कोटा : नीटची तयारी करणार्या 17 वर्षांच्या विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या खोलीत पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली आहे. अभिषेक यादव असे मृताचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील बदाऊन जिल्ह्यातील रहिवासी आहे.
अभिषेक हा गेल्या दोन वर्षांपासून कोटा येथे राहत होता. एका कोचिंग संस्थेत तो नीटची तयारी करत होता. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक त्याच्या कोचिंग क्लासला जात नव्हता.
त्याच्या खोलीत पोलिसांना एक चिठ्ठी सापडली असून त्यात अभिषेकने आपल्या पालकांची माफी मागितली आहे. अभ्यासाच्या दबावामुळे हे टोकाचे पाऊल उचलत आहे. असे त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत आढळले आहे. असे कुन्हारी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गंगासहाय शर्मा यांनी सांगितले.
शुक्रवारी सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला असून, सीआरपीसी कलम 174 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोटामध्ये विद्यार्थी आत्महत्या करत आहेत अशी परिस्थिती का निर्माण होत आहे? विद्यार्थ्यांवर दबाव आणणारी यंत्रणा कार्यान्वित आहे का? यावर सरकारकडून उपाययोजना केल्या पाहिजेत, असे मृत अभिषेकचे वडील आराम सिंग म्हणाले.2022 मध्ये विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या किमान 15 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती.