एस.टी. कर्मचार्यांनी काय करावे?
88 हजार एस.टी. कर्मचार्यांचे जानेवारी महिन्याचे वेतन थकले होते. वेळेवर पगार न होणे ही एसटी कर्मचार्यांची क्रूर थट्टाच आहे. त्याचबरोबर महामंडळ, तसेच सरकारचे हे अपयश आहे. महिन्याच्या महिन्याला वेतन मिळाले नाही, तर कर्मचार्यांच्या कुटुंबीयांनी करायचे काय? व हात कोणाकडे पसरायचे? एसटीच्या चालकाचे काम जिकिरीचे असते. आतील प्रवाशांना सुखरूपपणे इच्छित स्थळी सोडणे. एखादा वाहक अथवा चालक गैरहजर राहिल्यास त्याच्या बदल्यात त्यांना डबल ड्युटी करावी लागते. जेवण, वेळेवर आणि पुरेशी झोप न मिळणे, यामुळे त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेहासारख्या व्याधी जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एसटी महामंडळ तोट्यात चालण्याची अनेक कारणे आहेत. उदा: खाजगी वाहने, ओला उबेर यांच्या स्पर्धेमुळे, लोकांचा कल खाजगी वाहनांकडे जास्त आहे. एसटी महामंडळाने तसेच सरकारने, प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी, याही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सरकार अथवा महामंडळाने एसटी कर्मचार्यांचा अधिक अंत न पाहता, त्यांच्या मागण्या त्वरित मान्य करून, त्यांच्यावरील अन्याय दूर करावा.
गुरुनाथ मराठे, बोरिवली (पूर्व), मुंबई
इथेनॉल मिश्रित पेट्रोल
सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलिअम कंपन्यांच्या समन्वयित प्रयत्नांमुळे भारतातील 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील निवडक पेट्रोल पंपांवर इथेनॉलचे 20 टक्के मिश्रण असलेल्या पेट्रोलची किरकोळ विक्री सुरू झाली. इथेनॉलवर लक्ष केंद्रित करण्यात आले असल्याने पर्यावरणाबरोबरच शेतकर्यांच्या जीवनावरही चांगला परिणाम होत आहे. कारण शेतकर्यांसाठी उत्पन्नाचा आणखी एक स्रोत उपलब्ध झाला आहे. गेल्या वर्षी (2022) केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट ठेवले होते आणि भारताने ते 2022 सालच्या जून महिन्यात पूर्ण केले. जगातील अमेरिका, ब्राझील, युरोप आणि चीन यांच्यानंतरचा इथेनॉलचे उत्पादन करणारा भारत हा पाचवा मोठा देश आहे. भारताने पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्यास अनुमती दिली असल्याने साखर कारखाने आता इथेनॉलचे अधिकाधिक उत्पादन काढण्यावर भर देतील. यामुळे त्यांचा नफा वाढेल आणि शेतकर्यांना उसाची शिल्लक रक्कम त्वरित देणे त्यांना शक्य होईल.
अनिल रा. तोरणे, तळेगाव दाभाडे
हे तर धक्कादायक!
देशाच्या वतीने खेळावयास मिळावे यासाठी कांही खेळाडू फिटनेस चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी शारीरिक क्षमता वाढविणार्या विशेष प्रकारच्या इंजेक्शनचा वापर करतात. स्टिंग ऑपरेशनमुळे उजेडात आलेली ही बाब तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींना धक्का देणारी आहे. चिंता वाटणारी आहे. भारतीय संघात खेळण्याच्या लालसेपोटी जे कुणी खेळाडू असे इंजेक्शन घेत असतील, तर स्वतःला देशाला, आपल्या हितचिंतकांना, क्रिकेट खेळाला फसवित आहेत, नव्हे क्रिकेट खेळाच्या भवितव्यासाठी ही अत्यंत चिंतेची बाब तर आहेच; पण ही मंडळी देशासाठी खेळत नसून फक्त स्वतःसाठी, आर्थिक कमाईसाठीच खेळतात, हेच यातून दिसून येत म्हटल्यास ते चुकीचे होणार नाही. शिवाय तरुण, होतकरू, नवोदित खेळाडूंवर हे एक प्रकारे अन्यायच करीत आहेत.
विश्वनाथ पंडित, तुरंबव, चिपळूण
मराठी भाषेलाच महत्त्व
महाराष्ट्रात संतांच्या काळापासून मराठी भाषेला महत्त्व प्राप्त झाले आहे. इंग्रजी शिक्षण ही जरी काळाची गरज असली, तरी मराठी भाषेला तितकेच महत्त्व दिले पाहिजे. सर्व व्यवहार मराठीतूनच झाले पाहिजेत, तरच मराठीपण टिकून राहील. आपण आपल्याच मायभूमीत मातृभाषेला परके करू नये. मराठी भाषा सर्व धर्मात सहजरीत्या बोलली जाते, त्यामुळे कोणत्याही व्यक्तीस येऊ शकते. संतांनी म्हटल्याप्रमाणे मराठी भाषा अमृताहूनी गोड आहे. त्यामुळे मराठीजनांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा, त्यामुळे मराठीला महत्त्व देण्याची गरज आहे.
अनिल शिंदे, पुणे.
मुंबईला वायुप्रदूषणाचा विळखा
29 जानेवारी ते 8 फेब्रुवारी या दहा दिवसांच्या कालावधीत ‘स्विस एअर ट्रॅकिंग इंडेक्स’ या हवेचा दर्जा मोजणार्या संस्थेने केलेल्या पाहणीनुसार मुंबई शहर हे जगातील दुसर्या क्रमांकाचे प्रदूषित शहर ठरले. गेल्या चार वर्षातल्या प्रदूषणाची तुलना करता नोव्हेंबर 2022 ते जानेवारी 2023 या काळात मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांकाची धोकादायक ते अति धोकादायक अशी नोंद झाली होती. एकीकडे मुंबईत वाहनांच्या उत्सर्जनामुळे वाढलेले प्रदूषण, इमारती, तसेच रस्ते, मेट्रो इत्यादी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांच्या बांधकामामुळे उडणारी धूळ यामुळे हवेची गुणवत्ता ढासळली. तर, दुसरीकडे जागतिक पातळीवरील हवामानातील बदलांमुळे मुंबईच्या हवेतील धूलिकण आणि प्रदूषके वाहून नेणार्या समुद्रातील वार्याचा वेगही कमी झाला आहे. मुंबई वायुप्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचला असून, दम्यासारख्या श्वसनाच्या आजारांबरोबरच खोकला, घसा खवखवणे, सर्दी अशा रुग्णांची संख्या वाढली आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन प्रदूषित घटकांचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाय योजना करणे गरजेचे आहे.
प्रदीप शंकर मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई
कॉपी प्रकार बंद कसे होणार?
आपल्याकडे फेब्रुवारी मार्च हा परीक्षांचा काळ असतो. या महिन्यात परीक्षा पार पाडण्याची जणू परंपराच आहे. दहावी, बारावी या बोर्डाच्या परीक्षा याच काळात असतात. इतकेच काय तर शिष्यवृत्ती, नवोदय यांसारख्या स्पर्धा परीक्षादेखील याच काळात होतात. शिष्यवृत्ती परीक्षा 10 फेब्रुवारीला पार पडली, तर बारावीची परीक्षा सुरू असून, दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्च दरम्यान होणार आहे. या परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा मैलाचा दगड असतो.
विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणार्या या परीक्षा असतात. दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षा देतात. यावर्षी देखील लाखो विद्यार्थी या परीक्षा देणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर मनापासून अभ्यास केलाय ते विद्यार्थी या परीक्षांना बेधडकपणे सामोरे जातात मात्र ज्या विद्यार्थ्यांचा पुरेसा अभ्यास झाला नाही ते विद्यार्थी गैरमार्गाने ही परीक्षा उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करतात. त्यातीलच एक गैरमार्ग म्हणजे कॉपी.
दरवर्षी हजारो विद्यार्थी कॉपी करताना आढळतात. काहींवर कारवाई होते, तर काहींना समज देऊन सोडून दिले जाते. मात्र, कॉपीची ही कीड मुळासकट उपटून टाकली जात नाही. कॉपी ही आपल्या शिक्षण व्यवस्थेला लागलेली कीड आहे. वर्षभर अभ्यास न करता परीक्षेच्या दिवशी कॉपी करून उत्तीर्ण होण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे ही धोक्याची घंटा आहे. ’मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून 38 लाख विद्यार्थ्यांना पंतप्रधानांनी कॉपी केल्याने आयुष्य घडवता येत नाही, असा मंत्र पंतप्रधान मोदी यांनी दिला. कॉपी करून आपण एखादी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो. मात्र जीवनाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी कॉपी नव्हे तर अपार मेहनतच करावी लागते.
जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर मेहनतीला पर्याय नाही, असा संदेशही पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिला. मात्र विद्यार्थी पंतप्रधानांचा हा संदेश कितपत अमलात आणतील याबाबत शंकाच आहे. कारण कॉपीची कुप्रथा कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दहावी बारावीच्या परीक्षेत तर कॉपीचा सुळसुळाट झालेला दिसून येतो. वर्षभर अभ्यास न करणारे विद्यार्थी कॉपीच्या या कुप्रथेचे आवर्जून पालन करतात. काही ठिकाणी तर काही शाळा आणि संस्था देखील निकाल चांगला लागावा म्हणून या कुप्रथेला प्रोत्साहन देतात. काही पालकही आपल्या मुलांना कॉपी पुरवण्यासाठी जीवाचे रान करतात. शाळेच्या, परीक्षा हॉलच्या बाहेर कॉपी पुरवण्यासाठी तोबा गर्दी उसळते. झेरॉक्स दुकानांवर देखील तेवढीच गर्दी असते. अर्थात परीक्षेत कॉपी होऊ नये म्हणून प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करतात हे मान्यच करावे लागेल.
राज्यात कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकारचे अभियान राबवले जाते. भरारी पथक हे त्यापैकीच एक अभियान. बोर्डाच्या परीक्षा सुरू असताना काही अधिकारी बोर्डाकडून नेमले जातात. हे अधिकारी परीक्षा केंद्रावर अचानक भेटी देऊन परीक्षा केंद्रावर धाक बसवतात. कॉपी करताना कोणी विद्यार्थी आढळला, तर त्याच्यावर कारवाई करतात. थेट निलंबित केले जाते. पण, कॉपी बहाद्दरांना तुरुंगात टाकण्याची आपल्याकडील कायद्यात तरतुद नाही. मात्र देशातील काही राज्यात कॉपी करणार्या विद्यार्थ्यांना थेट तुरुंगात पाठवण्याचा कायदा आहे.
आपल्याकडे देखील आता कॉपी करणार्या विद्यार्थ्यांना वचक बसावा आणि राज्यात कॉपीमुक्त परीक्षा व्हाव्यात, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहेत, त्यासाठी त्यांनी अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. कॉपीमुक्त अभियानासाठी राज्य सरकार जे प्रयत्न करीत आहेत ते स्वागतार्ह असले, तरी केवळ कठोर कायदे करूनच कॉपीला आळा घालता येईल असे नाही, तर कॉपी करू नये यासाठी विद्यार्थ्यांचे प्रबोधनही करायला हवे. कॉपी करणारा विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकतो मात्र जीवनाच्या परीक्षेत तो उत्तीर्ण होऊ शकत नाही. जीवनाच्या प्रत्येक पावलावर परीक्षा असतात. त्यात उत्तीर्ण होण्यासाठी कॉपी नव्हे, कठोर मेहनतच घ्यावी लागते. जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर कॉपीसारख्या कुप्रथेला मूठमाती द्यावीच लागेल.