संकलन : कल्पना खरे

‘हम भी कुछ कम नही’…
पण इथे नको…

आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहेत. पुरुषांच्या बरोबरीने, अहमहमिकेने आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत; परंतु या बरोबरच स्त्रियांच्यामध्ये व्यसनाधीनता वाढत चाललेली दिसते आहे. सुरुवातीला मजा म्हणून केलेला प्रयोग नकळत फास आवळत जातो. शिक्षणाच्या निमित्ताने आई-वडिलांपासून दूर एकट्या राहणार्‍या मुली, सामान्य परिस्थितीतील मुली कालांतराने या व्यसनपूर्तीसाठी वाममार्गाला गेलेल्याही आढळतात. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या सामाजिक समस्येवर प्रकाश टाकण्यासाठी व्यसनमुक्‍ती केंद्राच्या संचालिका, वकील यांनी काही मते व्यक्‍त केली आहेत.

मानसिक कमकुवतपणाचे लक्षण

सौ. मेघना चाफेकर, विधिज्ञ

मुलगी शिकली, प्रगती झाली, जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी.. या आणि अशा अनेक उक्तींनी स्त्रियांच्या शिक्षणाचे, त्यांच्या साक्षर असण्याचे महत्त्व दृगोचर केल्याचे आपल्याला दिसून येते. तसेच, समाजरथाचे एक चाक असलेल्या स्त्री वर्गाला समान वागणूक न मिळाल्यास समाजरथाची वाटचाल सुरळीत होणार नाही, समाज अधोगतीला जाईल अशी देखील एक विचारधारा दिसून येते. अगदी धोंडो केशव कर्वेंपासून, तर महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंपर्यंत अनेक समाज सुधारकांनी भारतीय स्त्रियांचे समाजातील स्थान सुधारण्यासाठी अविरत प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात.

या सगळ्या प्रयत्नांचे फलित म्हणून स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय समाजातील स्त्रियांचे स्थान झपाट्याने बदलेले आपल्याला दिसून येते; पण त्याच बरोबर बाहेर पडणार्‍या स्त्रीला मग ते शिक्षणासाठी असो की नोकरीसाठी, त्रास देणारे समाजकंटक पण वाढले, म्हणून मग स्त्रियांचा समाजातील बौद्धिक, आर्थिक स्तर वाढवण्यासाठी म्हणून अनेक कायदे केले गेले, अनेक सवलती दिल्या गेल्या, अगदी रेल्वेमध्ये, बसमध्ये लेडीज रिझर्व्ह कोटा ठेवून स्त्रियांना वेगळी विशेष वागणूक देऊन त्यांना कामाच्या ठिकाणी पोचण्यासाठी देखील सवलती दिल्या गेल्या. तिचे समाजात वावरणे सुसह्य व्हावे यासाठी विशेष प्रयत्न केले गेले.

हळूहळू स्त्री ह्या सगळ्या मिळालेल्या स्वातंत्र्याला सरावली. घर, संसार आणि नोकरी हे सगळे सांभाळून घेऊ लागली. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अनेक क्षेत्रे काबीज करू लागली आणि मग आली ती अजिबात संघर्ष न बघितलेली पुढली पिढी. जी आताची पिढी आहे. जिला जन्मापासून काही मिळवण्यासाठी झगडावे लागले नाही. सगळे आयते मिळत गेले. स्वातंत्र्यासाठी झगडा द्यावा लागला नाही. शिक्षण मिळण्यासाठी घरात भांडावे लागले नाही. वेगळे क्षेत्र निवडताना वाद झाले नाहीत. उलट प्रोत्साहन मिळत गेले. त्याच बरोबर महत्त्वाची नाळ तुटली ती स्वयंपाकघराची. नंतर सगळे करायचेच आहे, आतापासून नको कामाला जुंपायला म्हणून किचनमधील बेसिक कामेसुद्धा येत नाहीत, अशी परिस्थिती आताच्या मुलींच्या पिढीची झाली. खरेतर आता किचनमधील बेसिक कामाचे धडे मुलगे आणि मुली दोघांनी गिरवणे आवश्यक आहे. कारण आधी शिक्षण आणि नंतर करिअर घडवताना दोघांनाही बाहेर रहावे हे लागतेच; पण आता परिस्थिती अशी आहे की, दोघांनाही काही येत नाही, मग सतत आहेच आपले स्विगी, झोमॅटो. नाही, नाही फक्त मुलींना दोष देत नाहीय यात, यात बरोबरीने मुलांनादेखील किचनमधील काही गोष्टी जमल्याच पाहिजेत. अजून एक महत्त्वाचा नकारात्मक बदल दिसतो. हल्लीच्या काळात आणि तो म्हणजे, बाकी पूर्वीच्या काळी नवरा दारू पितो, सिगारेट ओढतो, गांजा पितो म्हणून बायका तक्रार करत असत; पण आता हल्ली मुलगा निर्व्यसनी हवा अशी अट घालताना, आपली मुलगीपण निर्व्यसनी आहे ना? याची खातरजमा मुलीच्या आईवडिलांनी करणे आवश्यक होऊन बसले आहे. अनेक कॉर्पोरेट ऑफिसेसच्या खाली असलेल्या चहाटपरीवर सिगार ओढत उभ्या राहणार्‍या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सिगारचे झुरके घेणार्‍या स्त्रियांची संख्या लक्षणीयरीत्या वाढलेली दिसून येत आहे.. कॉर्पोरेट पार्टीजमध्ये हार्ड ड्रिंक्स म्हणजे दारू न घेणे हे डाऊन मार्केट असल्याचे लक्षण समजले जाते. बाकी इतर अफू, गांजा यांच्या रेव्ह पार्टीज तर सर्रास चालतात. मध्यंतरी केलेल्या एका सर्व्हेमध्ये मुंबईतील दहापैकी सहा ते सात घरात नार्कोटिक्सचे सेवन करणारे लोक आढळून येतात, असे निदर्शनास आले होते. कितीही बंदी घातलेली असली तरी अमली पदार्थ अगदी सहजरीत्या उपलब्ध करून दिले जातात आणि त्याचे वेगवेगळे मार्ग अगदी तरुण वयापासूनच मुलींना ठाऊक असतात. हँगआऊट, चिलआऊटच्या नावाखाली वाट्टेल तसा स्वैराचार करण्याची मोकळीक मिळाल्याने उधळलेल्या, बेलगाम घोड्यासारखी अनेकांची अवस्था झालेली दिसून येते.

कधी एकेकाळी केवळ चूल आणि मूल हेच कार्यक्षेत्र असलेली स्त्री अनेक क्षेत्रांत अग्रेसर होत असली, तरी मिळालेल्या स्वातंत्र्याचे स्वैराचारात अनेकींनी रूपांतर केलेले दिसून येत आहे. ’त्यात काय एवढे, कधीतरी चालते थोडेसे, बस वीकएन्डलाच. अगदी कधीतरी बाहेर गेलो तर…’ असे म्हणता म्हणता हे व्यसन आपले आयुष्य कधी व्यापून टाकते त्याचा पत्ताच लागत नाही.

रात्री उशिरापर्यंत चालणार्‍या पार्टीज, पब्जस, डिस्को थेक यात चालणारे दारू सेवन, गांजा, अफूसारख्या मादक पदार्थांचे सेवन यांचे प्रमाण तुफान वाढले आहे आणि स्त्रियादेखील यात पुरुषांच्या बरोबरीने सहभागी झाल्याचे दिसते. पूर्वीच्या काळी घरात असलेली एखादी जुनी जाणती स्त्री मशेरी, तंबाखूचे व्यसन ठेवून असायची, तिच्यावर घरातून जितकी टीका व्हायची ना, तितकीच किंबहुना त्यापेक्षा जास्त टीका आताच्या व्यसनाधीन स्त्रीवर होणे आवश्यक आहे. त्यातून तिला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे मला वाटते. हे मी एक स्त्री असूनही सांगतेय. कारण स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक मी जाणते. सो कॉल्ड अतिरेकी फेमिनिस्ट विचारधारांनी जेवढे स्त्री सबलीकरण चळवळीचे नुकसान केलेय ना, तेवढे तर पुरुषप्रधान संस्कृतीने पण केलेले दिसत नाहीय, हे खेदाने नमूद करावे लागेल.

याच व्यसनाधीन स्त्रिया जेव्हा लग्नानंतर अपत्य प्राप्तीसाठी प्रयत्न करतात तेव्हा त्यांना व्यसनाधीनतेमुळे मूल होताना देखील अडचणी निर्माण होतात. सगळी व्यसने सोडल्याशिवाय दिवस राहणे देखील अशक्य होऊन बसते. अर्थात तरीदेखील मूल होणे ही अवघड गोष्ट होऊन बसते. म्हणजेच ह्या व्यसनाधीनतेवर मोफत मिळालेली गोष्ट म्हणजे वंध्यत्व. अर्थात ही एक बाब सोडून, अजून अशा अनेक आरोग्य समस्या उत्पन्न होऊ शकतात. कॅन्सर, क्षयरोग, श्वसनाचे आजार यासारख्या अनेक दुर्धर रोगांनी शरीर ग्रासले जाऊ शकते. क्षणिक स्वैराचाराला स्वातंत्र्याचे नाव देऊन स्वत:चे आयुष्य पणाला लावण्यात काय अर्थ आहे?

आपण स्त्रिया पुरुषांशी बरोबरी करायला जातो, खरंतर त्याची गरज आहे का मुळात? आपली जडणघडण वेगळी त्यांची जडणघडण वेगळी; पण तरीदेखील बरोबरी करताना ती नेमकी कुठे करावी हेदेखील कळायला हवे. नाहीतर आज पुरुष मंडळी जशी व्यसनाधीनतेमुळे अनेक आजार होऊन मृत्युमुखी पडताना दिसतात, अगदी तेच आणि तसेच प्रमाण बायकांचे देखील असल्याचे भविष्यात आढळून आले तर नवल वाटायला नको.

मग यातून बाहेर पडायचे असेल तर.? कारण बाहेर तर यायलाच हवे. जी गोष्ट चुकीची आहे तिचे समर्थन होऊच शकत नाही. मुळात व्यसनाधीनता हे मानसिक कमकुवतपणाचे लक्षण आहे, त्यामुळे त्यावर काम करताना, शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्याकडे देखील लक्ष देणे अत्यावश्यक आहे. मग यासाठी उपाय काय? मिळालेलं स्वातंत्र्य आणि स्वैराचार ह्यातला फरक समजून घेता आला पाहिजे. आपला सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आपण प्रयत्नशील असायला हवं. वेगवेगळी क्षेत्रे पादाक्रांत करताना, स्त्रीत्व कुठं गुंडाळून ठेवायचं आणि ते कुठं मिरवायचं हे कळलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे ह्या सगळ्याची सुरुवात घरातूनच झाली पाहिजे. आपल्या घरातल्या मुलींना आणि मुलांना देखील, स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक समजावून सांगणे, योग्यवेळी त्यांना योग्य तो मानसिक आधार देणे, समुपदेशन करणे ही महत्त्वाची जबाबदारी पालकवर्गाची आहे. प्रलोभने येतील, डाऊन मार्केट समजले जाईल, चिडवले जाईल, व्यसनाधीन व्हायला भाग पाडले जाईल, नाही असे नाही, पण त्यावर मात करून पुढे जाता यायला हवे.

मनाने कमजोर असाल तरच व्यसने तुमच्यावर हल्ला करू शकतात. त्यामुळे स्वतःच्या मनःशांतीसाठी, मन कणखर राहावे यासाठी घरातल्या मुलामुलींना संस्कारक्षम बनवणे ही आताच्या काळातली नितांत गरज होऊन बसली आहे. व्यसन नको का मग? हवे ना. पण कसले व्यसन हवे? तर व्यसन हवे शारीरिक सक्षमतेचे, व्यसन हवे वाचनाचे, व्यसन हवे वेगवेगळे कार्यक्षेत्र काबीज करण्याचे, व्यसन हवे प्रवासाला जाण्याचे, व्यसन हवे आनंदात जगण्याचे. चला तर मग मैत्रिणींनो, मिळालेल्या स्वातंत्र्याचा उत्तम उपयोग करून घेत व्यसन ह्या शब्दाला सम्यक अर्थ देऊयात आणि आजच्या महिलादिनी आपण तर व्यसनाधीन होणार नाहीच; पण जर कोणी आजूबाजूला तशी आढळून आली तर त्या मैत्रिणीला त्यातून बाहेर काढण्यासाठी नक्की प्रयत्नशील राहण्याचा संकल्प करूया…

मानसिक तणावामुळे व्यसनाधीनतेकडे

मेघमाला नातू, ज्येष्ठ विधिज्ञ

एका सिनेमातला प्रसंग. वैद्यकीय विद्यार्थिनी चष्मा लावून अभ्यास करत असते, तोपर्यंत नायकाचे लक्ष जात नाही. नंतर जेव्हा ती चष्मा फेकून भांग पिते आणि नाचते तेव्हा नायक पाहतो आणि दोघांचे एकत्र दारूपान सुरू होते.

पूर्वी नाटक-सिनेमांत व्हिलन, नंतर पुरुष नायक दारू पीत. आता मुली-महिला दारू पितात. व्यसने करतात. हे सर्रास दाखवले जाते. समाजावर चित्रपट, नाटक यांचा प्रभाव खूप आहे. या गोष्टींमुळे व्यसनाचे उदात्तीकरण होते. अर्थात समाजात वेगळी परिस्थिती नाही. महिलांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढले आहे आणि समाजानेही त्याचा स्वीकार केलाय. व्यसन या गोष्टीला ‘ग्लॅमर’ आले. टीव्ही, नाटक या ग्लॅमरच्या दुनियेतच नव्हे तर आता चहाच्या टपरीवरही मुली सिगारेट ओढताना दिसतात. अनेक समुपदेशक, तसेच व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालक/संचालिका यांचे लिखाण वाचले, काहींशी प्रत्यक्ष बोलून व पस्तीस वर्षांच्या वकिली क्षेत्रातील अनुभव घेतल्यानंतर आज हा लेखन प्रपंच करते आहे.

काही वर्षांपूर्वी व्यसनाधीन महिलांचे चित्र नव्हते. सुरुवातीला व्यसनाधीन महिला बघून असे वाटायचे की या गोष्टी फक्त परदेशात आहेत आणि आपल्या देशातील महिला अगदी साजुक तुपातील जिलबी आहेत; पण जेव्हा काही नावाजलेल्या व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये प्रथम 2000 ते 2010 च्या दशकात अगदी विरळ व्यसनाधीन महिला येऊ लागल्या तेव्हा काही केंद्रांनी महिलांसाठी समुपदेशन सुरू केले. 2007 पासून माझ्या वकिली व्यवसायाचा आढावा घेतला, तर मी कुटुंब न्यायालयातील केसेस बघून निश्चितच सांगते की व्यसनाधीन महिलांची संख्या झपाट्याने वाढली.

एक चाळिशीची उच्चशिक्षित महिला. जेव्हा तिचे लग्न झाले तेव्हाच नवर्‍याने तुला काही नोकरी करायची गरज नाही, असे सांगितले. सुरुवातीला तिला काही वाटले नाही; पण मुले मोठी झाली. नवरा कामात गुंग. तेव्हा तिचे मेनोपॉजचे वय. एकटेपणा आला. तिच्या व्यसनास सुरुवात झाली. इतकी की शेवटी केस माझ्याकडे आली. नवरा म्हणाला की त्याला व्यसन असे मुळीच नव्हते; पण कॉर्पोरेट क्षेत्रात तो उच्चपदस्थ अधिकारी असल्यामुळेच चार ते सहा महिन्यांनी होणार्‍या कॉर्पोरेट पार्टीज्मध्ये तो सोशल ड्रिंकर होता; पण पत्नीने मात्र ड्रिंकिंगची इतकी हद्द ओलांडली की शेवटी नको असलेला घटस्फ़ोट झाला.
दुसरी एक खेड्यातून पुण्यात आलेली. नवरा चांगल्या पदावर. तो तिला पार्टीला घेऊन जाई व पिण्याचा आग्रह करे. ती नकार द्यायची. हा नकार ‘स्टेटस’ला शोभणारा नव्हता. त्यामुळे बोलून बोलून तिला दारू प्यायला भाग पाडले. नवरा सोशल ड्रिंकर राहिला. ती मात्र व्यसनात बुडाली. बर्‍याचदा महिलांना दारूची ओळख पतीकडून होते व त्यानंतर त्या व्यसनी होतात असे व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालकांकडून कळले.

एकंदरच महिलांना व्यसन लागले की त्यात वाहवत जाण्याची प्रवृत्ती असते असे समजले. त्यांची दारूची ओळख ते व्यसन हा प्रवास लवकर होतो. असे का त्याचे उत्तर डॉ. माया तुळपुळे देतात. त्यांच्या मते, ‘लिव्हरमध्ये एटीपेस एन्झाइम असते. ते डिटॉक्सिफिकेशनचे काम करते. भारतीय लोकांमध्ये या एन्झाइमचे प्रमाण कमी असते. त्यातही स्त्रियांमध्ये त्याचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे ओळख ते व्यसनासक्त हा प्रवास वेगाने होतो’ असे बरेच डॉक्टर सांगतात. हे झाले शारीरिक कारण; पण मानसिक कारणेही आहेत. पूर्वी स्त्रिया मानसिक ताण, नैराश्य असेल तर रडून, बोलून मोकळ्या होत. त्यामुळे त्यांना हलके वाटे; पण आम्ही स्ट्राँग आहोत, रडता कामा नये, अशी मानसिकता स्त्रियांमध्ये वाढत असल्याने त्या आता रडत नाहीत. अडचणीही सांगत नाहीत. एकूणच ताण दाबून ठेवण्याची वृत्ती स्त्रियांमध्ये वाढली आहे. मग ताण असह्य होतो तेव्हा व्यसन हा मार्ग निवडला जातो.

वडील व्यसनी असतील, तर आई खंबीरपणे मुलांच्या पाठीशी असते. पण घरात आई व्यसनाधीन असेल, तर मुलांवर गंभीर परिणाम होतो. पोरकेपणाची आणि असुरक्षितपणाची भावना त्यांच्यात वाढते.

एका व्यसनमुक्ती केंद्राकडून पुढील गोष्ट कळली. एक टीनएजर मुलगी. तिला आईच्या व्यसनाचा त्रास व्हायचा. आईचे हे व्यसन कुणाला कळू नये, याची ती काळजी घ्यायची. एकदा ती शेजारी मैत्रिणीकडे गेली, तेव्हा तिची आई इतकी दारू प्यायली की कपडे न घालताच मैत्रिणीच्या घरी आली. स्वतःच्या आईला असे पाहून तिला प्रचंड धक्का बसला. जी मुलगी आईला सावरत होती ती स्वतःच कोसळली. तिला सावरण्यासाठी समुपदेशन करावे लागले.
एका मुलीची आई व्यसनी. आईनेच पुढे मुलीला दारू प्यायला लावले. त्या मुलीचे व्यसन इतके वाढले की ती शाळेतून येताना आईला सरप्राइज म्हणून बिअरच्या बाटल्या घेऊन येऊ लागली.

आणखीही एक गोष्ट अशी कळली की एका मुलीचे वडील परदेशात. इकडे आईला प्रियकर मिळाला. त्यामुळे तो आला की आई मुलीला सांगायची की तू हॉटेलमध्ये जाऊन ये. पैसेही द्यायची. सुरुवातीला ती मुलगी घाबरून जिन्यात बसायची. मग तिला मैत्रिणी मिळाल्या आणि तिची दारूची सुरुवात झाली.
सदतीस वर्षांपूर्वी, 29 ऑगस्ट 1986ला ‘मुक्तांगण’ची स्थापना झाली तेव्हा पु. ल. देशपांडे म्हणाले होते, मी हे केंद्र वाढावे यासाठी शुभेच्छा देत नाही, तर एक वेळ अशी यायला पाहिजे की हे केंद्र बंद व्हावे आणि त्या जागी सांस्कृतिक केंद्र सुरू व्हावे. दुर्दैवाने या शुभेच्छा खर्‍या ठरल्या नाहीत. उलट पंधरा बेड आज दीडशेच्या वर गेल्या आहेत.

27 जानेवारी 2009 मध्ये महिलांसाठी वेगळे केंद्र निशिगंध सुरू झाले, तेव्हा अभिनंदनाचे फोन येऊ लागले. तेव्हा तेथील संचालक मंडळ म्हणाले होते की आमचे अभिनंदन करू नका. महिलांसाठी वेगळे केंद्र सुरू करावे लागणे म्हणजे समाज किती टोकाला गेला आहे, याचेच प्रतिबिंब आहे, असे सांगावे लागले. गेल्या आठ वर्षांचा आढावा घेतला तर विशिष्ट वयोगटातल्या महिलांमध्ये व्यसनाचे प्रमाण जास्त आहे, असे ठोस म्हणता येत नाही. त्यात विवाहिता आहेत, अविवाहित आहेत, नोकरदार व न करणार्‍याही आहेत. आता तर 13-14 वर्षांच्या मुली सिगारेट, तंबाखू, दारू, चरस, गांजा आणि ड्रग्स यात अडकल्याचे दिसतंय याचे व्यसनमुक्ती केंद्रांना देखील प्रचंड दुःख होते. स्त्रियांना उपचार सुरू झाले आणि त्यांना ते पटले की स्त्रिया उपचारांनाही चांगला प्रतिसाद देतात असे व्यसनमुक्ती केंद्राचे अनेक संचालक सांगतात. तिशी-पस्तिशीच्या पुढच्या महिला व्यसनातून बाहेर येण्याचे प्रमाण 85 टक्के आहे असे समजते. त्याहून लहान मुलींमध्ये हे प्रमाण 70 टक्के आहे. तरीही सध्याची परिस्थिती पाहून चिंता वाटते.

पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट. एका व्यसनमुक्ती केंद्रात स्वीडिश व जर्मन विद्यार्थी भारतातील व्यसनमुक्ती केंद्र बघायला आले. विद्यार्थ्यांना केंद्र बघताना विचारले की, इथे फक्त पुरुष आहेत. स्त्री रुग्ण येत नाहीत का?. त्यावेळी त्यांना उत्तर मिळाले होते की, आमच्याकडे बायका व्यसन करत नाहीत. तेव्हाचा अभिमान टिकला नाही, इतका महिलांच्या व्यसनाधीनतेत समाज पुढे चालला आहे.माझ्याकडे मी जेव्हा पस्तीस वर्षांपूर्वीच वकिली सुरू केली तेव्हा पहिल्या पंधरा वर्षात जितके संसार मोडले ते सर्वच्या सर्व नवर्‍यांच्या व्यसनाधीनतेमुळे मोडायचे.
2004 मध्येे मात्र जेव्हा एका उच्चशिक्षित समाजातील केस माझ्याकडे आली, तेव्हा मी पुरती चक्रावून गेले होते. कारण पत्नीचे गुटख्याचे व्यसन पतीसाठी डोकेदुखी ठरले होतेे; परंतु मी पत्नीला भरपूर समुपदेशन करून मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्रात पाठवले. पती समजूतदार होता आणि पत्नीला व्यसनमुक्ती केंद्रात उपचार व समुपदेशन घेतल्यावर ती व्यसनमुक्त झाली आणि दोघे सुखी संसार करू लागले. त्या उलट ठाणे कोर्टात माझ्याकडील एका केसमधे मात्र पत्नीच्या व्यसनाधीनतेमुळे घटस्फ़ोट झाला, तेव्हा मला फार वाईट वाटले. अर्थात अजूनही मी अत्यंत अभिमानाने सांगू शकते की गेल्या वीस वर्षांत मी देशपरदेश फिरून जेव्हा सर्व पृथ्वीवरून भटकले, तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की, अजूनही आपल्या भारत देशात महिलांचे व्यसनाधीन होणे खूप खूप कमी आहे. पुरूष मात्र दिवसेंदिवस व्यसनाधीन होऊन बहकत चालले आहेत.

(माझ्या पस्तीस वर्षांच्या वकिलीत अनेक व्यसनमुक्ती केंद्रांचे संचालक/संचालिका, मुक्ता पुणतांबेकर, तसेच काही सायकियॅट्रिस्ट डॉक्टर जसे डॉक्टर विद्याधर वाटवे, डॉक्टर सुजला वाटवे यांचे सल्ले घेऊन, तसेच लिखाण वाचून सदर लेख लिहिला. त्या सर्वांची मी आभारी आहे.)

व्यसनाधीनतेवर उपचार

प्रफुल्ला मोहिते

सध्याच्या परिस्थितीत स्त्रियांमधील वाढती व्यसनाधीनता हा चिंतेचा विषय ठरतो आहे. हा सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्याही गंभीर प्रश्न आहे; परंतु हा फक्त सामाजिक प्रश्न नसून त्या स्त्रीचा मानसिक व शारीरिकही प्रश्न आहे. कारण व्यसन हा मेंदूचा, मनाचा आजार आहे. व्यसनी स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा फक्त ‘वाईट स्त्री’ असा न ठेवता, तो फार नैतिकतेचा प्रश्न न बनवता, तिच्याकडे एक ‘आजारी स्त्री’ बघितले जावे, असे वाटते.

नशेचे शरीरावर होणारे परिणाम खूपच गंभीर असतात. नशा जेव्हा मेंदूपर्यंत पोहोचते तेव्हा प्रथम मेंदूच्या मागील भागावर (हायपोथलॅमस) परिणाम करते. त्यामुळे भावनांची तीव्रता वाढते. नंतर मेंदूच्या पुढील भागावर असर सुरू होतो. या भागात गेल्यावर त्या स्त्रीचा सारासार विचार संपतो. बोलण्याची पद्धत बदलते. जाणिवा बोथट होतात, जीभ, शरीराच्या हालचाली या सर्वांवरच जडत्व पसरते. दारू किंवा इतर नशा शरीराच्या प्रत्येक भागावर परिणाम करतात. जीभ, अन्ननलिका, आतडे यांना व्रण पडतात. लिव्हरला जास्त काम करावे लागते. किडनी, रक्तदाब या बरोबरच स्त्रीच्या मासिक पाळीच्या तक्रारी सुरु होतात. प्रजनन क्षमतेवरही परिणाम होतो. शरीरातील प्रत्येक पेशीवर नशेचा परिणाम होतो. हे सर्व माहीत असूनही, सहन करूनही ती स्त्री वारंवार व अधिक प्रमाणात नशा करत राहते, कारण आसक्ती. अगदी सुरुवातीला व्यसन जेव्हा थोडे असते. तेव्हा ते सुख, आनंद, उत्साह देणारे असते; परंतु ते वाढतच जाते आणि एक वेळ अशी येते की, स्त्री व्यसनाची गुलाम होऊन जाते, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या.

नशा नाही केली तर शरीर लक्षणे दाखवते. कारण शरीराच्या प्रत्येक पेशीकडून नशेची मागणी सुरू होते. शरीराला कंप सुटणे, वेदना, भास होणे, आवाज ऐकू येणे, या लक्षणांना घाबरून परत नशा. सुरवाच्या आसक्तीमुळे नशेची अनावर मानसिक ओढ, तारतम्य संपलेले, अशी ही गुलामगिरी.

या सर्वांवर काय उपाय? घरचे खूप उपाय करतात, जे कानावर येतील ते. समजावणे, धाक दाखवणे, जन्मपत्रिका, तांत्रिक-मांत्रिकापर्यंत काहीही. मग कारणांचा शोध चालू होतो. पण, व्यसन ह्या आजाराचे एकच कारण असते, तिची नशेविषयी असणारी आसक्ती. आपल्याकडे दुर्दैवाने हे सर्व उपचार झाल्यानंतर शास्त्रशुद्ध उपचारांकडे माणसे वळतात.

उपचारांमध्ये प्रथम येते ते निर्विषीकरण. साधारणपणे हॉस्पिटलमध्ये 3 ते 5 दिवसांत हे उपचार होतात. त्यात व्यसन बंद झाल्याने होणार्‍या शारीरिक त्रासांची काळजी घेतली जाते. प्रसंगी मानसोपचार तज्ज्ञांचीही मदत घेतली जाते. अल्कोहोलिक अ‍ॅनॉनिमस ही जागतिक स्तरावरची संघटना आहे. व्यसन ह्या आजारात या मीटिंग्जचा फायदा खूप होतो. व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झाल्यानंतरचे उपचार साधारण पुढीलप्रमाणे असतात.

शारीरिक शिक्षण : व्यसनात स्नायू आखडणे, लवचिकता नसणे, शरीराला आलेले मंदत्व, जडत्व यासाठी अगदी सुरुवातीला वॉर्मिंग अप, पी.टी.सारखे व्यायाम करून घेतले जातात. नियमित व्यायामामुळे उत्साह वाटू लागतो.

योगोपचार : साधी आसने, प्राणायाम या स्वरुपात योग शिकवला जातो. व्यसनात ती स्त्री खूप बेशिस्त झालेली असते. कधीही झोपणे, उठणे, काम यांच्यात शिस्त नसते, म्हणून सकाळी सहाला उठणे व रात्री दहाला झोपणे इथपासून उपचारांना सुरुवात होते.

गटोपचार : यात आजार, लक्षणे, परत आजार न उलटण्यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन केले जाते. भावनांची हाताळणी, वेळेचे नियोजन, ताणतणावांशी सामना, संवाद कसा असावा, समस्या सोडवणे याचे शिक्षण दिले जाते.

वैयक्तिक समुपदेशन : समुपदेशक ही रुग्ण मैत्रिणीच्या व्यसनमुक्तीच्या प्रवासातील साथीदार, मार्गदर्शक असते. स्त्रीचे भावविश्व खूप नाजूक असते. त्यात तिच्यावर झालेले व्यसनाचे परिणाम, तिचे विस्कटलेले कुटुंब, उद्ध्वस्त नाती याचा तिच्यावर आता शुद्धीत आल्यावर होणारा परिणाम हे अनेक प्रकारे ती व्यक्त करत असते. त्यात दोष देणे, स्वत:च्या चुका नाकारणे किंवा मिनिमाईज करणे, सहानुभूती मिळवण्यासाठी रडण्याचे शस्त्र वापरणे या प्रकारचे वर्तन असते किंवा स्वत:च्या चुकांविषयी अपराधीपण, नैराश्य, कुटुंब-समाज काय म्हणेल, अनेक प्रकारचे तणाव तिच्या मनावर असतात.

यावर तिला वास्तवाचे भान देणे, आताच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत करणे, भावनिक आधार देण्याचे काम समुपदेशक करते. या बरोबर तिच्या वैवाहिक जीवनातील गैरसमज मिटवणे, पालकांना इतर नातेवाईकांनाही समुपदेशन केले जाते. सर्वात जास्त काम तिच्या ‘विचारांवर’ केले जाते. ‘‘आजकाल खूप जणी घेतात’, नवराच पितो त्याला कंपनी द्यावीच लागते’, ‘मी काही इतके व्यसन करत नाही’, माझ्या कॉलेजमधील सर्वच मुली स्मोकिंग करतात, माझे नैराश्य, माझे ताण, असे अनेक विचार तिच्या मनात असतात. हे विचार जेव्हा बदलतात, तेव्हाच व्यसनमुक्तीची सुरुवात होते. स्वावलंबन साधेपणा, स्वयंशिस्त हा तर उपचारांचा गाभा असतो. हे सर्व बदल करून जेव्हा या व्यसनाच्या पाशातून सुटतात, परत एकदा सुखी जीवनाकडे वाटचाल करतात, तेव्हा आम्हा कार्यकर्त्यांना समाधान मिळते.

महिलांमधील वाढत्या व्यसनाधीनतेचा विचार करून जानेवारी 2009 मध्ये मुक्तांगणमधे ’निशिगंध’ हा व्यसनाधीन महिलांसाठी स्वतंत्र विभाग सुरू केला. या विभागाचे वैशिष्ट्य म्हणजे इथला सर्व स्टाफ फक्त महिलाच आहेत. त्यामुळे येणार्‍या रुग्ण मैत्रिणींना इथे कम्फर्टेबल वाटते. ’निशिगंध’च्या समन्वयक प्रफुल्ला मोहिते आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा