अटलजी, अडवाणींचा भाजप कुठे?

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष अगदी टोकाला किंवा टोकाच्या संघर्षाला पोहोचला आहे. सत्तेची चुरस आणि सत्तेची लालसा कुणाला कुठे आणि कुठपर्यंत नेईल सांगता येणार नाही. तसेच, या राजकीय नाट्याचे आणखी किती अंक होणार आहेत हे नाट्य चालविणारे सूत्रधारच जाणे. शिवसेना म्हणजेच ठाकरे या समकरणालाच छेद देण्याचे काम शिंदे गटाने केले. त्यांच्या मागे खरे सूत्रधार कोण आहेत हे सर्वश्रुत आहेच; परंतु, हे सर्व करण्याची गरज होती काय? महाराष्ट्रात युती करून शिवसेनेच्या मसल पॉवरवर भाजप राज्यात सर्वत्र पसरली. आज त्याच भाजपला राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशातच प्रादेशिक पक्षांचा त्रास कसा काय व्हायला लागला? प्रादेशिक पक्षच कालांतराने राष्ट्रीय पक्ष बनतो त्याचे उत्तम उदाहरण आम आदमी पक्ष आता राष्ट्रीय पक्ष होईल; पण, ज्या शिवसेनेसोबत निवडणुका लढविल्या साथ-सोबत केली आज त्याच पक्षाला कोंडीत पकडून नामोहरम करण्याची रणनीती राबविली जात आहे. आज तुम्ही सुपात आहात; पण तुम्हालाही कधीना कधी जात्यात जावे लागणारच ना? अटलजी आणि अडवाणींचा हाच भाजप आहे का? असा प्रश्न पडत आहे.

दत्तप्रसाद शिरोडकर, मुंबई

कांद्याला योग्य भाव द्या

शेतकरी जगला तर देश जगेल आणि देश जगला, तर देशवासी जगतील हे जर सत्य आहे, तर शेतकर्‍याने उत्पादन केलेल्या कांद्याला योग्य भाव का नाही? कांदा उत्पादन करण्यासाठी जो खर्च येतो तोही खर्च कांदा विकून निघत नसेल, तर शेतकर्‍यांनी कसे जगावे? बाहेरच्या देशातील कांदा आयात करणे कितपत योग्य आहे? याचा विचार शासनाने करावा, तो आयात करणे, त्यासाठीचा खर्च, त्याची सुरक्षितता या बाबी खूपच महागड्या आहेत. कांद्याला शेतकरी मागणीनुसार योग्य भाव देऊन शासनाने भारतीय शेतकर्‍यांना दिलासा द्यावा व भारतीय शेती व शेतकरी जगवावा.

धोंडीरामसिंह राजपूत, औरंगाबाद

भाजपची लोकप्रियता घटली

आगामी लोकसभा 2024 च्या निवडणुकीचे वेध प्रत्येक पक्षाला लागले आहेत. सत्ताधार्‍यांसह विरोधकांनीही कंबर कसली आहे. निवडणुका जशा जवळ येत आहेत, तशी जनेतच्या मनात राजकीय पक्षांविषयीचे मत बदलत असल्याचे दिसते. नुकत्याच झालेल्या एका पाहणीनुसार भाजपला नुकसान होण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसच्या लोकप्रियेत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी भाजप आणि काँग्रेससह इतर पक्षांनी 2024 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सध्याच्या घडीला निवडणूक झाली, तर काय निकाल लागू शकतो, यावर पाहणी घेण्यात आली होती. यात भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला 298 जागा मिळू शकतात, तर काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीएला 153 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतर पक्षांना 92 जागांवर समाधान मानावे लागेल, असे समोर आले. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा काँग्रेससाठी गेम चेंजर ठरणार असे दिसून येते आहे.

राजू जाधव, मांगूर, जि.बेळगांव

हा चमत्कारच

चमत्कार कशाला म्हणतात हे सर्वांनाच माहिती आहे; पण आता त्याची प्रचिती येत आहे. तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर अनेक दिवस उलटल्यानंतरसुद्धा अजूनही लोकांना ढिगार्‍यातून जिवंत बाहेर काढण्यात येत आहे. शंभरहून अधिक तासांनंतर एका नवजात बालकाला जिवंत वाचवण्यात यश आले. हे चमत्कारापेक्षा कमी नाही. माणसाचा प्रत्येक श्वास दैवी इच्छेनुसार चालतो. या जगात जीवनापेक्षा मौल्यवान काहीही नाही. म्हणूनच प्रत्येकाने देवाचे नेहमी आभार मानले पाहिजेत.

प्रा. विजय कोष्टी, कवठे महांकाळ

एल निनोचा परिणाम काय?

गेली काही वर्षे देशात पावसाची व मान्सूनची स्थिती चांगली होती. त्यामुळे साहजिकच लोकांना पाणी व पर्यायाने धान्याचे उत्पादन समाधानकारक होते. यंदा मात्र पावसाचा अंदाज देताना अमेरिकेतील क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने एल निनोबाबत एक अंदाज व्यक्‍त केला आहे. त्यानुसार यंदाच्या उन्हाळ्यात प्रशांत महासागरात एल निनोची स्थिती निर्माण होऊ शकते. सध्या हा प्राथमिक अंदाज आहे असे असले तरीही याला भारतातील मान्सूनच्या दृष्टीने अतिशय महत्त्व आहे. प्रशांत महासागरात एल निनोची स्थिती असताना बहुतेक वेळा भारतात मान्सून काळात पाऊस सरासरीपेक्षा कमी पडतो. याबाबतीत ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ एम. संजीवन यांच्या मते 1951 ते 2022 या काळात सर्वसाधारण ते तीव्र स्वरूपाच्या 15 एल निनोच्या घटनांची नोंद झाली. त्यापैकी 11 वेळा भारतात कमी पाऊस पडला होता, त्यांच्या मते यंदा आयओडी हा घटक मान्सून काळात पॉझिटिव्ह राहण्याची शक्यता आहे. पॉझिटिव्ह आयओडी मान्सून काळातील पावसासाठी अनुकूल ठरतो, एकूणच आता याबाबत विविध मतप्रवाह ऐकावयास मिळतात. काहींच्या मते या अंदाजसाठी अजून काही महिने अवकाश आहे. सर्वसाधारपणे एप्रिल महिन्यात पावसासंबंधी योग्य तो अंदाज करता येईल. एकूणच पाणी बचत करणे हेच आपल्या पुढील एक महत्त्वाचे कर्तव्य आजमितीला आपणापुढे आहे.

शांताराम वाघ, पुणे

काँग्रेससह विरोधकांची एकजूट होणे महत्त्वाचे

नितीशकुमार यांनी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांची एकजूट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांची वक्तव्ये आणि काँग्रेस नेत्यांसह इतर नेत्यांशी चर्चा, गाठीभेटी यांवरून अंदाज येत आहे. विरोधातील जवळपास सर्वच पक्ष एकजुटीकरिता आपला पक्ष काय त्याग करू शकतो, यावर स्पष्टता न देता केवळ जागा वाटप, सत्ता हाती आल्यास मंत्रिपदांची संख्या, खाती वाटप या मुद्द्यांवर अडले असून एकमतापर्यंत पोहोचत नाहीत.

काही पक्ष दीर्घकाळ देशाची सत्ता हाती असलेल्या काँग्रेसला पुन्हा साथ देण्याच्या तयारीत नाहीत. काही राज्यात सत्तेत असलेल्या पक्षांचे प्रमुख आपण स्वतःच केंद्रातील सत्ताप्रमुख बनविले जावे अशा सुप्त इच्छा बाळगून आहेत. तृणमूल काँग्रेस, बिजू जनता दल, बीएसआर, डावे पक्ष किंवा इतर काही पक्ष ज्यांनी काँग्रेसला कमकुवत करून आपले वेगळेपण सिद्ध करण्याचे प्रयत्न केले, तेच पक्ष आता होऊ घातलेले ऐक्य किती काळ टिकवून ठेवू शकतील याचा अंदाज घेणे, त्यांच्या मागील अनुभवावरून कठीण वाटते.

काँग्रेस पक्षांतर्गत विरोधकांशी जुळवून घ्यावे का यावर भिन्न मते आहेत. काही राज्यांतील पक्षांची स्थिती पाहता काँग्रेसला दुय्यम भूमिका घ्यावी लागेल. मात्र, तिथेही पक्षात मतांतरे होऊ शकतात. देशातील सत्तेच्या इतिहासावर नजर टाकली असता चंद्रशेखर, पी.व्ही. नरसिंह राव, देवेगौडा, गुजराल यांनी एकजुटीच्या नेतृत्वाचे पर्याय उपलब्ध करून दिले होते हेच समजून येते. तशाच प्रकारची एकजूट साधण्याकरिता तडजोड करण्याची सद्य:स्थितीत गरज आहे. देशातील वाढती महागाई, इंधन दरातील वाढ, बेरोजगारी, शिक्षण क्षेत्रातील घोळ यांनी हैराण झालेल्या जनतेसमोर पर्यायी सत्तेची वाट पाहणार्‍या जनतेला आशा आहे, ती पर्यायी नेतृत्वाकडून. म्हणूनच विरोधकांनी आशावादी नेतृत्व जनतेसमोर आणून आपसांतील मतभेद दूर सारावेत आणि पर्याय समोर आहे हे जनतेला पटवून देण्याची गरज आहे. निदान या निमित्ताने विरोधकांची एकजूट किती काळ ताणून धरली जाते याची प्रचिती देशवासीयांना आणि सत्ताधार्‍यांना कळून येईल. विरोधकांचे प्रयत्न अयशस्वी ठरले, तर तेच विरोधक जनतेपेक्षा सत्ताधार्‍यांच्या प्रभावाचे बळी ठरतील असे वाटते.

स्नेहा राज, गोरेगांव.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा