पाकिस्तानातील युट्यूबवरील चित्रफीत गाजली

इस्लामाबाद : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे, अशा आशयाची चित्रफीत युट्यूबवर पाकिस्तानात गाजत आहे. एका प्रसिद्ध युट्यूब चॅनलने विविध नागरिकांच्या मुलाखती घेतल्या. त्यात बहुतांशी जणांनी मोदी यांच्यासारख्या नेत्याची पाकिस्तानला गरज असल्याचे मत व्यक्‍त केले आहे. विशेष म्हणजे ही चित्रफीत भारत आणि पाकिस्तानमध्ये फारच प्रसिद्ध झाली आहे.

सना अमजद यांच्या मालकीच्या युट्यूब चॅनेलवर चित्रफीत प्रसारीत झाली आहे. त्यात नागरिकांनी आपली मते व्यक्‍त केली आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यासारखा नेताच पाकिस्तानला संकटातून वाचवू शकतो, असे नागरिक चित्रफीतीत सांगत आहेत. मोदी यांच्या राजवटीत गेल्या आठ वर्षांत भारताने मोठी प्रगती केल्याचे नागरिक सांगत आहेत. पूर्वी नागरिक दोन्ही देशांची तुलनात्मक मते मांडत होते ; परंतु तशी तुलना आता नाही. भारतीय देशात आणि परदेशात अधिक प्रगती करत असल्याचे ते सांगत आहेत.

मोदी देशासाठी काम करतात, असे सांगताना एकाने सांगितले की, रशियाकडून भारताने कच्चे तेल खरेदी केले. तेव्हा अमेरिकेला राग येईल, याची तमा बाळगली नाही. भारताच्या हिताचा प्रथम विचार केला. भारतात असे पहिल्यांदा घडले आहे. आर्थिक संकट आणि महागाई पाकिस्तानात वाढली आहे. भारताची फाळणी झाली नसती तर आता ही परिस्थिती निर्माण झाली नसती. नागरिकांना दोन वेळच्या अन्नासाठी धावधाव करावी लागली नसती, तेल आणि धान्य कमी दरात मिळाले असते, असेही तो म्हणाला. मला मोदी आवडतात, असे सांगताना तो म्हणाला, देशाला नवाझ शरीफ, बेनझीर भुत्तो किंवा परवेझ मुशर्रफ यांच्या सारखे नेते नको आहेत. मोदी यांच्यासारखाच नेता हवा आहे.

दरम्यान, युट्यूबवरील पहिल्या चित्रफीतीला मोठा प्रेक्षकवर्ग लाभला आहे. दुसरी अशीच एक नागरिकांच्या मुलाखतीची चित्रफित 50 हजार नागरिकांनी केवळ पाच तासांत पहिल्याचे स्पष्ट झाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा