गौरवशाली,भाग्यशाली मराठी
माझी मायबोली
आईने चिऊ काऊच्या घासातून भरविलेली-
आपुलकीच्या नात्याचा गोफ विणणारी-
माझा अभिमान जगभरातल्या
भाषांमधील 11 वी म्हणून मिरवणारी आपल्या ज्ञानपीठ विजेत्या –
वि. वा. शिरवाडकरांनी ’उदो उदो’
केलेली
माझी समृद्धी म्हाईंभट यांचे
’लीळाचरित्र’ पासून संत तुकारामांच्या अभंगांपर्यंत-
विश्वाला मंत्रमुग्ध करणार्‍या तत्वज्ञान आणि सौन्दर्याने भरलेल्या ’ज्ञानेश्वरी’ पासून
आधुनिक वाल्मिकी ,ग दि मांच्या
अस्सल शब्द साधनेच्या
गीत रामायणापर्यंत –
माझा विश्वास -श्रवण- बेळगोळच्या शिलालेखापासून
स्वा. सावरकरांच्या ,
’ने मजसी ने परत मातृभूमीला’
या सागराला केलेल्या आळवणी
पर्यंत…
’त’ वरून ताकभात ओळखणार्‍या वाक्प्रचारापासून आणि
’गाढवापुढे वाचली गीता ,
कालचा गोंधळ बरा होता’पर्यंत
माझी सजगता जाणत्या ,
सत्वशील , शौर्य गाजविणार्‍या छत्रपती शिवरायांपासून
मनाचे श्लोक लिहून सर्व सामान्यांना ’साद’ घालणार्‍या
समर्थ रामदासांपर्यंत
माझी ओळख –
तशी सगळी पानं सारखीच, हिरवी असतात
तरी रूप-रस-गंधाचा वेगळेपणा
राखून ठेवतात!!
अशा अस्तित्व खुणा जपणारी-
माझी गरज –
या उन्नत, विकास पर्वाला
बहुगुणी- बहुआयामी भाषेला-
मराठी गौरव दिनाच्या निमित्ताने मानाचा मुजरा!!
लाख लाख शुभेच्छा!

  • कविता मेहेंदळे
    मो. 93266 57027

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा