घरगुती सिलिंडर ५० तर, व्यावसायिक ३५० रुपयांनी महागला

नवी दिल्ली : ईशान्येकडील तीन राज्यांचे मतदान पार पडताच गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 350 रुपयांची वाढ झाली आहे. नवे दर तत्काळ लागू झाले आहेत. या दरवाढीवरुन विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

राजधानी दिल्लीत 14.2 किलोचा घरगुती गॅस सिलिंडर 1 हजार 103 रुपयांवर पोहोचला. याआधी, हा सिलिंडर 1 हजार 53 रुपयांना मिळत होता. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकार गॅस सिलिंडरवर कोणतेही अनुदान देत नाही. मात्र, प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत जोडणी मिळालेल्या 9.58 कोटी गरिबांना सरकार 200 रुपयांचे अनुदान देते. मात्र, त्यासाठी त्यांना 903 रुपये मोजावे लागतील.

नव्या दरवाढीनंतर मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरसाठी 1,102.50 रुपये, कोलकात्यात 1,129 रुपये आणि चेन्नईमध्ये 1,118.50 रुपये मोजावे लागणार आहे.
व्यावसायिक 19 किलोचा सिलिंडर साडेतीनशे रुपयांनी महागला आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरसाठी 2,119.50 रुपये मोजावे लागणार आहे. याआधी, हा सिलिंडर 1,769 रुपयांना मिळत होता. या दरवाढीमुळे हॉटेल, रेस्टॉरंटमधील खान-पानच्या वस्तू महागणार आहेत.
जानेवारी महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ करण्यात आली होती. दोन महिन्यांत व्यावसायिक सिलिंडर 375 रुपयांनी महागला.

गेल्या 11 महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर असल्या तरी सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रतिलीटर दराने मिळते. मात्र, अनेक राज्यांत पेट्रोल आणि डिझेलने शंभरी ओलांडली आहे. देशात 6 एप्रिल 2022 पासून पेट्रोल-डिझेलच्या किमती ‘जैसे थे’ आहेत.

एटीएफच्या किमतीत ४ टक्के कपात

विमान इंधन म्हणजेच एटीएफच्या (एव्हिएशन टर्बाइन फ्युएल) किमतीत 4 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे विमान प्रवास स्वस्त होण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीत इंधनाचे दर प्रति किलोलीटर 4,606.50 रुपयांनी कमी होऊन 1,07,750.27 रुपये प्रति किलोलीटर झाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा