेवर ’ मात ’ करून खंबीरपणाने आणि दूरदृष्टीने समाज सुधारणेचे कार्य करताना त्या स्त्रिया डगमगलेल्या नाहीत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असू देत किंवा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असू देत! सत्त्वशीलता जोपासण्यापासून संस्कृती संरक्षणापर्यंतचं कोणतंही काम सहजतेने तरीही मनस्वीपणे निभावताना आढळते ती स्त्रीच!

मी स्वतः एक स्त्री आहे म्हणून सांगत नाही पण निसर्गाने उपजत दिलेल्या सर्जनशीलता, ऋजुता, वात्सल्य भावना यांची जोपासना करीत स्त्री तिच्या क्षमतांचे परीघ ओलांडते आहे. लेकराला जन्म देणे, त्याचे संगोपन करणे, कुटुंब आणि घराचं ’घरपण’ अबाधित ठेवण्यात अधिक सहभाग स्त्रीचा असतो हे कोणीही मान्य करेल. सहृदयतेचा झरा तिच्या अंतरंगात सतत वहात असतो. त्यामधूनच कृती घडत रहातात.

’स्वयंनिर्भर’ झालेल्या आजच्या स्त्रीमध्ये, ‘मुळातले गुणविशेष’ प्रकर्षाने जाणवतात. निरीक्षणातून, अनुभवातून पारखलेली विशेषता अशी आहे की ‘स्त्री’ एकाचवेळी दहा नाही तरी चार-पाच वेगवेगळ्या प्रकारची कामे सफाईने करते. खरं तर अर्थप्राप्ती किंवा करिअरसाठी घराबाहेर पडणार्‍या स्त्रियांचा हा नित्याचाच अनुभव आहे. गृहिणीला तर ’गृहित’ धरलं जातं. तिची दैनंदिन कसरतही तेवढीच महत्त्वाची! एव्हरेस्ट पादाक्रांत करण्यापासून (बचेंद्री पाल 1993) ते देशाचं खर्चाचं अंदाजपत्रक जाहीर करणार्‍या आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पर्यंत (2022-2023 या वर्षाचेही) कोणकोणत्या क्षेत्रातील प्रथितयश महिलांची नावे घेऊ?

जाता जाता, नौदलातील सहा स्त्रियांनी मिळून केलेल्या नाविक सागर परिक्रमेचा उल्लेख करावाच लागेल. ‘नारी शक्ती पुरस्काराने’ त्या सन्मानित आहेत. 254 दिवस ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, केपटाऊन, मॉरीशस आदी देशांतील सागरांमधून ‘वैश्विक परिक्रमा’ पूर्ण करणार्‍या , धडाडीने आणि विश्वासाने परिक्रमेचे नियोजन आणि प्रत्यक्ष कुशलतेने साकार करणार्‍या वर्तिका, प्रतिभा, ऐश्वर्या, स्वाती, विजया आणि पायल या भारताच्या वेगवेगळ्या प्रांतांतील स्त्रियांनी एका नव्या उच्चांकाबरोबरच एकतेचाही संदेश दिला आहे. म्हणूनच म्हणावसं वाटतं- तू तुझ्या क्षमता सिद्ध केल्या आहेस. करते आहेस. हे नारी, तू अनेक मर्यादा पार करून ताठ मानाने उभी आहेस!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा