रासायनिक खतांचा वापर कमी करा
वर्तमानकाळात जगातील 48 टक्के लोकसंख्येचे पोट रासायनिक खते वापरून उगवलेल्या अन्नावर भरले जात आहे. या रासायनिक खतांच्या निर्मितीमध्ये अमोनिया संश्लेषण प्रक्रियेत अधिकतर कार्बन उत्सर्जन होते. खतांचे उत्सर्जन निर्मिती प्रक्रियेत एकूण उत्सर्जनाच्या एक तृतीयांश, तर दोन तृतीयांश उत्सर्जन खते शेतात वापरल्यानंतर होते. हे निष्कर्ष केंब्रिज विद्यापीठातील संशोधक शास्त्रज्ञांनी रासायनिक खतांच्या संपूर्ण जीवनचक्राचे कार्बन विश्लेषण केले असता त्यांना आढळून आले. रासायनिक खते दरवर्षी अंदाजे 2.6 गिगाटन कार्बन वातावरणात सोडतात. हे प्रमाण धोकादायक मानले जाते. पूर्णपणे सेंद्रिय खते वापरून केलेली शेती नुकसानकारक ठरू शकते, असे शेतकी विषयाच्या अभ्यासकांना वाटते. उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्याच्या प्रयत्नात खतांच्या किंमतीत वाढ होते. या सर्वांवर खतांचा प्रभावी वापर करून त्यांची मात्रा कमी करणे हा उपाय अधिक उपयुक्त ठरेल. कडुलिंबाची लिंबोळी व वाळलेल्या पानांचा वापर, शेणखत, गोमूत्र, गांडूळ खत, अन्नद्रव्ये पुरविणारी अन्य खते यासारखी पिकांना अनुकूल ठरणारी सहाय्यक व शेतीपूरक घटक असणारी द्रव्ये यांच्या वापरामुळे पर्यावरणाचे नुकसान रोखता येऊ शकते.
स्नेहा राज, गोरेगांव
करदात्यांना दिलासा द्या
पुणे महानगरपालिका प्रशासनाने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी मिळकत करात वाढ रद्द केली. लोकनियुक्त समिती कार्यरत नसल्याने करदातांना दिलासा मिळाला. 2021-22 दराप्रमाणे यंदा बिल मिळणार कर वाढ स्थगित केली. पहिला प्रश्न सामान्य नागरिकांना पडतो की फळे, भाजी, दूध, किराणा दरवाढ झाली ती कोण रोखणार? ज्या मिळकतधारकांचे धनादेश गेल्या वर्षी वटली नाहीत त्यांची मिळकत सील होणार. बँकेचे गृहकर्ज हप्ता वाढलेला असताना अशा नागरिकांनी या महागाईशी कसा लढा द्यावयाचे ? सामान्य नागरिकांनी बजेट कसे जुळवून घ्यावे हा यक्ष प्रश्न आहेच. गृहिणींच्या कंबरडे मोडून काय साधले.
नीलम सांगलीकर, पुणे.
अंगणवाडी सेविकांवर अन्याय
अंगणवाडी सेविकांनी पुन्हा एकदा बेमुदत संप पुकारला आहे आणि यातून सरकारची या सेविकांप्रति असंवेदनशीलताच तेवढी दिसून येते. 2 ऑक्टोबर 1975 रोजी महाराष्ट्रात अंगणवाड्या सुरू झाल्या. तेव्हा अंगणवाडी सेविकांचे मानधन 250 रूपये, तर मदतनीसांचे 125 रूपये असे होते. मागील 48 वर्षांत आजपावेतो यात सहा – सात वेळा वाढ करण्यात आली आणि आता ते सेविकांना, मिनी सेविकांना आणि मदतनीसांना अनुक्रमे दरमहा आठ हजार 300 रूपये, पाच हजार 800 आणि चार हजार 800 रूपये असे मानधन मिळते, जे देशातील इतर राज्यांच्या तुलनेत अगदीच तुटपुंजे ठरते. पदुच्चेरीत तर या महिलांना सरकारी कर्मचार्यांचा दर्जा आहे. जिथे शाळा आणि महाविद्यालयांतील सेवकांना वेतन आयोगाप्रमाणे वेतन दिले जाते तिथे अंगणवाडी सेविकांबाबत दुजाभाव का ? अंगणवाडी सेविकांचा आक्रोश कितीही रास्त वाटत असला तरी, झोपेचं सोंग घेणार्या शासन व्यवस्थेला तो ऐकू येण्यार का ? कथित विकासाच्या सागरात मनमुराद नौका विहार करणार्यांना जिथे अंगणवाडी सेविकांच्या समस्यांची जाणीव नाही तिथे त्यांच्या कामाचे महत्त्व आणि त्यांच्या प्रति ममत्व ते काय असू शकते ?
बाळकृष्ण शिंदे, पुणे
महागाई नियंत्रणाबाहेर
दूध सहा महिन्यात 12 रूपयांनी महाग. ही बातमी खरी असली, तरी वर्तमानपत्रात पहिल्या पानावर छापून जाहीररित्या चव्हाट्यावर आणण्याची नाही. का? ते विचारा. तर तुम्ही या होणार्या महागाईचे समर्थन करता. तुम्हाला भाव आटोक्यात आणता येत नाहीत, या तुमच्या नाकर्तेपणावर तुम्ही पांघरूण घालत आहात हे योग्य नाही, त्रिवार योग्य नाही.
गोपाळ द. संत, पुणे
कृत्रिम प्रकाशामुळे मधुमेह ?
चीनमधील एका अभ्यासामध्ये कृत्रिम प्रकाश हा मानवाच्या आरोग्याला घातक असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये सर्व प्रकारचे कृत्रिम दिवे, मोबाईल लॅपटॉप सारखे गॅझेट, शोरूमच्या बाहेर असलेले एलईडी, कारचे हेडलाईट, यामुळे मधुमेह होऊ शकतो. चीनमधील सुमारे 1 लाख लोकांच्यावर संशोधन करून त्यातून असे आढळून आले आहे की, असे कृत्रिम दिवे मधुमेहाचा धोका 25 टक्के वाढवू शकतात. रात्रीच्या वेळी आपल्याला दिवसाचा अनुभव देणारे दिवे माणसाचे घड्याळ बदलतात. त्यामुळे साहजिकच रक्तातील साखर नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते. शांघायमधील या संशोधनाचे प्रमुख डॉक्टर युजु यांनी सांगितले आहे की जगातील 80 टक्के लोकांना रात्रीच्या अंधारात प्रकाशाच्या प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. चीनमध्ये अशा प्रदूषणामुळे जवळपास 90 हजार लोक बाधित ठरले आहेत. एकूणच आता अशुद्ध हवा, वाढते प्रदूषण याबरोबरच कृत्रिम प्रकाश हासुद्धा आरोग्याला घातक ठरत आहे, असे दिसू लागले आहे.