थकीत करवसुलीला जबाबदार कोण?

अंदाजपत्रकात जाहीर झालेल्या करांच्या वसुलीत केंद्र सरकारला पूर्ण यश मिळत नसल्यामुळे 15.82 लाख कोटी रुपयांची कर थकबाकी वसूल होणे बाकी आहे असे वृत्त आहे. या रकमेमध्ये कंपन्यांवर लादलेले विविध प्रकारचे कर व व्यक्तिगत प्राप्तिकर, वस्तू आणि सेवांवरील कर यांच्या वसुलीत 12 लाख कोटी रुपयांची वसुली अडकली आहे, उर्वरित अंदाजे 3.80 लाख कोटी रुपयांच्या वसुलीमध्ये वादविवाद नसले, तरी वसुली बाकी आहे. कर वसुलीतील थकबाकी वाढत जाणे हे नेहमीचेच झाले आहे. वर्षानुवर्षे करांच्या थकबाकीचा मोठा हिस्सा जर वादग्रस्त कारणांमुळे वसूल करण्यात अडथळे निर्माण होत असतील, तर तत्संबंधीच्या अटी, नियम, सवलती यांमध्ये बदल घडवून जास्तीत जास्त करवसुली करून थकबाकी शिल्लक राहणार नाही, याकडे अधिकार्‍यांनी लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. करांसंबंधी कोर्टांतील वादविवाद, कर देणार्‍यांचे गायब वा पलायन होणे अशा प्रकारच्या कारणांनी थकबाकी वाढत जाते. यामुळे देशातील सरकारांपेक्षा कर वसुली यंत्रणा व त्यांच्या विविध विभागांतील कार्यपद्धती आणि त्यांची अकार्यक्षमता दिसून येते. सरकारच्या अनुमतीने थकबाकीदारांना काही सोयी, सवलती देऊन थकबाकी वसूल करणे हे खरे तर जबाबदार अधिकार्‍यांचे कर्तव्य असते. कित्येकांवर कर वसुलीचा तगादा लावला जात असताना मोठ्या रकमेची वसुली करण्यात सरकारी खात्यांकडून जो काही विलंब होत असतो त्यामुळे कर थकबाकी वाढत जाते त्याची तुलना बँकांच्या वाढत्या ’एनपीए’शी होऊ शकेल.

राजन पांजरी, जोगेश्वरी.

भाजपचा बालेकिल्ला हादरला

भाजपच्या दिवंगत आमदार मुक्‍ता टिळक यांच्या निधनामुळे रिकाम्या झालेल्या जागेवर कसबा विधानसभा पोटनिवडणूक घेण्यात आली. त्यात भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली, तर महाविकास आघाडीने काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. या चुरशीच्या लढाईत महाविकास आघाडीने धंगेकर यांच्या पाठीशी राहून त्यांना मोठ्या मताधिक्क्याने विजय प्राप्त करून दिला. महाविकास आघाडीने कसबा काबीज केला. धंगेकरांच्या रूपाने जनहित साधले. महाविकास आघाडीने स्थान राखले.

नजीर अहमद एम. अत्तार, पुणे

जलप्रदूषण रोखावे

प्रदूषणामुळे देशातील नद्यांचे पाणी पिण्यालायक राहिले नाही. प्रदूषणामुळे केवळ मानवाच्याच नव्हे, तर जलचरांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. अर्थात याला आपणच जबाबदार आहोत. नद्यांच्या काठावर वसलेल्या शहरातील केरकचरा, सांडपाणी, कारखान्यातील रसायन मिश्रित दूषित पाणी, सतत होणारा वाळू उपसा यामुळे नद्या प्रदूषित होत आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने नद्यांचे हे प्रदूषण रोखण्यासाठी ठोस पावले उचलायला हवीत. जे कारखाने आपल्या कारखान्यांमधून नद्यांमध्ये दूषित पाणी सोडत असतील त्यांचे परवाने रद्द करायला हवेत. वाळू उपसा थांबवायला हवा. जनतेनेही नद्यांमध्ये सांडपाणी सोडू नये. जलप्रदूषण रोखायची जबाबदारी जितकी सरकारची आहे तितकीच ती जनतेचीही आहे.

श्याम ठाणेदार, दौंड, जि. पुणे

न्यायालयाच्या सुट्ट्या

वर्षभरात न्यायालयास 102 दिवस सुट्ट्या असतात. त्यात वर्षभरातील 52 रविवार, दुसरा व चौथा शनिवार 24 आणि 26 सरकारी सुट्ट्या. या व्यतिरिक्त 8 मे ते 4 जून उन्हाळी व 25 ते 31 डिसेंबर हिवाळी अशी 41 दिवस सुट्टी असते. स्वातंत्र्यानंतर ही उन्हाळी आणि हिवाळी सुट्टी रद्द व्हायला हवी होती. या बरोबरच प्रकरण प्रलंबित ठेवण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला जातो. दावा दाखल करण्याच्या नियमात कालानुरूप बदल करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वारंवार तारखा देणे पण टाळले पाहिजे. न्यायालयाचे कामकाज सरकारी कार्यालयाप्रमाणे सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 असे केले पाहिजे. तरच यातून मार्ग निघेल.

विजय देवधर, पुणे

खरी शिवसेना जनताच ठरवेल

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंकडे असल्याचा निर्वाळा दिला. असे झाले असले तरी शिवसेनेचे खरे वारसदार कोण, शिवसेना कोणाची हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. देशाच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष हा लोकशाहीची काय अवस्था करू शकतो हे या निर्णयावरून जनतेसमोर आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी उदयाला आली. मागील 25 वर्षांच्या कारकिर्दीत शिवसेना आणि भाजप यांची युती होती; मात्र मुख्यमंत्रिपदावरून युतीला तडा गेला. निकालावरुन शिवसेना संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे वाटते. उद्धव ठाकरे यांचा जनाधार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राजू जाधव, मांगूर, जि. बेळगांव

दोषांची होळी करूया !

प्रत्येक माणसांत जसे काहीना काही गुण असतात, तसे असंख्य दोषही असतात. या दोषांमुळे जीवनात अनेकदा अपयश पदरी पडते, अपमान सहन करावा लागतो, नात्यांमध्ये वितुष्ट निर्माण होते, अनेकदा आर्थिक हानीही सहन करावी लागते. हे दोष माणसाचे कट्टर वैरी असतात. त्यामुळे फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजेच हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी आपल्यातील दोष, अनिष्ट विचार होळीत टाकून ते नष्ट करावेत, असे हिंदु धर्मशास्त्र सांगते. पुढे 15 दिवसांनी हिंदू नववर्षारंभ म्हणजेच गुढीपाडवा येतो. या दिवशी नवा संकल्प केला जातो.

मात्र खरोखर अशाप्रकरे दोषांची होळी करता येते का ? आपल्यातील दोष होळीत जाळून एका दिवसांत नष्ट करता येतात का ? आपल्या प्रत्येकावर जन्मोजन्मीचे संस्कार असतात, या संस्कारांतूनच आपल्यांत गुणांची आणि दोषांची निर्मिती झालेली असते. आपल्यामध्ये कोणकोणते दोष आहेत हे प्रत्येकाला चांगलेच ठाऊक असते. होळीमध्ये जाळून असे सर्व दोष नष्ट जरी करता नाही आले, तरी या दिवशी आपल्यातील 2 प्रबळ दोष नष्ट करण्याचा निश्चय तर आपण नक्कीच करू शकतो. हा निश्चय एकदा झाला की पुढचे 15 दिवस आपल्या हातात असतात. या 15 दिवसांत सर्व प्रयत्नांची शिकस्त करून ते नष्ट करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून पुढे येणार्‍या नवीन वर्षात या दोषांमुळे आपली होणारी हानी टळेल. 2 प्रबळ दोषांवर आपल्याला मात करता आल्याने मिळणारा नवीन वर्षाचा आनंद काही वेगळाच असेल, चला तर यंदा होळीला आपल्यातील किमान 2 दोषांची होळी करण्याचा संकल्प करूया !

नरेश घरत, चेंबूर

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा