‘मूडीज’चा अंदाज

नवी दिल्ली : आगामी 2023-24 या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 5.5 टक्क्यांच्या आसपास राहील, असा अंदाज जागतिक स्तरावरील पतमापन संस्था ‘मूडीज’ने वर्तवला आहे. याआधी, 4.8 टक्क्यांचा अंदाज मूडीजने वर्तवला होता. आता यात सुधारणा केली आहे.

केंद्रीय अंदाजपत्रकात भांडवली खर्चाच्या तरतुदीत सरकारने मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला बळ मिळेल आणि विकासदर 5.5 टक्क्यांच्या आसपास पोहोचेल, असेही मूडीजने नमूद केले आहे. पण, चालू आर्थिक वर्षाचा विकास दर 7 ऐवजी 6.8 टक्के साध्य होईल, असेही मूडीजने म्हटले आहे.

मूडीजनुसार, भारत, ब्राझील, मेक्सिको आणि तुर्कस्तानची अर्थव्यवस्था चांगली वाटचाल करत आहे. ‘जी-20’ देशांचा विकास 2023 मध्ये 2 टक्क्यांनी तर, 2024 मध्ये 2.7 टक्क्यांनी वाढेल. 2022 मध्ये हा दर 2.3 टक्के इतका होता. चलनवाढीला आळा घालण्यासाठी जगभरातील बँकांनी अनेक उपाययोजना केल्या. त्यामुळे महागाईच्या झळा किंचित कमी होतील, असेही मूडीजने म्हटले आहे. अमेरिकेत डिसेंबर महिन्यात महागाई दर 7.1 टक्के होता. जानेवारी 2023 मध्ये तो 6.4 टक्क्यांपर्यंत खाली आला, असेही मूडीजने सांगितले. पण, अमेरिकेच्या मध्यवर्ती फेडरल बँकेच्या अंदाजापेक्षा 2 टक्के अधिक आहे. गेल्या काही दिवसांत फेडरल बँकेने मुख्य व्याजदरात वारंवार वाढ केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा