ईशान्येच्या तीन राज्यांतील निकालांनी काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांना जोरदार धक्का दिला आहे. आपसात भांडत राहिल्यास त्यांना विजय मिळणार नाही. ऐक्यासाठी कोण कमीपणा घेणार हाच कळीचा मुद्दा आहे.
त्रिपुरा, नाग प्रदेश व मेघालय या ईशान्येकडील राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पारडे जड दिसत आहे; मात्र त्यांना निर्भेळ यशाने हुलकावणी दिली हेही खरे आहे. त्रिपुरामध्ये भाजप सत्ता राखणार हे आधीच स्पष्ट झाले होते. डाव्या पक्षांनी काँग्रेसबरोबर युती केली असली तरी त्यांच्याकडे प्रभावी नेतृत्व नव्हते आणि मतदारांना आकर्षित करू शकेल असा कार्यक्रमही नव्हता. त्यातच त्रिपुराच्या माजी राजघराण्यातील वंशज प्रद्योत देवबर्मा यांच्या टिप्रा मोथा पक्षाने आदिवासी अस्मितेचा मुद्दा उपस्थित केला. या पक्षाने काही जागा जिंकताना भाजप व डाव्यांचेही नुकसान केले; मात्र ’किंगमेकर’ बनण्याची प्रद्योत यांची महत्त्वाकांक्षा फोल ठरली. स्वतंत्र टिप्रा भूमी ही मागणी वगळता प्रद्योत यांच्या अन्य मागण्यांचा विचार करण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. त्यांना पूर्ण बहुमत मिळाल्याने ते प्रद्योत यांना फारशी किंमत देण्याची शक्यता नाही. नाग प्रदेशात नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी या प्रादेशिक पक्षांच्या मदतीने भाजपने पुन्हा बहुमत मिळवले आहे. काँग्रेसला येथे गेल्या निवडणुकीत एकही जागा मिळाली नव्हती आणि आताही तीच अवस्था आहे. त्यामुळे त्यांनी दु:ख करण्याचे कारण नाही. पुण्यात कसबा मतदार संघातील विजय म्हणजे मोठ्या जखमेवरची छोटी मलमपट्टी आहे.
विरोधकांना इशारा
मेघालयात कॉन्रॅड संगमा यांच्या एनपीपी या पक्षाने मिळवलेले यश उल्लेखनीय आहे. त्यांच्या खात्यात गेल्या वेळेपेक्षा किमान पाच जागा जास्त आल्या आहेत. काँग्रेसने तब्बल 16 जागा गमावल्या आहेत. सत्ता स्थापण्यासाठी ’सर्व पर्याय खुले’ असल्याचे संगमा यांनी जाहीरही केले आहे. कोणत्या पक्षाची ते मदत घेतात याची उत्सुकता आहे. सत्तेत सहभागी होण्यासाठी छोटे प्रादेशिक पक्ष किंवा वेळ प्रसंगी भाजपही त्यांना मदत करू शकेल. कॉन्रेड संगमा यांचे वडील पी.ए. संगमा मूळचे काँग्रेसचे. शरद पवार यांच्याबरोबर ते बाहेर पडले व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. तेथून हकालपट्टी झाल्यावर त्यांनी नॅशनल पीपल्स पार्टी हा पक्ष स्थापन केला. त्याचे राष्ट्रीयत्व नावापुरतेच आहे. कॉन्रेड यांनीही प्रादेशिक अस्मितेच्या आधारे यश मिळवले हे उघड आहे. येथे तृणमूल काँग्रेसने चंचू प्रवेश करताना काँग्रेसचे जास्त नुकसान केले हेही स्पष्ट आहे. कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाने किती टक्के मते मिळवली याचे तपशील येत्या एक-दोन दिवसांत जाहीर होतील; परंतु सध्याचा निकाल महत्त्वाचा आहे. त्रिपुरा आपल्या हातात आले असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला होता. तिन्ही राज्यांत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक नेत्यांनी प्रचारही केला; पण ना त्याचा उपयोग झाला, ना राहुल यांची भारत जोडो यात्रा मदतीला आली. गुजरातेत ज्याप्रमाणे पूर्वी होत्या त्याही जागा पक्षाला राखता आल्या नाहीत, त्याचप्रमाणे त्रिपुरातही युतीला मागील संख्याही गाठता आली नाही. भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केवळ टीका करून मते मिळत नाहीत हे एव्हाना राहुल, काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांना उमगले असावे. ’मतदार जोडण्या’साठी त्यांना वेगळी धोरणे आखावी लागणार आहेत. पोट निवडणुकांमध्ये तामिळनाडूत एक जागा सत्तारूढ द्रमुकच्या आधारे काँग्रेसला मिळाली. महाराष्ट्र विधानसभेच्या कसबा व चिंचवड या मतदार संघांतही पोटनिवडणूक झाली. त्यापैकी कसब्याची जागा भाजपने विशेष प्रतिष्ठेची बनवल्याचे जाणवत होते. खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात आले. बहुसंख्याकांना खुश करण्यासाठी त्यांनी मंदिरात आरती वगैरेही केली. पक्षाने पैसाही अमाप खर्च केल्याची बोलवा आहे. एवढे करूनही काँग्रेसने कसब्यात विजय मिळवला. सुमारे तीन दशकांचे या मतदार संघातील भाजपचे वर्चस्व काँग्रेसने मोडले. उद्धव ठाकरे यांचे सरकार भाजपने ज्या पद्धतीने पाडले त्याबद्दलची नाराजी कदाचित त्या पक्षाला भोवली असावी. या यशाची पुनरावृत्ती काँग्रेस पुण्यात विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत करू शकते का? ते पाहायचे. सहानुभूतीच्या मतांमुळे चिंचवडमध्ये विजय मिळाला, यात भाजपचे कर्तृत्व कमी आहे; मात्र सध्या तरी भाजपचे वर्चस्व कायम आहे हे ईशान्येच्या निवडणुकीने दाखवून दिले आहे.