श्रीकांत विठ्ठल ताम्हनकर

नुकतीच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी झाली. यानिमित्त…

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. 27 डिसेंबर 2022 रोजी विधान परिषदेमध्ये ‘सावरकरांना भारतरत्न नाही दिला तरी चालेल; पण त्यांचा अवमान करू नका’ असे महापुरुषांच्या अवमानविषयक चर्चेत बोलताना सांगितले. असाच आशय असलेले एक सविस्तर पत्र मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिनांक 27 ऑक्टोबर 2020 ला पाठविले आहे. त्या पत्राच्या प्रती मी भाजपचे केंद्रीय गृहमंत्री आणि इतर काही केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र राज्यातील त्यावेळचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांचेसह अनेक लोकप्रतिनिधींना पाठविलेल्या आहेत. दि. 15 जुलै 2021 ला नाशिकच्या खासदार श्रीमती भारती पवार आणि औरंगाबादचे खासदार भागवत कराड यांना त्या पत्राचे संदर्भात एक विशेष विनंती केलेले पत्रही पाठविले. मला खेदाने म्हणावे लागते की, यापैकी एकानेही माझ्या पत्रांना साधी पोहोचही दिलेली नाही. त्या पत्रातील काही मुद्द्यांचा येथे ऊहापोह करीत आहे.

कडक निर्बंध – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची केली जाणारी अपकीर्ती (केला जाणारा अवमान) निश्‍चित कालावधीमध्ये पूर्णतः थांबविली जावी याकरिता लोकसभेत, राज्यसभेत आणि किमान भाजपची सत्ता असलेल्या राज्यांच्या विधिमंडळ, विशेष शासकीय/अशासकीय ठराव आणला जावा, सावरकरांचा अवमान करणार्‍यास कडक शिक्षा होईल, अशी तरतूद करणारा एखादा निर्बंध (कायदा) मंजूर केला जावा. नाही तर सावरकर विरोधकांनी सावरकरांना अवमान करावयाचा आणि सावरकरप्रेमींनी त्याचा वेगवेगळ्या मार्गांनी निषेध करावयाचा हे आता नित्याचेच झाले आहे.

‘स्वातंत्र्यवीर’ उपाधी

सावरकरांना लोकांनी दिलेली ‘स्वातंत्र्यवीर’ ही पदवी अधिकृत केली जावी. जसे बाळ गंगाधर टिळकांना ‘लोकमान्य’, मोहनदास करमचंद गांधी यांना ‘महात्मा/राष्ट्रपिता’, बापूजी अणे यांना ‘लोकनायक’, सुभाषचंद्र बोस यांना ‘नेताजी’ तसे विनायक दामोदर सावरकरांना ‘स्वातंत्र्यवीर’ संबोधावे. याकरिता काही घटनात्मक बंधन येत असेल तर तेही दूर करावे.

असाही सन्मान – जातीवर आधारीत सोयीसवलती आणि आरक्षणे न देता आर्थिक निकषावर ती दिली जावीत, मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा देणे असेही सावरकरांचा बहुमान करण्याचे काही मार्ग आहेत. सावरकरांना स्वतःला कोणत्याही प्रकारचा बहुमान मिळण्याबाबत काय वाटत होते हे त्यांच्या मे 1952 मध्ये पुणे आणि अन्यत्र केलेल्या भाषणात त्यांनी व्यक्त केले आहे. बॅरिस्टर नाथ पै यांनी सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याने त्या उपाधीचाच गौरव होणार आहे असे जे म्हटले आहे तेही उचित आहेच. सावरकरांना ‘भारतरत्न’ ही उपाधी देण्याविषयीच्या लोकांच्या मागणीलाही केंद्र शासनाकडून मुद्देसूद उत्तर दिले जावे.

अधिकृत चरित्र – स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अधिकृत चरित्र केंद्र शासनाकडून प्रकाशित केले जावे. आधुनिक माध्यमाद्वारे (डिजिटल)देखील ते प्रसारित व्हावे. त्या चरित्रामध्ये त्यांच्या जीवनातील वैयक्तिक स्वरूपाच्या घटनांव्यतिरिक्त त्यांच्याविषयी भगूर, नाशिक, ठाणे, मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकत्ता (अलिपूर), रत्नागिरी, चेन्नई, लंडन आणि ते ज्या ज्या गेले त्या त्या ठिकाणच्या गुप्तहेर खात्याच्या नोंदी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अभिलेख आणि गृहखात्याकडे पाठविलेली पत्रे/अहवाल, त्यांचेवर ज्या विविध न्यायालयात खटले चालविले गेले त्या खटल्यातील इतिवृत्त व नोंदी, ज्या ज्या कारागृहात त्यांना ठेवण्यात आले तेथील पत्रव्यवहार, तेथील अधिकार्‍यांनी पाठविलेले सावरकरांविषयीचे अहवाल/अभिप्राय या सर्वांचा समावेश केला जावा. आवश्यकतेनुसार ब्रिटिश शासनाकडून अधिकृत केलेली कागदपत्रे मागवून घ्यावीत. त्या काळात इतर राजकीय नेत्यांना/बंदिवानांना देण्यात आलेल्या शिक्षा, वर्तणूक आणि सोयी सवलती निर्वाहभत्ता याचीही तुलनात्मक माहिती दिली जावी.

सुटकेनंतरचे कार्य – कारागृहातून सुटका झालेल्या राजकीय बंदिवानांनी त्यांच्या सुटकेनंतर केलेले कार्य आणि सावरकरांच्या सुटकेनंतरही असलेल्या बंधनांमधूनही सावरकरांनी केलेले कार्य यांचा तुलनात्मक उल्लेख चरित्रात यावा.

इंदिरा गांधी, शरद पवार, बॅरिस्टर नाथ पै, मोहन धारिया, महात्मा गांधी आणि त्यांच्यासारख्याच इतर नेत्यांनी सावरकरांविषयी काढलेले गौरवोद‍्गार यामध्ये समाविष्ट करावे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना श्रद्धांजली वाहताना आणि इतरही काही प्रसंगी व्यक्त केलेल्या भावनांचाही उल्लेख यावा. भाजपशासन सावरकरांना न्याय देणार का? केवळ बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात नको!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा