सांगली जिल्हा वार्तापत्र : विकास सूर्यवंशी

पक्षाचे वरिष्ठ जिल्हा दौर्‍यावर आल्यावर, पक्षाच्या मोठ्या कार्यक्रमात एकत्र यायचे. एरवी नेते एकमेकांचे पाय कसे खेचता येतील यासाठीच प्रयत्न करायचे. पक्षांर्तगत प्रतिस्पर्धी अडचणीत कसे येतील, यासाठी प्रयत्नशील राहायचे. असा प्रकार जिल्ह्यात सर्वच पक्षात सर्रास सुरू आहे. शिस्तबध्द समजल्या जाणार्‍या भाजपमध्येही ते घडू लागले असून, भाजपचे काँग्रेसीकरण होणार या विरोधकांच्या आरोपांना बळ मिळू लागले आहे.

काही वर्षांपूर्वी स्थानिक नेत्यांना सर्वात आधी पक्षाला, पक्षाच्या विचारधारेला आणि वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाला महत्त्व असायचे. त्या विरोधात शब्दही काढण्याचे धाडस त्यांच्यात नव्हते. पक्षाचा आदेश आला की, त्या आदेशाचे पालन गावपातळीपर्यंत व्हायचे. पक्षशिस्त म्हणून, पक्षाचा आदेश पाळला जायचा. सध्या ही परिस्थिती दिसत नाही.

जिल्हा परिषद-पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका अशा सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये व सहकारी संस्थांमध्येही अंतर्गत लढाईच मोठी असे. या अंतर्गत राजकारणाचा काही चाणाक्ष राजकारण्यांनी ज्या-त्या वेळी स्वतःसाठी उपयोग करूनही घेतला. पुढे भाजपसारखे पक्ष पाय पसरू लागल्यावर हे काँग्रेस-राष्ट्रवादीला अडचणीचे ठरू लागले. जिल्ह्यात काँग्रेसचे डॉ. विश्वजित कदम आणि विक्रमसिंह सावंत हे दोन आमदार असूनही, केवळ गटबाजीमुळे त्यांच्या राजकीय ताकदीचा वापर पक्षासाठी करून घेताना दिसत नाही. याचाच फायदा घेत भाजप जिल्ह्यात हळूहळू विस्तारत गेली.

काँग्रेसचे ज्येष्ठनेते डॉ. पतंगराव कदम अनेकदा जाहीरपणे सांगत, काँग्रेसच काँग्रेसचा पराभव करतो. नेते किंवा गटबाजी याचा इतर पक्षाला फायदा होत होता.
अलिकडे नगण्य अस्तित्व असणारी भाजपा सांगली जिल्ह्यात वाढली. भाजप शिवसेनेच्या आधाराने वाढत असताना काँग्रेस-राष्ट्रवादी खिळखिळी झाली. मात्र तरीही काँग्रेस व राष्ट्रवादीतील अंतर्गत कुरघोड्या अद्याप थांबलेल्या नाहीत. जिल्ह्यात दोन्ही पक्ष ताकदवान असतानाही दोन्ही पक्षांचे नेते आपापले मतदार संघांचे गड शाबूत राखण्यात धन्यता मानू लागले.

काँग्रेसमध्ये सांगली शहर, विधानसभा क्षेत्रात पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील व विशाल पाटील यांच्यातील स्पर्धा थांबताना दिसत नाहीत. जत, पलुस-कडेगावसह इतर तालुक्यात गटबाजी आहेच. वसंतदादा गट, कदम गटासह इतरही काँग्रेस नेत्यांचे गट कार्यरत आहेत. पक्षाचे नुकसान होत आहे, हे दिसत असले तरीही आपल्या गटाचीच त्यांकडून अधिक काळजी केली जाते. त्यामुळेच काँग्रेस वाढण्याऐवजी गटच वाढताना दिसतात. निवडणूक जवळ आली की ही गटबाजी उफाळून येते आणि त्याचा अचूक फायदा विरोधक उचलतात. हे गेली तीस-पस्तीस वर्षे सांगलीकरांनी अनुभवले आहे.

राष्ट्रवादीतही अशीच परिस्थिती आहे. जिल्ह्यात प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचे एकमुखी नेतृत्व असलं, तरीही तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यात थेट पवार कुटुंबांचा वरदहस्त आहे. त्यामुळे वेळोवेळी राजकीय गटबाजी, समर्थकांची खेचाखेची होतच असते. महापालिका क्षेत्राचा विचार केला, तर तेथेही राष्ट्रवादीत दोन गट कार्यरत आहेतच.

सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे शिस्तबद्ध म्हणून ओळख असणार्‍या भारतीय जनता पक्षाला गटबाजीची लागण होऊ लागली आहे. खासदार संजयकाका पाटील यांचा स्वतंत्र गट तर अनेक दिवसांपासून कार्यरत आहे. खासदारांचे भाजपच्याच अनेक आमदार व तालुका नेत्यांशी पटत नाही. त्यांच्यात सतत शाब्दिक चकमकी घडत असतात. जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाच्या चर्चेवेळी तर खासदार एका बाजूला व इतर सर्व नेते एका बाजूला अशी परिस्थिती होती. तीच कमी अधिक प्रमाणात आजही दिसत आहे. भाजप नेत्यांचे सवते सुभे तयार झाले आहेत.

जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे. अनेक वर्षांनी मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्याकडे पालकमंत्री या रूपाने भाजपने जिल्ह्यास मंत्रिपद दिले आहे; मात्र या निर्णयाचे जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणात स्वागत होताना दिसले नाही. मतदारसंघात महापालिका क्षेत्राचा सहभाग असणार्‍या पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ यांच्यात फारसे सख्य नाही. एका मंत्रिपदासह दोन आमदार मनपा क्षेत्रात असतानाही भाजपमध्ये एकजूट नाही. जिल्ह्याचा विचार केला तर पृथ्वीराज देशमुख व खासदार पाटील यांच्यात कमालीची गटबाजी आहे. वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीचे बलाढ्य नेतृत्व असताना त्या ठिकाणी भाजप एकसंध दिसत नाही. महाडिक गट, निशिकांत पाटील यांचे गट वेगवेगळ्या दिशेने काम करताना दिसतात. विधानसभा निवडणुकीत त्याचे परिणामही पक्षाला भोगावे लागले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हीच परिस्थिती राहणार की बदलणार हे काळच सांगेल.

शिवसेना व मनसेसारख्या पक्षांची जिल्ह्यात फार मोठी ताकद नसली, तरी आहे त्यातही गटबाजी आहेच. शिवसेनेतील राज्यपातळीवरील फुटीनंतर जिल्ह्यातही दोन गट पडले. मात्र या दोन्ही गटातही कमी अधिक प्रमाणत गटबाजी आहेच. मनसेतही गटबाजी होती. मात्र काही दिवसांपूर्वी काही लोक पक्ष सोडून गेल्याने गटबाजी कमी झाल्याचे जाणवत आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना काही ठराविक तालुक्यात अधिक सक्षम आहे. मात्र त्यांच्यातही गटबाजी आहेच. आंदोलन करताना ती प्रकर्षाने जाणवते.
जिल्ह्यात एकाही पक्षाकडे एकमुखी, सर्वांना एकत्र ठेवेल असे नेतृत्व दिसत नाही. राजकारणातील वाढती स्पर्धा, वाढत्या अपेक्षा, कमी वेळात अधिक मोठी पदे, सत्ता मिळवण्याचे स्वप्न या प्रयत्नामुळे ही गटबाजी कमी होईल अशी चिन्हे नाहीत. गटबाजीमुळे जिल्हा विकासकामांबाबत मागे पडत चालला आहे. कोणत्याही पक्षाकडे एकत्रित जिल्ह्याच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट नाही. ही गटबाजी सांभाळातच पक्ष वाढवण्याची कसरत वरिष्ठ नेत्यांना करावी लागणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा