जगभरात नर्सेसचा तुटवडा

कोरोनाचा दोन वर्षांचा काळ संपल्यानंतर आता कुठे सर्व गोष्टी पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत. आता या नंतर जगभरात हेल्थ वर्कर्स व नर्सेसची अत्यंत कमतरता भासत आहे. अनेक मोठे देश विकसनशील देशांशी करार करून नर्स व आरोग्य कर्मचारी मागवीत आहेत. सिंगापूरसारख्या छोट्या राष्ट्रालासुद्धा 2030 पर्यंत सुमारे 24 हजारांपेक्षा जास्त नर्सेसची गरज भासणार आहे. कोरोनाकाळात भरपूर काम, पण कमी पगार अशी स्थिती होती. त्यामुळे अनेक कर्मचारी काम सोडून गेले; पण आता यात फरक पडू लागला आहे. आता जगभरात अगदी जर्मनीपासून ते अरब अमिरातपर्यंत नर्स व आरोग्य कर्मचार्‍यांना मोठी मागणी आहे. त्यांना व्हिसा व भरपूर पगाराच्या ऑफर्स व अनेक सवलती देण्यात येत आहेत. आगामी वर्षात 1 कोटी 30 लाख नर्सेस व हेल्थ वर्कर्सची आवश्यकता भासणार आहे, या दृष्टीने विचार करता भारतीय नर्सेसना आपले भवितव्य उज्ज्वल करण्याची ही योग्य संधी आहे. जगातील चीन, मलेशिया, म्यानमार फिलिपाइन्स या देशात सुद्धा भारतीय नर्सेस काम करीत आहेत. सध्या कमीत कमी 27 देशांत भारतीय नर्सेस काम करीत आहेत. अनेक देशांनी नर्सेसना राहण्यासाठी फ्लॅट देण्याची सुद्धा तयारी दाखविली आहे. काही देशांनी त्यांना प्रवास खर्च, प्रशिक्षण खर्च देण्याची सुद्धा तयारी दाखविली आहे. भारताने सुद्धा या संधीच फायदा घेतला पाहिजे.

शांताराम वाघ, पुणे

ठोस कृती आराखड्याचा अभाव!

नुकतेच रायपूर येथे झालेल्या कॉँग्रेसच्या महाअधिवेशनामध्ये आगामी निवडणुकीत बलाढ्य सत्ताधारी भाजपशी लढण्यासाठी काँग्रेस ठोस योजना आखेल, अशी अपेक्षा होती, तथापि महासभेतील चर्चा पाहता काँग्रेसची संभ्रमावस्था अजूनही कायम आहे, असे म्हणता येईल. राहुल यांची भारत जोडो यात्रा प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरली; पण त्याचे मतांमध्ये रूपांतर होईल, याबद्दल काहीही सांगता येणार नाही. कॉँग्रेसकडे ठोस कृती आराखड्याचा अभाव स्पष्टपणे दिसतो. चिंतन-मनन करूनही काँग्रेसला काही नवीन विचार करता आला नाही आणि आजवर ज्या गोष्टी बोलल्या जात होत्या, त्याच फक्त बोलल्या जात आहेत, असेच म्हणावे लागेल.

प्रा. विजय कोष्टी, कवठे महांकाळ

उन्हाच्या झळा वाढल्या

उबदार थंडीने पाय आखडता घेतला असून, गेल्या दहा-बारा दिवसांत राज्यातील संपूर्ण हवामान बदलून गेले आहे. एकीकडे दिवस हळूहळू मोठा होत असताना दुसरीकडे सकाळपासूनच उन्हाचा जबरदस्त तडाखा बसू लागला आहे. बदलत्या ऋतुमानामुळे एरवी एप्रिलमध्ये जाणवणारा कडक उन्हाळा मार्च महिना उजाडण्याच्याआधीच आपले अस्तित्व दाखवू लागला आहे. उन्हाच्या सततच्या तीव्र झळांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. काही ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून दुपारच्या सुमारास उन्हाची दाहकता, तर रात्रीच्या वेळी काहीसा गारवा जाणवत आहे. कमाल आणि किमान तपमानातील मोठ्या फरकामुळे अनेकांना सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी अशा आजारांचा त्रास सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत पाणी उकळून प्यावे, बाहेरचे खाणे टाळावे, रस्त्यावरील उघडे खाऊ नये, उन्हात फिरू नये, फळांचा, तसेच पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

प्रदीप शंकर मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई

बालमजुरांची समस्या

आजची बालके उद्याची या महान व संस्कृती संपन्न राष्ट्राची खरी संपत्ती आहे, त्यांना चांगल्या प्रकारचे दर्जेदार व पायाभूत शिक्षण देणे ही शासनाची जबाबदारी आहे. भारतीय राज्यघटनेत नमूद आहे, की शासनाने देशातील सर्व बालकांना दर्जेदार व गुणात्मक प्राथमिक शिक्षण मोफत द्यावे; मात्र देशातील प्राथमिक शिक्षणाची स्थिती अत्यंत दयनीय आहे. शाळांसाठी पुरेशा सोयीयुक्त सुविधा नाही, पुरेसा शिक्षक वर्ग नाही. काही कुटुंबात वृद्ध माता-पिता किंवा आजी-आजोबा असतात, कुटुंबात आजारी व्यक्ती असतात, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी बालकांना मजुरी केल्याशिवाय पर्याय नसतो. काही भटके कुटुंब असतात तेही आपल्या पाल्याला शाळेत टाकत नाही, यामुळे बालमजुरी वाढते. पालकांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगणे, दुर्बल पालकांची पालन-पोषण जबाबदारी शासनाने स्वीकारणे, बालकांना दत्तक घेऊन त्यांना शिक्षण प्रवाहात आणणे, बालकांना शैक्षणिक सुविधा व सवलती पुरविणे, बालमजूर म्हणून कामाला ठेवणार्‍या मालकांना कठोर शिक्षा करणे, या सर्व घटकांतील दुर्बल बालकांसाठी मोफत वसतिगृह अशा काही सुविधा दिल्यास बालमजुरीला आळा बसेल व घटनेने दिलेल्या प्राथमिक शिक्षण हक्काचे पालन होईल.

धोंडीरामसिंह ध. राजपूत, वैजापूर

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा